Breaking News

चौक-कर्जत मार्गावर फोर्ड इंडिव्हर गाडी पेटली

खालापूर, कर्जत : प्रतिनिधी

मुंबई येथील रमेश लाड यांचा कर्जत येथे फार्महाऊस असून बुधवारी सकाळी ते कर्जत येथून मुंबईकडे जाण्यास निघाले होते. आपल्या फोर्ड इंडिव्हर गाडीने ते आपली पत्नी आणि मुलगी सोबत जात होते. मात्र कर्जत-चौक रस्त्यावरील मोर्बे गावाजवळ त्यांच्या त्या महागड्या गाडीने अचानक पेट घेतला आणि गाडी जळून खाक झाली.

आग लागल्याचे कळताच लाड यांचे कुटुंबीय गाडीमधून सुखरुप बाहेर पडले, त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही. कर्जत अग्निशमन केंद्राचा बंब घटनास्थळी पोहोचण्या आधीच गाडी पूर्ण जळाली होती. या घटनेमुळे कर्जत-चौक मार्गावर काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती.

खालापूर तालुक्यात कार पेटण्याचे सत्र

तीन दिवसांपूर्वी मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटात डस्टर मेक मोटार कार (एमएच-12, पी-8253) मुंबईकडे जात असताना अचानक पेटली. घटनास्थळी खोपोली अग्निशमन दल, आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा व महामार्ग पोलीस यांनी त्वरीत दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले मात्र तोपर्यंत गाडी बेचिराख झाली होती. ही घटना दुपारी घडली. तर बोरघाटातच मॅजिक पॉईंटजवळ शनिवारी मध्यरात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास होंडा सिवीक (एमएच-43, व्ही-0 999) या गाडीला आग लागून ती जळून खाक झाली होती. बुधवारी फोर्ड इंडिव्हर गाडीला लागलेली आग ही गेल्या चार दिवसांतील तिसरी घटना आहे.

10 दिवसांपूर्वी जुन्या मार्गावर नवीन कारची चाचणी सुरु असताना, तिला सायमाळ जवळ दुपारच्या वेळेस आग लागली, त्यात ही कार जळून खाक झाली होती. त्याच्या दोन दिवस अगोदर खोपोली-पाली मार्गावर उंबरे गावाच्या हद्दीत झायलो गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. तर द्रुतगती महामार्गावरील भाताण बोगद्याच्या काही अंतरावर रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कार जळून खाक झाली होती. महिनाभरात खालापूर तालुक्यात तब्बल सहा कार जळून खाक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र त्यामध्ये कोणतीही जीवितहानी वा कोणीही जखमी झाल्याची खबर नाही.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply