Friday , September 20 2019
Breaking News
Home / महत्वाच्या बातम्या / क्रीडा / भारताचे ऑस्ट्रेलियापुढे 353 धावांचे आव्हान

भारताचे ऑस्ट्रेलियापुढे 353 धावांचे आव्हान

ओव्हल : वृत्तसंस्था

शिखर धवनचं दमदार शतक आणि कर्णधार कोहलीच्या तडफदार 82 धावांच्या जोरावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 353 धावांचं आव्हान दिलं आहे.

फलंदाजांना पोषक असलेल्या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकून कर्णधार विराट कोहलीनं फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी ऑसी गोलंदाजांची धुलाई करताना भारतासाठी मजबूत पाया रचला. त्यानंतर कर्णधार कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी दमदार खेळ करत भारतीय संघाला 5 बाद 352 धावांपर्यंत मजल मारून दिली. भारताची ही वर्ल्ड कप स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धची

सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी भारतने 1987 मध्ये दिल्लीत 6 बाद 289 धावा केल्या होत्या, तसेच वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्याही संघानं केलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.

रोहितला दोन धावांवर असताना कोल्टर नीलकडून जीवदान मिळाले. त्यानंतर रोहितनं संयमी खेळावर भर दिला, परंतु दुसर्‍या बाजूनं धवन फटकेबाजी करत होता. या दोघांनी वन डे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक यशस्वी जोडीचा मान पटकावला. त्यानंतर धवनने कर्णधार कोहलीसह 93 धावांची भागीदारी केली आणि संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल करून दिली. रोहितनं 70 चेंडूंत 3 चौकार व 1 षटकार खेचून 57 धावा केल्या. धवनची 117 धावांची खेळी मिचेल स्टार्कने संपुष्टात आणली.

धवन माघारी परतल्यानंतर कोहली व हार्दिक पांड्या जोडीनं अखेरच्या 10 षटकांत तुफान फटकेबाजी केली. दरम्यान, कोहलीनं 50 धावा केल्या, त्यानं अर्धशतकाचे अर्धशतक पूर्ण केले. पांड्यानंही आतषबाजी करताना 27 चेंडूंत 48 धावा चोपल्या. पॅट कमिन्सने त्याला कर्णधार अ‍ॅरोन फिंचकरवी झेलबाद केले. कोहली व पांड्यानं 81 धावांची भागीदारी केली. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीनंही हात धुऊन घेतले. त्यानं 14 चेंडूंत 27 धावा केल्या. कोहलीची फटकेबाजी 82 धावांवर स्टॉइनिसने रोखली. वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्याही संघाने केलेली आजची ही सर्वोत्तम खेळी ठरली. यापूर्वी 2015 मध्ये सिडनीत श्रीलंकेने 312 धावा केल्या होत्या. भारताने तो विक्रम आज मोडला.

– रोहितनं मोडला तेंडुलकर, रिचर्ड यांचा विक्रम

ओव्हल : वृत्तसंस्था

हिटमॅन रोहित शर्माने रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात विक्रमाला गवसणी घातली. त्याने फलंदाज सचिन तेंडुलकर आणि व्हीव्ह रिचर्ड यांचा विक्रम मोडण्याचा पराक्रम केला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात 20वी धाव घेताच रोहितनं हा विक्रम केला.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत जिगरबाज शतकी खेळी करणार्‍या रोहितच्या कामगिरीकडे आज सर्वांचे लक्ष आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहितची कामगिरी नेहमीच दमदार झाली आहे. आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन हजार धावांचा टप्पा ओलांडण्यासाठी रोहितला केवळ 20 धावांची गरज होती. त्यामुळे आज रोहितने 20 धावा फटकावल्यावर तो वन डे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन हजार धावा फटकावणार्‍या सचिन तेंडुलकर, व्हीव रिचर्डस आणि डेसमंड हेन्स या मोजक्या फलंदाजांच्या क्लबमध्ये दाखल झाला.

विशेष बाब म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात वेगाने दोन हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रमही रोहितच्या नावावर झाला. आतापर्यंत व्हीव रिचर्ड्स यांनी 45 डावांत, सचिन तेंडुलकरने 51 डावांत आणि डेसमंड हेन्स यांनी 59 डावांत ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन हजार धावा फटकावल्या आहेत. मात्र रोहितने आतापर्यंत केवळ 37 डावांमध्येच 61.87 च्या जबरदस्त सरासरीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1980 धावा फटकावल्या होत्या आणि त्यानं आजच्या सामन्यात 20 धावा करून 2000 धावांचा पल्ला पार केला.

– धवनच्या शतकी खेळीने पाँटिंग, संगकारालाही टाकले मागे

ओव्हल : वृत्तसंस्था

भारताचा सलामीवीर शिखर धवनला अखेर सूर सापडला आहे. विश्वचषक

स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शिखरने शतक झळकावत दमदार पुनरागमन केलं आहे. रोहित शर्माच्या साथीने शिखर धवनने भारतीय संघाला भक्कम सुरुवात करून दिली. या दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारीही झाली. रोहित शर्मा अर्धशतक झळकावून माघारी परतल्यानंतर शिखरने कर्णधार विराट कोहलीच्या साथीने संघाचा डाव सावरत आपलं शतक झळकावलं.

या खेळीदरम्यान शिखरने एका विक्रमाची नोंद केली आहे. आयसीसी टुर्नामेंटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणार्‍या फलंदाजांच्या यादीत शिखर धवन तिसर्‍या स्थानी पोहचला आहे. शिखरचं 20 डावांमधलं हे सहावं शतक ठरलं. शिखरने रिकी पाँटिंग आणि कुमार संगकाराचा विक्रम मोडला. संगकाराने 56; तर रिकी पाँटिंगने 60 धावांमध्ये 6 शतकं झळकावली होती. या यादीमध्ये आता सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर हे फलंदाज शिखर धवनच्या पुढे आहेत.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या सामन्यात शिखरला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नव्हता, मात्र दुसर्‍याच सामन्यात दमदार पुनरागमन करत शिखरने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे.

Check Also

गव्हाणच्या ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये शिक्षक-पालक मेळावा यशस्वी

पनवेल ः रामप्रहर वृत्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. …

Leave a Reply

Whatsapp