Friday , May 29 2020
Home / महत्वाच्या बातम्या / विकासाची गंगा

विकासाची गंगा

मुंबईच्या आसपासच्या परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये धोरणांचा अधिक चांगला समन्वय व अंमलबजावणी व्हावी याकरिता राज्य सरकारकडून हे प्रशासकीय मॉडेल स्वीकारण्यात आले आहे. मुळातच वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यास मुंबईचा भुप्रदेश अपुरा पडू लागल्यावर आसपासच्या परिसराचा विकास नियोजनपूर्वक करण्याकरिताच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली होती.

मुंबई आणि आसपासचा परिसर नियोजनबद्ध विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहे आणि विकास योजनांच्या या नकाशावर पनवेलचे स्थान निश्चितपणे अगदी ठळक असेच आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची अर्थात एमएमआरडीएची सीमा वाढवण्यास बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे वसई, पनवेल, अलिबाग, खालापूर व पेण तालुक्याचा उर्वरित भाग तसेच पालघर तालुका पूर्णपणे मुंबई महानगर प्रदेशात समाविष्ट होणार आहे. या निर्णयामुळे मुंबई महानगर प्रदेशात 2 हजार चौरस किलोमीटरची वाढ होणार असून या नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या भागांमध्ये विकासकामांकरिता  एमएमआरडीएकडून मोठा निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. 1967 मध्ये मुंबई महानगर प्रदेशचे भौगोलिक क्षेत्र 3965 चौरस किलोमीटर होते. नंतर त्यात आणखी वाढ होऊन ते 4355 चौ.कि.मी. करण्यात आले. यात प्रामुख्याने पेण व अलिबाग तालुक्याचा काही भाग समाविष्ट करण्यात आला होता. मुंबई महानगर प्रदेशात प्रस्तावित असलेल्या विकासाच्या विविध मेगाप्रकल्पांमुळेच ही हद्द वाढवण्याची मागणी केली जात होती. या विकासप्रकल्पांच्या नावांवरून निव्वळ नजर टाकली तरी हे प्रकल्प येत्या काही वर्षांत या संपूर्ण परिसराचा चेहरामोहराच पार बदलून टाकतील याची खात्री पटते. पनवेलच्या संदर्भात बोलायचे झाले तर यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचे नाव सर्वात आधी घ्यावे लागेल. या प्रदेशातील अन्य मेगाप्रकल्पांमध्ये मुंबई-ट्रान्सहार्बर लिंक, विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉर, पनवेल-वाशी मेट्रो मार्ग आदींचा उल्लेख करावाच लागेल. या सर्व प्रकल्पांमुळे परिसरातील बांधकामक्षेत्राची नजर तर कधीचीच पनवेलकडे वळलेली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तसेच सायन-पनवेल महामार्गाच्या समीप असलेले पनवेल हे मुंबई आणि पुणे या दोन्ही महत्त्वाच्या शहरांना वेगाने गाठण्याच्या दृष्टीने अत्यंत सोयीचे आहे. नियोजितपणे विकास करण्यात आलेले, हिरवाईने वेढलेले पनवेल हे आधीपासूनच मुंबईच्या आसपास घराच्या शोधात असणार्‍यांच्या पसंतीचे शहर होतेच. त्यात आता या प्रस्तावित मेगाप्रकल्पांमुळे पनवेल हे बांधकाम क्षेत्रातील गुंतवणुकीचा सर्वोत्तम परतावा देणारे शहर ठरणार असल्याचा बोलबाला याआधीच सुरू झाला आहे. ज्या दिवशी या निर्णयाची बातमी आली त्याच दिवशी इकडे पनवेल महापालिकेनेही आपल्या क्षेत्रातील चार गावे स्मार्ट व्हिलेज करण्याचा निर्णय घेतला. आपल्या क्षेत्रातील गावे स्मार्ट करण्यासाठी धोरण ठरवणारी पनवेल ही एकमेव महापालिका ठरली आहे. एकुणातच पनवेलमध्ये विकासाची गंगा जोमाने वाहते आहे याचेच हे द्योतक आहे. टप्प्याटप्प्याने 29 गावे या धर्तीवर विकसित केली जाणार आहेत. शहरांच्या धर्तीवर गावे देखील विकसित करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा हा प्रयत्न इतरांकरिताही आदर्शवत ठरावा.

Check Also

मुरूडमध्ये पर्स चोरांना अटक

मुरूड : प्रतिनिधी – मोबाइल असलेली पर्स चोरल्याप्रकरणी दोन जणांना मुरूड पोलिसांनी अटक केली असून, …

Leave a Reply

Whatsapp