Friday , September 20 2019
Breaking News
Home / महत्वाच्या बातम्या / कचर्‍याचेही व्यवस्थापन हवे

कचर्‍याचेही व्यवस्थापन हवे

झपाट्याने होणार्‍या शहरीकरणामुळे देशात कचर्‍याची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवली आहे. या कचर्‍याचे व्यवस्थापन हे एक मोठे आव्हान आहे. दरवर्षी 7935 शहरांतील 377 दशलक्ष लोकसंख्येद्वारे साधारणपणे 62 दशलक्ष टन कचरा निर्माण केला जातो. यात घनकचर्‍याचे प्रमाण जास्त आहे. 62 दशलक्ष टन कचर्‍यापैकी 43 दशलक्ष टन कचरा हा शब्दशः गोळा केला जातो. 11.9 दशलक्ष टन कचर्‍यावर प्रक्रिया केली जाते आणि 31 दशलक्ष टन कचरा ठिकठिकाणी भरावासाठी

टाकला जातो.

कचरा व्यवस्थापनाच्या चार पद्धती आहेत. भरावासाठी कचरा वापरणे, जाळून नष्ट करणे, पुनर्वापर करणे, खत म्हणून वापरणे. सर्वात जास्त वापरला जाणारा पर्याय आहे तो म्हणजे कचरा जाळणे, पण त्यासाठी बराच खर्च होतो. कचरा जाळण्यामुळे त्याचे आकारमान 97 टक्के कमी करता येते आणि त्याचे योग्य व्यवस्थापन करता येते. कचरा जाळण्याची ही पद्धत म्हणजे कचरा व्यवस्थापनासाठीची सर्वाधिक परिणामकारक पद्धत आहे. अनेक देशांमध्ये विशेषतः आरोग्याशी संबंधित कचर्‍याचे व्यवस्थापन करण्यासाठी उष्मायन तंत्रज्ञान प्राधान्याने वापरले जात आहे.

कचरा व्यवस्थापनासाठी वापरली जाणारी उष्मायन तंत्रज्ञान पद्धती पूर्णपणे पर्यावरणपूरक, वैज्ञानिक, उत्पादनशील आणि विषारी

कचर्‍यावरही परिणामकारक उपाय ठरणारी अशी आहे. तीन प्रकारचा कचरा जाळता येतो. घनकचरा, विषारी आणि अनारोग्यकारक कचरा, वैद्यकीय कचरा.

भरावासाठी जागेच्या कमतरतेवर उपाय आणि घनकचर्‍याचे आकारमान कमी करण्यासाठी उष्मायन तंत्रज्ञान उपयुक्त आहे. कचर्‍याची वाहतूक करण्याचा खर्च कमी करण्यासाठी कचरा तयार होणार्‍या ठिकाणाजवळ व भराव करावयाच्या जागेजवळ उष्मायन प्रकल्प उभारणे हा चांगला उपाय आहे.

 उष्मायन प्रकल्पातील कचर्‍याचे अवशेष पुन्हा वापरणेही शक्य आहे. उष्मायन प्रकल्पातील ज्वलनामुळे निर्माण होणारी ऊर्जा पुन्हा त्याच प्रकल्पासाठी ऊर्जास्त्रोत म्हणून वापरता येऊ शकते. उष्मायन प्रकल्पातील राखेपासून बांधकाम उद्योगाला लागणार्‍या विटा बनविता येतात. अशा प्रकारचे प्रकल्प राबविणारे अनेक उद्योग सध्या अस्तित्वात आहेत.

उष्मायन प्रकल्पातून ऊर्जानिर्मिती करणार्‍या प्रकल्पांचा सध्या भारतात शासनाकडून पुरस्कार आणि पाठपुरावा केला जात आहे. भरावासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे कचर्‍याच्या व्यवस्थापनात अनेक शहरांमध्ये अडचण येत आहे. अशा ठिकाणी उष्मायन प्रकल्पातून या कचर्‍याची विल्हेवाट लावणे हाच वास्तविक आणि परिणामकारक उपाय आहे. अनेक युरोपियन देश सध्या असे आहेत जे कचर्‍यापासून ऊर्जानिर्मिती करण्यासाठीच्या प्रकल्पांना प्राधान्य आणि पाठिंबा देत आहेत. अशा प्रकारच्या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक खर्च होत असल्याने प्रत्येक ठिकाणी अशा प्रकल्पांच्या उभारणीसाठी काही दशके जावी लागतील. सॅनिटरी नॅपकिन्स आणि डायपर्स यांची योग्य तर्‍हेने विल्हेवाट न लावल्यास ते लोकांच्या आरोग्यासाठी घातक आहेत. मासिक पाळीसंदर्भातील जनजागृतीमुळे महिला वापरत असलेल्या सॅनिटरी पॅड्सचा कचरा दिवसेंदिवस वाढत आहे. या समस्येवर उपाय म्हणून सॅनिटरी नॅपकिन्सवर ज्वलनप्रक्रिया करणारे प्रकल्प, यंत्रसामग्री उभारण्यासाठी  शासकीय पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. ही यंत्रे म्हणजे एक छोटीशी भट्टीच असते जी अगदी स्वच्छतागृहातही लावणे शक्य असते आणि जिचा उभारणी खर्च 50 हजारांपर्यंत असतो. -चिराग पाटील, माजी विद्यार्थी, मुंबई विद्यापीठ आणि आयआयटी खरगपूर

Check Also

गव्हाणच्या ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये शिक्षक-पालक मेळावा यशस्वी

पनवेल ः रामप्रहर वृत्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. …

Leave a Reply

Whatsapp