मुरूड ः प्रतिनिधी
बुद्धपौर्णिमेच्या मुहूर्तावर फणसाड अभयारण्यातील सर्व वन्यजीवांची प्रगणना करण्यात आली. फणसाड अभयारण्याचे सहाय्य्क वनसंरक्षक बी. बी. बांगर आणि वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अभयारण्यातील कर्मचारी याकामी तैनात करण्यात आले होते. प्रगणनेसाठी निसर्गप्रेमी संघटनेतील सदस्यांचीही मदत घेण्यात आली होती. 14 ट्रॅप कॅमेर्यांसह तज्ज्ञ व्यक्ती नियुक्त करून प्रगणना पूर्ण करण्यात आली. पाण्याच्या ठिकाणी विशिष्ट प्रकारची मचाण करून फणसाडच्या कर्मचार्यांनी रात्रभर पहारा देऊन मोजदाद पूर्ण केली.
अभ्यारण्यातील बिबटे गायब झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, परंतु प्रगणनेवेळी दोन बिबट्यांचे दर्शन झाल्याने जंगलाच्या अतिदाट भागात त्यांचे वास्तव्य दिसून आले. फणसाड अभयारण्यातील भांडव्याचा माळ परिसरात दोन बिबटे आढळले आहेत. सात सांबर, एक भेकर, नऊ रानडुकरे तसेच दुर्मीळ शेकरू प्राण्यांची संख्या नऊ दिसून आली. एक ससा, दोन रानगवे, एक रानमांजर, तीन फ्रॉग माऊथ, एक सालींदर, तीन मुंगूस, 33 माकडे, 31 वानर, 11 रानकोंबडे, सहा मोर, तीन ब्राह्मी घार असे वन्यजीव मोजणीवेळी आढळले आहेत.
प्रगणेबाबत अधिक माहिती देताना फणसाड अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी सांगितले की, सदर वन्यजीव मोजदाद ही त्या दिवशी जेवढे वन्यजीव दिसले त्याप्रमाणे नोंद करण्यात आली. याचा अर्थ अभयारण्यात एवढेच प्राणी आहेत असा नाही. यापेक्षाही जास्त वन्यजीव येथे अस्तित्वात असून जंगलात त्यांचे व्यवस्थित संगोपन होत आहे. प्रगणनेसाठी कर्मचारीवृंद व निसर्गप्रेमी संघटनांनी केलेल्या बहुमूल्य सहकार्याबद्दल त्यांनी विशेष आभार व्यक्त केले आहेत.