Saturday , October 16 2021
Breaking News

पर्यटकांना खुणावतेय गाढेश्वर धरण

पनवेल : बातमीदार – पावसाचे दिवस असल्याने तालुक्यातील गाढेश्वर धरण परिसर पर्यटकांना खुणावत आहे. निसर्गाचे सान्निध्य, हिरवाई, चारही बाजूने डोंगरांच्या रांगा, त्यामध्ये धरणातून धबधब्यासारखे पडणारे पाणी यामुळे पर्यटक या धरणाकडे अधिक आकर्षित  होतात, मात्र मद्याच्या नशेत पाण्याचा अंदाज येत नसल्याने जीव गमावल्याच्या घटना दरवर्षी येथे घडत आहेत. त्यामुळे या वर्षी धरणाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. रविवारी (दि. 30) येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक आले होते.

तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गाढेश्वर (देहरंग) धरणाचा समावेश होतो. पावसाळ्यात लाखोंच्या संख्येने पर्यटक धरण परिसरात येत असतात. पनवेलपासून 16 किमी अंतरावर असलेल्या माथेरानच्या पायथ्याशी पनवेल महानगरपालिकेच्या मालकीचे हे धरण आहे. शनिवार आणि रविवार सुटीचा वार म्हटला की हजारोंच्या संख्येने पर्यटक या धरणांत मौजमजा करण्यासाठी येतात. काही पर्यटक आपल्या कुटुंबासह या परिसरात येत असतात, मात्र मद्याच्या नशेत पावसाचा आनंद घेत काही जण खोलगट असलेल्या पाण्यात जातात. येथील पाण्याचा अंदाज न आल्याने गेल्या काही वर्षांपूर्वी अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. नदीपात्रात बर्‍याच ठिकाणी मोठे व खोल डोह असल्याने ते समजून येत नाहीत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव याही वर्षी गाढेश्वर धरणावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

Check Also

सात नव्या संरक्षण उत्पादन कंपन्या पंतप्रधान मोदींकडून राष्ट्राला समर्पित

दसर्‍याच्या मुहूर्तावर व्यापक सुधारणांना प्रारंभ नवी दिल्ली : वृत्तसंस्था दसर्‍याच्या निमित्ताने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Whatsapp