Thursday , June 20 2019
Breaking News
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / बोकडविरा ग्रा.पं. कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा

बोकडविरा ग्रा.पं. कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा

उरण : प्रतिनिधी

उरण तालुक्यातील बोकडविरा गावच्या ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा माजी ग्रामपंचायत सदस्य व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गजानन शंकर पाटील हे अलीकडे ग्रामपंचायतीने केलेल्या हलगर्जीपणाचा बळी ठरले आहेत. आपल्या न्याय्य हक्क मागणीसाठी 12 जूनपासून बोकडविरा ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे. बोकडविरा ग्रामपंचायत त्यांच्या या प्रश्नावर काय तोडगा काढते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.

गजानन पाटील हे बोकडविरा गावचे स्थानिक प्रकल्पग्रस्त असून त्यांच्या घरासमोरून पावसाळी पाणी वाहून नेणारा नाला जो मुख्य नाल्याला मिळतो हा नाला भराव टाकल्यामुळे बुजला आहे. हा नाला नाल्यावरील भरावाचे अतिक्रमण दूर करून अथवा त्या ठिकाणी योग्य त्या प्रकारचे पाईप टाकून पावसाळी पाणी वाहून नेण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी गजानन पाटील हे गेली काही वर्ष करीत आहे, परंतु त्यांच्या मागणीला हेतुपुरस्सर ग्रामपंचायत टाळाटाळ करीत आहे.

त्यांनी हा बुजवण्यात आलेला पारंपरिक नाला पूर्वरत चालू करण्यासाठी ग्रामपंचायतीला वेळोवेळी लेखी निवेदन दिले, चर्चा केल्या. त्याचप्रमाणे सिडको अभियंत्यांनासुद्धा याबाबत गजानन पाटील यांनी पूर्वकल्पना दिली. वेळेवर पावसाळी पाणी वाहून नेणारा हा नाला खोदला गेला नाही, तर पावसाळ्यात गजानन पाटील यांच्या घरात पाणी शिरण्याचा मोठा धोका निर्माण झाला असून, त्यामुळे वित्तहानी अथवा जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला असल्याने गजानन पाटील यांनी ग्रामपंचायतीस वेळोवेळी साकडे घातले होते. मनमानी कारभार करणार्‍या ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केले असल्याचे गजानन पाटील यांचे मत असून याअगोदर श्री. पाटील यांनी दि. 1 मे 2019 रोजी यासंदर्भात उपोषण करण्याचे पत्र दिले होते.

ग्रामपंचायतीने आचारसंहिता असल्याने काम करता येणार नसल्याचे लेखी पत्र देऊन तूर्त उपोषण मागे घ्यावे, अशी लेखी विनंती केल्याने व आचारसंहिता संपताच नाल्याचे काम करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने गजानन पाटील यांनी सरपंच आणि ग्रामपंचायतीच्या विनंतीस मान देऊन उपोषण स्थगित केले होते, मात्र आचारसंहिता संपल्यानंतरही आणि काही दिवसात पावसाळा सुरू होणार असे असतानाही नाल्याचे काम अजून सुरू न केल्याने गजानन पाटील हे नाईलाजाने येत्या 12 जून 2019 पासून ग्रामपंचायत बोकडविरा कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा शेवटी गजानन पाटील यांनी दिला आहे.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभिनंदन

उरण : न्हवा शिवडी सागरी सेतू प्रकल्पबाधितांना त्यांचा मोबदला मिळण्यास सुरुवात झाली आहे. सागरी सेतू …

Leave a Reply

Whatsapp