Saturday , August 15 2020
Home / महत्वाच्या बातम्या / अनधिकृत मच्छी विक्रेत्यांना हटविले

अनधिकृत मच्छी विक्रेत्यांना हटविले

सुधागड पाली ग्रामपंचायतीची कारवाई; मिनिडोअर स्टँड ते बाजारपेठ रस्ता झाला मोकळा

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्यातील पालीमधील मिनिडोअर स्टँड ते बाजारपेठ या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूस मागील अनेक महिन्यांपासून मच्छी विक्रेते बसत होते. या अनधिकृत मच्छी विक्रेत्यांना पाली ग्रामपंचायतीने नुकतेच हटविले आहे. तसेच  या ठिकाणी मच्छी विक्रीसाठी बसणार्‍यावर कायेदेशीर कारवाई करुन मालाची विल्हेवाट लावली जाईल, अशा स्वरुपाचे फलक या ठिकाणी लावण्यात आले आहेत. ग्रामपंचायतीच्या या कारवाईमुळे पालीमधील मिनिडोअर स्टँड ते बाजारपेठ हा मुख्य रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला आहे.

पाली बाजारपेठेत सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. त्यात भरीस भर म्हणून मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला मच्छीविक्रेते ठाण मांडून बसत होते. या मच्छी विक्रेत्यांमुळे येथे वारंवार वाहतूक कोंडी होत होती. पादचार्‍यांना येथून मार्ग काढणे जिकीरीचे होत होते. याबरोबरच दुर्गंधीमुळे परिसरातील ग्रामस्थांना त्रास होत होता. ग्रामपंचायतीने येथील बसस्थानकासमोर मासळी बाजार उभारला आहे. मात्र हे मच्छी विक्रेते तेथे जात नव्हते. स्थानिक व बाहेरून येणारे मच्छी विक्रेते रस्त्याच्या बाजुला मासळी विक्रीसाठी बसल्यामुळे वाहतूक कोंडीबरोबरच अनेक समस्या येथे उद्भवत होत्या.

मच्छी विक्रेत्यांसाठी पाली ग्रामपंचायतीने एसटी बस स्थानकासमोर बंदिस्त मासळी मार्केट उभारले आहे. तरीही अनेक विक्रेते रस्त्याच्याकडेला बसून मासेविक्री करीत होते. तसेच माशांची घाणदेखील रस्त्याच्या बाजुलाच टाकीत होते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी भरुन राहिली होती. या मच्छी विक्रेत्यांमुळे वाहतुकीलाही अडथळा होत होता. त्याची दखल घेऊन पाली ग्रामपंचायतीने अनधिकृत मच्छी विक्रेत्यांवर कारवाई केली आहे.

रस्त्याच्या दुतर्फा बसलेल्या मासळी विक्रेत्यांमुळे  येथे वाहतूक कोंडी होत असे, पादचार्‍यांचीही गैरसोय होत होती. तसेच दुर्गंधीमुळे सर्वच हैराण झाले होते. ग्रामपंचायतीने केलेल्या या कारवाईचे आम्ही स्वागत करतो. या अनधिकृत मच्छी विके्रत्यांना हटविल्यामुळे हा रस्ता मोकळा झाला आहे. या कारवाईबद्दल ग्रामपंचायतीचे आभार.

-नोएल चिंचोलकर, सामाजिक कार्यकर्ते, पाली, ता. सुधागड

रस्त्याच्या दुतर्फा बसणार्‍या मच्छी विक्रेत्यांसंदर्भात ग्रामपंचायतीकडे तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार सर्व मच्छी विक्रेत्यांना येथून हटविण्यात आले आहे. पुन्हा जर रस्त्यावर कोण मच्छी विक्री करताना आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करुन, त्यांच्या मालाची विल्हेवाट लावण्यात येईल.

-गणेश बालके, सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत पाली-सुधागड

Check Also

‘महावितरण’ने कारभार सुधारावा

मागण्या मान्य न झाल्यास करणार आंदोलन कर्जत : बातमीदार कर्जत शहरात मागील काही दिवसांपासून विजेचा …

Leave a Reply

Whatsapp