Friday , September 20 2019
Breaking News
Home / महत्वाच्या बातम्या / शिक्षा अपुरीच

शिक्षा अपुरीच

जेव्हा रक्षकच भक्षक बनतात, तेव्हा न्याय मिळणे आणखीन  दुरापास्त होते. खरंतर अशा प्रकरणातील बळी आसिफा असो किंवा ट्विंकल वा गुडीया तसेच ती कठुआची असो अथवा अलिगढ, भोपाळ, उन्नाव किंवा मुंबईची असो राजकारण व धर्म यांचा संबंध अशा घटनांशी कदापिही जोडता कामा नये.

जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील आठ वर्षांच्या गोडगोजर्‍या आसिफाचे अपहरण करून तिला कोंडून ठेवून पुन्हा पुन्हा तिच्यावर बलात्कार केल्यानंतर तितक्याच निर्घृणपणे तिची हत्या करण्याच्या घटनेला 17 महिने लोटले असतानाच सोमवारी पठाणकोट येथील सत्र न्यायालयाने या प्रकरणातील सहा आरोपींना दोषी ठरवले. यापैकी तिघांना बलात्कार व हत्या केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली असून, अन्य तिघांना पुरावे नष्ट केल्याप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. पुरावे नष्ट करणारे तिघेही आरोपी जम्मू-काश्मीरच्या पोलीस दलाचे कर्मचारी आहेत. समाजात जणू काही कुठल्याही कायद्याचे अस्तित्वच नसल्यासारखे वर्तन या प्रकरणातील आरोपींकडून घडले, असेही मत न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावताना व्यक्त केले. या प्रकरणातील आरोपींनी लहानग्या आसिफाचे अपहरण करून तिला एका मंदिराच्या परिसरात कोंडून ठेवले, तसेच बळजबरीने अमली पदार्थ देऊन आणि उपाशी ठेवून त्यांनी तिच्या लहानग्या देहावर अत्याचार केले. 10 जानेवारी 2018 रोजी बेपत्ता झालेल्या आसिफाचा मृतदेह सात दिवसांनंतर नजीकच्या जंगल परिसरात आढळला होता. संपूर्ण देशाला सुन्न करून टाकणारे हे पाशवी वर्तन करणार्‍यांमध्ये मंदिरातील कर्मचारी, एक निवृत्त पोलीस अधिकारी आणि तीन पोलीस शिपाई यांच्यासह एका विद्यार्थ्याचाही समावेश आहे. ही घटना घडल्याचे कळाल्यानंतर आठ वर्षांच्या आसिफाचा हसरा चेहरा पाहून देशभरातील सर्वसामान्यांच्या मनाचा थरकाप उडाला, परंतु निर्ढावलेल्या व राजकारणापुढे कशाचे सोयरसुतक नसलेल्या काही मंडळींनी या घटनेलाही जातीय वळण दिले आणि असे काही घडलेच नाही, अशी आवई उठवत आरोपींचा बचाव करण्याचा पवित्रा घेतला, परंतु वकील दीपिका राजावत यांच्या रूपाने जणू ईश्वरच आसिफाला किमान मृत्यूनंतर तरी न्याय मिळावा म्हणून पुढे सरसावला आणि हे प्रकरण घटनास्थळापासून दूर असलेल्या पठाणकोट न्यायालयात वर्ग करण्यात आले. जम्मू-काश्मीर राज्याच्या पोलिसांनी मात्र सर्व तर्‍हेचे सामाजिक आणि राजकीयदबाव बाजूला ठेवून शिताफीने प्रकरणाचा तपास केला आणि भरभक्कम पुरावे न्यायालयासमोर ठेवले. त्यामुळेच या प्रकरणातील खटला 17 महिन्यांत निकाली निघणे शक्य झाले. 2005मध्ये आपल्या देशातील नॅशनल क्राईम ब्युरोकडील आकडेवारीनुसार देशात दर तासाला एका मुलीवर बलात्कार होत होता. हे प्रमाण 2016 साली तासाला दोन मुलींवर बलात्कार इथपर्यंत पोहचलेले दिसते. 2016पर्यंतचीच आकडेवारी

ब्युरोकडे उपलब्ध आहे. बलात्कार्‍यांना कठोरात कठोर शासन झालेच पाहिजे, या मागणीचा रेटा लोकांकडून वाढत आहे. आसिफासारख्या निरागस मुलीवर वारंवार बलात्कार करून हत्या करताना क्रौयाची परिसीमा गाठणार्‍या आरोपींना तर देहदंडाची शिक्षादेखील अपुरीच ठरते.

Check Also

गव्हाणच्या ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये शिक्षक-पालक मेळावा यशस्वी

पनवेल ः रामप्रहर वृत्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. …

Leave a Reply

Whatsapp