Monday , October 14 2019
Breaking News
Home / महत्वाच्या बातम्या / पेणमधून 50 हजार इकोफ्रेंडली गणेशमूर्ती राज्याबाहेर रवाना

पेणमधून 50 हजार इकोफ्रेंडली गणेशमूर्ती राज्याबाहेर रवाना

पेण ः प्रतिनिधी

यंदाचा गणेशोत्सव 2 सप्टेंबर रोजी लवकर सुरू होत असल्याने पेणच्या गणेशमूर्ती कार्यशाळेत इकोफ्रेंडली गणेशमूर्तींची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पर्यावरणपूरक अशा छोट्या आणि मध्यम उंचीच्या बाप्पांच्या मूर्तींची सर्वत्र विखुरलेल्या गणेशभक्तांकडून मागणी होत असल्यामुळे परराज्यातील मागणीनुसार या गणेशमूर्तींचे वितरण पावसाळ्याआधी त्या त्या राज्यांत करण्याकडे मूर्तिकारांचा कल आहे. पेणमधून सध्या मूर्तींच्या गाड्या भरून भक्तांची ऑर्डर पूर्ण करण्यासाठी गणेशमूर्ती कारागीर प्रयत्नशील आहेत. नोंदविलेल्या ऑर्डरमध्ये गोवा, गुजरात, कर्नाटक, दिल्ली, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या राज्यांत इकोफ्रेंडली (शाडू मातीच्या) मूर्ती पेणमधील गणेशमूर्ती कार्यशाळांमधून रवाना होत आहेत. गोवा आणि गुजरातमधील गणेशभक्तांची इकोफ्रेंडली गणेशमूर्तींना मोठ्या प्रमाणात पसंती असल्याचे मंगेश कला केंद्राचे मूर्तिकार मंगेश हजारे यांनी सांगितले.

यंदाच्या गणेशोत्सवास लवकर प्रारंभ होत असल्याने कार्यशाळांमध्ये नोंदविलेल्या ऑर्डर्स वेगाने पूर्ण करण्यासाठी मूर्तिकार दिवसरात्र कार्यरत आहेत. मान्सूनचे आगमन होण्यापूर्वी इकोफ्रेंडली गणेशमूर्ती त्या त्या राज्यांत पोहचवणे गणेशमूर्ती व्यवसायाच्या द़ृष्टीने फायदेशीर ठरते. इकोफ्रेंडली गणेशमूर्ती नाजूक असल्याने तोडफोड न होता ऑर्डर पोहच करण्यासाठी वितरण व्यवस्थेमधील अनुकूल बाबींचा अभ्यास करून महिनाभरात गणेशमूर्ती मागणी केलेल्या राज्यांकडे रवाना होण्याकरिता मूर्तिकार प्रयत्न करीत असतात.  मंगेश कला केंद्र, दीपक कला केंद्र, मयुरेश कला केंद्र यांसह कोेंबडपाडा, साई मंदिर, नंदीमाळ नाका, कापूरबाग परिसरातील कार्यशाळांमधून इकोफ्रेंडली गणेशमूर्ती रंगवून ती ऑर्डर मागणी केलेल्या राज्यांत पोहच केली जात आहे. कार्यशाळेतील सूत्रांनुसार आतापर्यंत साधारणपणे 50 हजार इकोफ्रेंडली गणेशमूर्ती गुजरात, गोवा, कर्नाटक राज्यांत रवाना झाल्या आहेत. पेण शहरासह पेण ग्रामीणमधील हमरापूर, तांबडशेत, जोहे, कळवे या ठिकाणच्या कार्यशाळांतही शाडूच्या गणेशमूर्ती न रंगवता ऑर्डरनुसार पोहच केल्या जात आहेत. पेणमधील तब्बल 250 कार्यशाळांत शाडूच्या गणेशमूर्ती बनवल्या जातात. यंदा अंदाजे दीड ते दोन लाख इकोफ्रेंडली गणेशमूर्ती तयार करण्याचे उद्दिष्ट मूर्तिकारांनी ठेवले आहे. विसर्जन करताना गणेशभक्तांना मूर्तींबाबत अधिक सावधगिरी बाळगावी लागते. त्यामुळे शाडू मातीपासून कमी उंचीच्या छोट्या व मध्यम आकाराच्या गणेशमूर्ती बनवल्या जातात. पेणच्या कार्यशाळांत इकोफ्रेंडली गणेशमूर्तींना प्रचंड मागणी असूनही मोठ्या प्रमाणात गणेशमूर्ती तयार करणे शक्य होत नाही. याला पर्याय म्हणून प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या गणेशमूर्ती मोठ्या प्रमाणात बनवल्या जातात. बाप्पांच्या मूर्तींचे विसर्जन करताना ती पाण्यात लवकर विरघळावी यासाठी पर्यावरणपूरक अशा इकोफ्रेंडली गणेशमूर्तींची मागणी गणेशभक्तांकडून दरवर्षी केली जाते. त्यानुसार सध्या पेणमधून दररोज आठ ते दहा गाड्या भरून इकोफ्रेंडली गणेशमूर्तींचे वितरण सुरू आहे.

Check Also

कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांना विविध संस्था-संघटनांचा पाठिंबा

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार कार्यसम्राट …

Leave a Reply

Whatsapp