Wednesday , January 20 2021
Breaking News
Home / संपादकीय / मोबाईल सांभाळा, अन्यथा पडेल अब्रुवर घाला

मोबाईल सांभाळा, अन्यथा पडेल अब्रुवर घाला

हॅलो, हॅलो… सारख्या सारख्या मिस्कॉलने नम्रताचे (नाव बदलले आहे) मानसिक संतुलन बिघडले होते. सकाळी, संध्याकाळी, बाथरूममध्ये कुठेही अगदी झोपेच्या वेळीही मोबाईलची रिंगटोन ‘कहो ना प्यार है’, कानावर पडत असे. एकदोनदा त्या अनोळखी फोनवर आलेले कॉल नम्रताने उचललेही होते. काही कॉल घरचे किंवा सासरचे असतील असा भास झाल्याने नम्रताने फोन उचललेही होते.

घरी लहान मुल आईविना रडत असेल म्हणून सासू किंवा बहिणीसारखी असणारी नणंद फोन  करून  विचारणा करीत असेल, असा भास झाल्याने, नम्रताने आलेले फोन उचललेही होते. मात्र समोरून अनोळखी 20 ते 21 वर्षाच्या तरुणाचा आवाज येत असे. मला तू खूप आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे या बोलण्यावर नम्रता गप्प बसण्याची भूमिका घेत असे. कोण असेल तो, कशासाठी तो मला छळत असेल असे काहूर आठवडाभर नम्रताच्या मनात उठले होते. कधी, कधी रात्र जागून काढली होती, कोण असेल? या विचारात.

असे चालत असताना नम्रताने एके दिवशी ठाम निर्धार केला की या अविचारी तरुणाला सगळे खरे सांगून, आपली येणार्‍या फोनच्या मिसकॉलमधून सुटका करून घ्यावी. जेणेकरून या विषयावर पडदा पडेल. आणि नेहमीप्रमाणे सकाळी तीन मिसकॉल आले. परंतु जावूदे, असा समज करून नम्रताने त्याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र चौथ्यांदा आलेला फोन नम्रताने उचलला. नम्रताने, हॅलो कोण बोलतंय? असा प्रतिसवाल केला असता. मी… बोलतोय. तू माझे फोन का उचलत नाहीस. मी तुला भेटण्याचा प्रयत्न करीत आहे. तू कुठे आहेस. एवढे दिवस घुटके गिळून बसलेल्या नम्रताचा पारा अचानक चढला, परंतु जावू दे अशी स्वतःची समजूत काढून घेत त्या वाट चुकलेल्या तरुणाला नम्रताने खरी हकीगत सांगितली. बंटी माझे लग्न झाले आहे. मला एक मूल आहे. माझ्या वाटेत येऊ नकोस. मी नोकरी करून कुटुंबाचा भार सोसत आहे. त्यावर त्या अंध तरुणाने उत्तर दिले की काहीही असो. मला तू पाहिजे आहेस. फक्त तू मला माझं म्हण. हे शब्द येताच कुठलीच प्रतिक्रिया न देता, नम्रताने दिवसभर फोन बंद ठेवला. मात्र रात्री सुरु केला. तर पहिला फोन आला तो सकाळच्याच नंबरवरून. आणि किमान 10 मिसकॉल असलेला मेसेजही आला. आत्ता मात्र नम्रताची हद्द झाली. तिने पुन्हा फोन बंद ठेवून दुसर्‍या दिवशी संध्याकाळी सुरु केला. तर तोच फोन खणखणला यावर काही तरी शेवट करायचा म्हणून. नम्रताने रात्री नवर्‍याच्या कानावर ही बाब घालून संपूर्ण हकीगत सांगितली. नवरोबानेही काही वेळ शांत बसून झाली हकीगत विसरून जाण्याचा सल्ला दिला.

