Saturday , August 24 2019
Home / महत्वाच्या बातम्या / क्रीडा / कॅरमपटू जान्हवी मोरेचे अपघाती निधन

कॅरमपटू जान्हवी मोरेचे अपघाती निधन

कल्याण : प्रतिनिधी

महाराष्ट्राची राज्यस्तरीय कॅरमपटू जान्हवी मोरे हिचं रविवारी अपघाती निधन झालं. डोंबिवलीच्या पलावा सर्कल इथे भरधाव टँकरच्या धडकेत जान्हवीचा मृत्यू झाला. 19 वर्षीय जान्हवी ही डोंबिवलीच्या पलावा सिटीमध्ये वास्तव्याला होती. रविवारी आपल्या सहकारी खेळाडूसह सराव करून ती पलावा सर्कलच्या बसस्टॉपकडे जात होती. याच वेळी भरधाव वेगात आलेल्या टँकरने तिला धडक दिली आणि त्यात तिचा जागीच मृत्यू झाला.

डोंबिवलीच्या मॉडेल कॉलेजमध्ये शिकणारी जान्हवी ही सध्या बँक ऑफ इंडियाकडून खेळत होती. अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय कॅरम स्पर्धांमध्ये तिने पदकांची कमाई केली होती, तर काही महिन्यांनी होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेचं विजेतेपद मिळवण्याचं तिचं स्वप्न होतं, मात्र त्यापूर्वीच काळाने तिच्यावर घाला घातला.

जान्हवीच्या मृत्यूप्रकरणी डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी टँकरचालक रोहिदास बटुळे याला अटक केली आहे. या घटनेमुळे डोंबिवलीत हळहळ व्यक्त होतेय. चौदावीत शिकत असलेल्या जान्हवीला तिचे वडील सुनील मोरे यांनी कॅरम खेळण्यासाठी नेहमीच उत्तेजन दिलं. तिच्या पश्चात घरी तिचा लहान भाऊ, आई आणि वडील असा छोटासा परिवार आहे. आज सकाळी 11 वाजता डोंबिवलीत तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. जान्हवीच्या आकस्मित जाण्याने कॅरम क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Check Also

जखमी गोविंदांसाठी मोफत रुग्णवाहिका

नवी मुंबई ः प्रतिनिधी दहीहंडी साजरी करताना दुखापतीचा व अपंगत्वाचा सामना करावा लागतो. अशा वेळी …

Leave a Reply

Whatsapp