Breaking News

पुनर्वसनाशिवाय शहरात झोपड्यांना हात लावणार नाही ; पालिका आयुक्त गणेश देशमुख यांची भूमिका

पनवेल : बातमीदार

पनवेल शहरातील झोपडपट्ट्यांमधील व्यवसायिकांना नोटिसा देऊन दुकाने रिकामी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, मात्र झोपडपट्टीतील रहिवाशांचे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पुनर्वसन केल्याशिवाय एकाही झोपडीला हात लावणार नाही, अशी माहिती बुधवारी महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली. पनवेल शहरातील झोपडपट्ट्यांना दिलेल्या नोटिशींमुळे सध्या झोपडपट्टी संघटना निवेदने देऊन कारवाईला विरोध करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर आयुक्तांनी महापालिकेची भूमिका जाहीर केली.

पनवेल शहरातून जाणार्‍या मुंबई-पुणे महामार्गाला लागून इलेव्हेटेड पुलाच्या बाजूला लक्ष्मी वसाहत, शिवाजी नगर, इंदिरा नगर आदी झोपडपट्ट्या आहेत. या सर्व झोपडपट्ट्यांमध्ये रहिवाशांनी व्यवसायिक गाळे काढून व्यवसाय थाटले आहेत. येत्या काही दिवसांत संबंधित व्यावसायिक वापरावर कारवाई करण्यात येईल, असे संकेत आयुक्त गणेश देशमुख यांनी दिले होते, मात्र 2015पर्यंतच्या झोपडीवासीयांचे राज्य आणि केंद्र सरकारच्या नियमानुसार पुनर्वसन करण्यात येणार आहे. ते करताना आधी या रहिवाशांना तात्पुरते पुनर्वसन करण्यात येईल. नंतर झोपडपट्टी पुनर्वसनांतर्गत घरे बांधून झाल्यानंतर या प्रकल्पांमध्ये झोपडपट्टीधारकांना घरे देण्यात येतील, असे महापालिकेच्या वतीने आम्ही देत असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

या भागात असलेल्या खाजगी भूखंडांवरील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यात येईल, भूखंड मालकांचा प्रस्ताव सादर झालेला आहे. त्यामुळे काही मंजुर्‍या पूर्ण होताच झोपडपट्टी पुनर्वसन प्रक्रियेला लवकरच गती येईल, असा विश्वासदेखील आयुक्तांनी व्यक्त केला. पनवेल महापालिकेच्या कारवाईनंतर झोपडपट्टी संघटनांनी महापालिकेच्या कारवाईविरोधात आवाज उठविला होता. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन महापालिकेची भूमिका स्पष्ट केली.

– राज्य आणि केंद्र सरकारने झोपडपट्टी पुनर्वसनाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून जिल्हाधिकार्‍यांकडे जागा निश्चित करण्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे. म्हाडाच्या नियमानुसार महापालिका घरे उभारून झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करणार आहे. झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्यापूर्वी त्यांचे तात्पुरत्या ठिकाणी स्थलांतर होईल, मात्र पुनर्वसनापूर्वी झोपडपट्टीला महापालिका हातदेखील लावणार नाही.

-गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महापालिका

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply