Saturday , August 24 2019
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / रायगडात हापूस आंब्यांच्या उत्पादनात वाढ

रायगडात हापूस आंब्यांच्या उत्पादनात वाढ

उरण : प्रतिनिधी

मागील 25 वर्षांपासून उरण तालुका, रायगड जिल्ह्यासह संपूर्ण कोकण विभागात हापूस आंब्याच्या उत्पादनात पहिल्या क्रमांकावर असलेल्या आसिफ शाबाजकार यांच्या रानसई फार्म्सच्या हापूस आंब्यांची आवक यंदा मोठ्या प्रमाणात वाढली असून, 15 फेब्रुवारी 2019 पासून हा रानसई फार्म्सचा हापूस आंबा नवी मुंबई वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये विक्रीसाठी दाखल झाला आहे. हवामानात होणार्‍या बदलांमुळे आणि अचानकपणे होणार्‍या अवकाळी पावसामुळे कोकण विभागातील आंबा उत्पादन यंदा निम्याहून अधिक टक्क्यांहून घटले असतांना मात्र उरण तालुक्यातील रानसई फार्म्स येथे हापूस आंब्याचे उत्पादन गतवर्षी प्रमाणे वाढले आहे.

रानसई फार्म्सचे मालक आसिफ शाबाजकार यांचे वडील अन्वरशेठ शाबाजकार यांनी त्यांच्या सातबारा सदरी असलेल्या उरण तालुक्यातील रानसई धरणाच्या दक्षिणेकडिल माळरानात प्रथम 25 एकर जागेत हापूस आंब्याची बागायत बनविली होती. तेव्हा खर्‍या अर्थाने उरण तालुक्यातील हापूस आंब्याच्या बागायतीला प्रारंभ झाला. त्यांच्या अनुभवाने दिवसेंदिवस रानसई फार्म्स येथील आंबा लागवडीला मोठ्या प्रमाणात कलाटणी मिळाली.अन्वरशेठ शाबाजकर यांनी लावलेल्या रोपट्याचे त्यांच्या हायातीनंतर त्यांचे वारसदार पाल्य आसिफ शाबाजकर यांनी येथील अनुभवी आदिवासी बांधवांच्या सहकार्याने वटवृक्षात रूपांतर केले. सुमारे 170 एकर माळरानात 14 हजार हापूस आंब्यांची लागवड केली असून, यापैकी चार हजार 500 हापूस आंब्याचे वृक्ष दरवर्षी अतिशय गोडव्याची फळे देऊ लागले आहेत.

15 फेब्रुवारी 2019 ते आजपर्यंत सुमारे 14 हजार प्रति चार डझन आंबे असलेल्या पेट्या नवी मुंबई वाशी येथील एपीएमसी फळ मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठविल्या आहेत, तर मे महिन्याच्या अखेरीस आणखी सहा हजार पेट्या हापूस आंब्याच्या पेट्या मिळणार असल्याचा अंदाज रानसई फार्म्सवरील सुपरवायझर मनोज तळेकर यांनी व्यक्त करून यंदा एकूण 20 हजार हापूस आंब्याच्या पेत्यांचे टार्गेट पूर्ण होणार असल्याचे सांगितले.

या कोकण विभागातील पहिल्या क्रमांकावर असलेल्या रानसई फार्म्सच्या आंबा बागायतीच्या मशागतीसाठी दररोज 35 ते 40 आदिवासी कामगार गरजेनुसार ठेवण्यात येत आहेत. चिरनेर गावातील त्यांचे विश्वासू कामगार म्हणून देखभाल करण्यासाठी संतोष चिर्लेकर, प्रमोद फुंडेकर हे दोन तरुण मागील कित्येक वर्षांपासून या फार्म्सवर कार्यरत आहेत, तर आंबा तोडणीसाठी काम करीत असलेले रानसई गावचे अनंत खंडवी, शरद कुर्‍हाडे यांच्यासह सुमारे 80 आदिवासी कामगार कार्यरत आहेत.

Check Also

जखमी गोविंदांसाठी मोफत रुग्णवाहिका

नवी मुंबई ः प्रतिनिधी दहीहंडी साजरी करताना दुखापतीचा व अपंगत्वाचा सामना करावा लागतो. अशा वेळी …

Leave a Reply

Whatsapp