आणि मग घडली सत्य घटना… कर्जत पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे-नलावडे  या 10 मे 2019 रोजी खातेनिहाय रात्रीच्या गस्तीवर असताना सरकारी वाहनातून जात असता, रात्री 12.07 मिनिटांनी  पळसदरी पोलीस पाटील विनया खोपकर यांचा फोन आला की, मॅडम एक अघटीत घटना घडली आहे. पोलीस निरीक्षक तानवडे यांनी वाहनचालक जयवंत कोळी व पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत देशमुख यांना गाडी फिरवायला सांगत, डिकसळ गावावरून कर्जतच्या भिसेगाव चौकात येऊन थांबले. तोपर्यंत पोलीस पाटील, तसेच जिल्हा शासकीय अभियोक्ता राजेंद्र येरुणकरही त्या ठिकाणी पोहचले. पोलीस पाटलांनी झालेली हकीगत सांगताच खाकी वर्दीही घडलेल्या प्रसंगाने हेलावली. त्यामध्ये महिला अधिकारी असल्याने महिलांच्या वेदना अगदी जवळून पाहिल्या आहेत. मग पोलीस अधिकारी असले तरी अशा  क्लेशदायक व संतापजनक घटना आपल्या हद्दीत घडली म्हणजे संतापाचा पारा अजून चढला. पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी गुप्त माहितीद्वारे स्थानिक तरुणाचा सहभाग असल्याचे   भिसेगाव पोलीस पाटील यांना सांगितली. पोलीस पथक कर्जत रेल्वे फलाटावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास गेले. यामध्ये  एक महिला व तिच्याबरोबर एक पुरुष तिचा नवरा असावा असे दोघे जण खोपोलीला जाणार्‍या 10.38 च्या लोकलमध्ये बसले असून त्याच बोगीत चालू ट्रेन पकडून दोन तरुण चढल्याचे चित्र स्पष्ट झाल्याने संशयाची पाल क्रांतीनगरमधील त्या तरुणांकडे चुकचुकली.  त्या अगोदर पोलीस निरीक्षक तानवडे यांनी भिसेगाव चौकात चणे विकणारा सुरज चव्हाण सूत्रधार असल्याची  खात्री झाल्याने तपासाची चक्रे फिरू लागली. पोलिसांची तीन पथके तपासणीसाठी फिरू लागली. स्वतः पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी तपासाची सूत्रे हाती घेत पळसदरी मार्गावर गस्ती सुरु केली. त्याच वेळी तीन तरुण एका महिलेला मोटारसायकलवर बसवून कर्जतच्या दिशेने जात असल्याचे दिसताच पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र संधीचा  फायदा घेत एक तरुण उडी मारून पसार झाला. मोटरसायकल सुसाट कर्जतच्या दिशेने निघाली. पोलीस निरीक्षक तानवडे यांनी याची खबर गस्तीवर असणार्‍या पोलिसांना दिल्याने त्यांनीही पाठलाग करून त्या तरुणांना मोटारसायकलसह ताब्यात घेतले. तर घाबरलेल्या महिलेला धीर देत पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी तिला मायने जवळ घेत उभारा दिला. त्या पिडीत महिलेला आपली बहिण भेटल्याची जाणीव होताच आलेल्या संकटाने हंबरडा फोडला. त्या पिडीत महिलेने दिलेली हकीकत व घडलेला प्रकार तसेच पोलिसांनी केलेला पाठलाग व आरोपी पकडण्यासाठी केलीली रात्रीची गस्ती एका सिनेमाची कथा शोभावी अशीच आहे. नम्रता (नाव बदलले आहे) यांनी  दिलेली माहिती थक्क करणारी आहे. माझे माहेर डोलवली,  व्यवसाय स्वयंपाकी असून सध्या नोकरी जासखर उरण येथे करीत आहे. विवाहित असून मुलाला भेटण्यासाठी अधूनमधून डोलवली येथे जात असते. 