Tuesday , May 21 2019
Breaking News
Home / महत्वाच्या बातम्या / अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्याऐवजी आता अ‍ॅड. प्रदीप घरत मांडणार बाजू ; अश्विनी बिद्रे कुुटुंबीयांची मागणी सरकारने केली मान्य

अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्याऐवजी आता अ‍ॅड. प्रदीप घरत मांडणार बाजू ; अश्विनी बिद्रे कुुटुंबीयांची मागणी सरकारने केली मान्य

मुंबई ः प्रतिनिधी

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात बाजू मांडण्यासाठी आणि आरोपींना शिक्षा होण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. प्रदीप घरत यांची महाराष्ट्र शासनाने नियुक्ती केली आहे, तर सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. संतोष पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरकारी वकील म्हणून आम्हाला उज्ज्वल निकम नको, तर प्रदीप घरत यांची नियुक्ती करावी, अशी मागणी बिद्रे कुटुंबीयांनी केली होती. 19 नोव्हेंबर 2018 रोजी बिद्रे कुटुंबीयांनी शासनाकडे आणि कोर्टाकडे याबाबतची मागणी केली होती.

अभिनेता सलमान खानच्या हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणात सरकारच्या वतीने प्रदीप घरत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, तर पत्रकार जे. डे. हत्याकांडातील आरोपी छोटा राजनला प्रदेशातून आणून त्यांनी शिक्षा लावली आहे. बिद्रे आणि गोरे कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या खटल्याला गती देण्याची विनंती केली होती. अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाचा खटला जलद गतीने चालवावा, अशी मागणी कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात केली होती. त्यानंतर प्रकरणाचा खटला एका वर्षात निकाली काढावा, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते.

15 एप्रिल 2016पासून अश्विनी बिद्रे उर्फ अश्विनी राजू गोरे या नवी मुंबईतील कळंबोलीतून बेपत्ता झाल्या होत्या. त्या बेपत्ता झाल्या नसून वरिष्ठ पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांनी बिद्रेंना बेपत्ता केल्याचा आरोप कुटुंबाने केला होता. या तपासात पोलीस सहकार्य करीत नसल्याचा आरोप सुरुवातीला अश्विनी यांच्या कुटुंबीयांनी केला होता.

अश्विनी बिद्रे 2000 सालापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होत्या. 2005 साली त्यांचा विवाह हातकणंगले गावातील राजू गोरे यांच्यासोबत झाला. लग्न झाल्यानंतर एकाच वर्षात अश्विनी स्पर्धा परीक्षा पास झाल्या आणि त्यांना पोलीस उपनिरीक्षकपद मिळाले होते.

पोलीस दलात रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पुणे आणि त्यानंतर सांगली येथे झाली. या वेळी त्यांची ओळख त्याच पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांच्यासोबत झाली. या दोघांत जवळीक वाढली. त्यानंतर 2013 साली अश्विनी गोरे यांना प्रमोशन मिळाल्याने त्या रत्नागिरीला रुजू झाल्या. येथेही अभय कुरुंदकर अश्विनीला भेटण्यासाठी वारंवार येत होता.

Check Also

महामार्गावरील अतिक्रमण हटविण्यापूर्वी रहिवाशांचे पुनर्वसन करा ; नगरसेविका दर्शना भोईर यांची पालिकेकडे मागणी

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेतील रस्ता रूंदीकरण करताना झोपडपट्टीधारकांना  आणि दुकानांना हटवण्यापूर्वी त्यांचे योग्य ठिकाणी …

Leave a Reply

Whatsapp