Tuesday , May 21 2019
Breaking News
Home / महत्वाच्या बातम्या / खोपोली पोलिसांनी घडविली माय-लेकराची भेट

खोपोली पोलिसांनी घडविली माय-लेकराची भेट

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी  : पोलिसाच्या खाकी ड्रेसमध्येही एक माणूस आहे, हे खोपोली पोलिसांनी एक मानवतेचे काम करून दाखवून दिले आहे. त्यांनी  ताटातूट झालेल्या मायलेकरांची भेट घडवून आणली आहे. या कामगिरीबद्दल खोपोली पोलिसांचे कौतुक होत आहे.

त्याचं झालं असं की, गेले काही दिवस एक महिला मुंबई – पुणे महामार्गावरील हॉटेल निशिसागरच्या आसपास फिरत असल्याचे दिसून आले. संदीप हरिचंद्र बोर्ले (रा. ठाणेन्हावे, ता. खालापूर) यांनी या महिलेची विचारपूस केली असता, या महिलेचे नाव मीना अबू गोठे (वय 46, रा. देहूगाव, जि. पुणे) असल्याचे समजले. तसेच ती घर सोडून आली असून तिच्याकडे घरच्यांचा मोबाइल नंबर आणि पैसेही नसल्याचे समजले. बोर्ले यांनी सोमवारी (दि. 13) रात्री 11वाजता या महिलेला घेऊन खोपोली पोलीस ठाणे गाठले आणि सारी हकीगत पोलिसांसमोर मांडली. पोलीस निरीक्षक के. एस. हेगाजे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे अंमलदार पंकज खंडागळे आणि त्यांचे सहकारी पोलीस शिपाई प्रदीप खरात, पोलीस नाईक स्वाती मसुगडे यांनी तात्काळ सूत्रे हलविली. पिंपरी चिंचवड पोलीस कंट्रोलरूम आणि देहूरोड पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. तेंव्हा सदर महिला 4 एप्रिल 2019 पासून बेपत्ता झाली असून, त्याबाबत तिचा मुलगा प्रशांत अबू गोठे याने  5 मे 2019 रोजी देहूरोड पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार नोंदविल्याची माहिती मिळाली. सदर महिला सापडली असल्याचे पंकज खंडागळे यांनी देहूरोड पोलीस ठाण्याला कळवले. मग लगेचच या महिलेच्या मुलाशी संपर्क करण्यात आला. आईची माहिती मिळताच मुलगा मंगळवारी (दि. 14) पहाटेच खोपोलीत दाखल झाला. आपल्या आईला सुखरूप पाहून त्याला खूपच आनंद झाला. पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि संदीप बोर्ले यांनी बजावलेली जबाबदार नागरिकाची भूमिका पाहून, त्याला या सर्वांचे किती आभार मानू, असे झाले होते. खोपोली पोलिसांच्या प्रयत्नांमुळेच मला आई मिळाली, असे त्यांनी यावेळी सांगितले. खोपोली पोलिसांच्या या कर्तव्यदक्षतेचे अनेकांनी कौतुक केले.

Check Also

महामार्गावरील अतिक्रमण हटविण्यापूर्वी रहिवाशांचे पुनर्वसन करा ; नगरसेविका दर्शना भोईर यांची पालिकेकडे मागणी

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेतील रस्ता रूंदीकरण करताना झोपडपट्टीधारकांना  आणि दुकानांना हटवण्यापूर्वी त्यांचे योग्य ठिकाणी …

Leave a Reply

Whatsapp