2 मे 2019 रोजी उरण येथून डोलवली येथे जाण्यासाठी थांबले असता, पती येण्यास उशीर असल्याने रात्री 9 वाजता भूक लागल्याने कर्जत रेल्वे स्थानकाजवळ चायनीज हॉटेलमध्ये राईस खात बसले असता अनोळखी तरूण येत माझ्या भ्रमणध्वनीवरून कोणाला तरी फोन केला असता मी त्याला जाब विचारला व फैलावर घेतले. मात्र दुसर्‍या दिवशी उरण येथे गेले असता माझ्या मोबाईलवर 7262889233 व 9172333122 या मोबाईलवरून सतत फोन आले पण त्यास दाद दिली नाही. मात्र वारंवार फोन  येत असल्याने मी त्याला असे न करण्याचा सल्ला दिला. ही घटना मी माझ्या पतीला दिल्याचे नम्रताने  सांगितले. माझे पती व मी जासखर उरण येथे रात्री राहून सकाळी कर्जत येथील कामे करून रात्री कर्जत रेल्वे स्थानकावर येत असताना भिसेगाव रिक्षा स्टँडवर आले असता चणेवाला दुकानासमोर आले असता एका मुलाने दम देण्यास सुरुवात केली, तू माझा फोन का उचलत नाहीस, माझ्या  कोणी नादाला  लागत नाही. माझे नाव सुरज आहे. फोन उचलला नाहीस तर जीवे ठार मारून टाकीन असा दम दिला. त्याला विनवणी केली की माझ्याबरोबर माझे पती आहेत, तुझ्या तोंडाला मला लागायचे नाही मला जावू दे. तेव्हा समजले की वारंवार फोन करणारा हाच सुरज आहे. मात्र त्या शब्दाला व नवर्‍याला न जुमानता  माझ्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला मात्र रात्रीची वेळ व खोपोली लोकल येण्याची वेळ झाल्याने मी व माझे पती असे दोघे रेल्वे स्थानकात येत फलाटावर आलेल्या सुरज व त्याच्या मित्रांनी केलेल्या छेडछाडीचा प्रकार रेल्वे पोलिसांना सांगितला. दरम्यान, 10.40 ची खोपोली लोकल आल्याने मी व माझे पती लोकलमध्ये बसलो, मात्र लोकल सुरु झाली असता सुरज व त्याचा मित्र चालू लोकलमध्ये शिरून मला व माझ्या पतीला मारहाण करू लागले. त्याच दरम्यान सुरजने मोबाईलवरून कोणाला तरी पळसदरी रेल्वे स्टेशनवर गाडी घेऊन येण्यास सांगितले. पळसदरी  रेल्वे स्टेशन आले असता दोघांनी मला रेल्वे डब्याच्या बाहेर ढकलून दिले व पतीला जबर उतरू दिले नाही. ट्रेन निघून गेली त्या ट्रेनमध्ये माझे पतीही गेले. मला सुरज व त्याच्या मित्राने खेचत नेत एका मोटारसायकलवर चारजण बसवून माझे हात सुरजने घट्ट पकडून वेताळ मंदिराच्या डोंगरावर नेले व माझे कपडे काढून माझ्या मनाविरुद्ध जबरी संभोग केला. सुरजने मित्रांनाही खुश करण्याचा दिलेला सल्ला मी मानला नाही. त्यानंतर सुरजने मला कर्जत रेल्वे स्टेशनकडे घेऊन आला. भिसेगाव येथे पोलिसांनी सुरज व त्याच्या मित्राला ताब्यात घेत आम्हाला पोलीस ठाण्यात नेत मी झालेला प्रसंग सांगितला. कर्जत पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी आमची जबानी घेत रितसर तक्रार दाखल करून घेतली. कर्जत पोलिसांत कर्जत पोलीस ठाण्यात आरोपी सुरज अमरजित चव्हाण (20, भिसेगाव), अजय प्रताप राठोड (19, क्रांतीनगर), बबलू अशोक सिंह (18, पुलाचीवाडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

-अरूण नलावडे, फिरस्ती

Check Also

महालसीकरण मोहीम

गेल्या अनेक महिन्यांपासून देशवासीयांना ज्याची प्रतीक्षा होती ती कोरोना प्रतिबंधक लस अखेर उपलब्ध झाली आहे. …

Leave a Reply

Whatsapp