Saturday , August 24 2019
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / मेट्रो मार्ग क्र. 2-3चे काम लवकरच सुरू

मेट्रो मार्ग क्र. 2-3चे काम लवकरच सुरू

आमदार प्रशांत ठाकूर यांची माहिती

पनवेल ः प्रतिनिधी

सिडको महामंडळातर्फे नवी मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पातील मार्ग क्र. 2 व 3 विकसित करण्याचे काम दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (डीएमआरसी) यांना देण्यात आले आहे, असे सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. सिडको संचालक मंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत या प्रस्तावास तत्त्वत: मंजुरी देण्यात आली. सदर मेट्रो मार्ग विकसित करण्याचे काम डिपॉझिट टर्म तत्त्वावर डीएमआरसीला सोपविण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनातर्फे नवी मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पाची सिडकोच्या माध्यमातून अंमलबजावणी करण्यात येत आहे. नवी मुंबईतील विविध नोड्स परस्परांना तसेच उर्वरित मुंबई महानगर प्रदेशास अधिक सुलभरित्या जोडले जावेत व नवी मुंबईतील नागरिकांना शहरांतर्गत वाहतुकीचा जलद पर्याय उपलब्ध व्हावा याकरिता सन 2011पासून सिडकोतर्फे उन्नत मेट्रो रेल्वेमार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. नवी

मुंबई मेट्रो रेल प्रकल्प मार्ग क्र. 1 आणि 2 याकरिता सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांना 2009-10साली देण्यात आले होते. त्यानंतर नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. 3 व 4 याकरिता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे आणि मार्ग क्र. 2करिता आधी तयार केलेल्या डीपीआरचे प्रमाणीकरण करण्याचे काम मे. राईट्स यांना 2017 साली देण्यात आले होते. त्यानुसार नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत मार्ग क्र. 1-बेलापूर ते पेंधर (11 किमी), मार्ग क्र. 2-खांदेश्वर ते तळोजा एमआयडीसी (7.12 किमी), मार्ग क्र. 3-पेंधर ते तळोजा एमआयडीसी (3.87 किमी) आणि मार्ग क्र. 4- खांदेश्वर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (4.17 किमी) असे एकूण चार मार्ग प्रस्तावित आहेत.

उपरोक्त मार्ग क्र. 1वर 11 स्थानके आणि एक आगर आहे. या मार्गाचे काम प्रगतिपथावर असून त्याकरिता 3063.63 कोटी इतका खर्च अंदाजित आहे. या मार्गावर चालविण्यात येणार्‍या मेट्रोचे चीनहून आयात करण्यात आलेले सहा डबेही तळोजा आगर येथे दाखल झाले आहेत. नोव्हेंबर 2019मध्ये या मार्गावर मेट्रोची चाचणी होणे अपेक्षित आहे. मे. राईट्स यांनी सादर केलेल्या डीपीआरला सिडकोतर्फे नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. मार्ग क्र. 2 आणि 3करिता अनुक्रमे 2820.20 कोटी व 1750.14 कोटी इतका खर्च अंदाजित आहे. मार्ग क्र. 4च्या उभारणीबाबत पुढील मंजुरी प्राप्त झाल्यानंतर आवश्यकतेनुसार नियोजन करण्यात येईल.

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने दिल्लीमध्ये 373 किमीची 271 स्थानके असलेले मेट्रो मार्गांचे जाळे विकसित करून दिल्लीतील नागरिकांसाठी सार्वजनिक वाहतुकीचा एक सक्षम पर्याय उपलब्ध करून दिला आहे. मेट्रो मार्ग विकसित करण्याबरोबरच प्रदूषण नियंत्रण आणि वाहतूक कोंडी या क्षेत्रातही डीएमआरसीने भरीव योगदान दिले आहे. डीएमआरसीचा मेट्रो रेल्वे विकास व कार्यान्वयनाचा दीर्घ अनुभव लक्षात घेऊन नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. 2 व 3च्या अंमलबजावणीचे काम डीएमआरसीला देण्यात आले आहे. सदर कामाचे स्वरूप व व्याप्ती, प्रकल्पासंदर्भात डीएमआरसी व सिडको यांच्यावरील जबाबदारी निश्चित करणे, केंद्र शासनाकडून आर्थिक साहाय्य व अलाइनमेंट नोटीफिकेशन प्राप्त करणे आदी बाबी डीएमआरसीबरोबर

चर्चा करून ठरविण्यात येतील. यासंदर्भात व्यवस्थापकीय संचालक, डीएमआरसी यांना अटी व शर्ती तसेच मसुदा करार तयार करण्याबाबतचे विनंतीपत्र पाठविण्यात आले आहे. डीएमआरसीने तयार केलेल्या सदर मसुदा कराराचे त्यानंतर सिडकोतर्फे अंतिमीकरण करण्यात येईल.

Check Also

जखमी गोविंदांसाठी मोफत रुग्णवाहिका

नवी मुंबई ः प्रतिनिधी दहीहंडी साजरी करताना दुखापतीचा व अपंगत्वाचा सामना करावा लागतो. अशा वेळी …

Leave a Reply

Whatsapp