Saturday , August 24 2019
Home / महत्वाच्या बातम्या / लोकसंख्यावाढीचे प्रश्न

लोकसंख्यावाढीचे प्रश्न

मुंबई महानगर प्रदेशाची व्याप्ती अलीकडेच पालघर, वसई, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, कर्जत, खालापूर, पेण आणि अलिबागपर्यंत वाढवण्यात आली. या वाढीव क्षेत्रात प्रचंड मोठ्या गुंतवणुकीतून अनेक विकास प्रकल्प राबवले जाणार असून त्यामुळे मुंबईतील लोकसंख्येचा ओघ तिकडे वळण्याची शक्यता आहे.

जुलैची 11 तारीख हा लोकसंख्या दिवस मानला जात असल्याने भारताच्या तसेच मुंबईच्याही लोकसंख्या वाढीकडे यानिमित्ताने लक्ष वेधले जाणे स्वाभाविक आहे. भारत तर वेगाने जगातील सर्वाधिक मोठी लोकसंख्या असलेला देश बनणार असून 2024 सालीच भारत यासंदर्भात चीनला मागे टाकेल असे आकडेवारी दर्शवते. त्यापुढील 21व्या शतकात भारतच जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश राहणार आहे, असेही तज्ज्ञ सांगतात. गेल्या दोन दशकांत देशाने एकंदर चांगली प्रगती केली असली तरी येत्या काळातील या वाढत्या लोकसंख्येला तोंड देण्याच्या दृष्टीने अनेक धोरणे विचारपूर्वक राबवावी लागतील. देशातील लोकसंख्येच्या जवळपास एक तृतियांश लोक हे तरुण असल्याने एकीकडे भारत हा तरुण देश मानला जातो. मात्र त्याचवेळी या तरुण लोकसंख्येला नोकर्‍या, रोजगार मिळवून देण्यासाठी सरकारला योग्य नियोजनानिशी धोरणे राबवावी लागणार आहेत. आधुनिक तंत्रज्ञानात वेगाने बदल होत असून त्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ मोकळे राहण्याची शक्यता आहे. तरुणांसोबतच निवृत्तांची संख्याही वेगाने वाढते आहे, त्यांच्या गरजांकडेही सरकारला लक्ष पुरवावे लागणार आहे. एकीकडे देशाची ही स्थिती तर दुसरीकडे मुंबईसारख्या देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या महानगराची स्थितीही दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. मुंबईची लोकसंख्या आजच्या घडीला 22 दशलक्ष इतकी अर्थात 2 कोटी 20 लाख इतकी आहे. देशभरातून रोजगाराच्या संधीच्या शोधात आजही लोक मोठ्या संख्येने मुंबई शहरात वा आसपासच्या परिसरात वास्तव्यास येत असल्याने या संपूर्ण महानगर प्रदेशातील सोयीसुविधांवरील ताण कमालीचा वाढला आहे. ऑक्टोबर 2017 मध्ये मुंबईतील एलफिन्स्टन रेल्वेस्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जण मृत्यूमुखी पडले. वास्तवत: गर्दीच्या वेळेस मुंबईतील कोणत्याही रेल्वेस्थानकावर अशी दुर्घटना घडू शकेल अशीच परिस्थिती आजही असते. अलीकडेच पावसामुळे यंत्रणा कोलमडलेल्या असताना रेल्वेने बुधवारी रविवारचे वेळापत्रक चालवले असता मध्य रेल्वेवर साधारण तशीच चेंगराचेंगरीची परिस्थिती दिसून आली. एकीकडे वाहतूक व्यवस्थेवरचा ताण कमालीचा वाढल्यानेच प्रशासनाने मेट्रोमार्फत त्याला तोंड देण्याची पावले उचलली आहेत. अन्य उन्नत मार्ग, सागरी मार्ग हे सारे देखील वाढत्या लोकसंख्येला व वाहतूकगरजांना तोंड देण्यासाठीच साकारले जात आहेत. वाढत्या वाहनसंख्येमुळेच शहरातील प्रदूषणाचे प्रमाण वाढते आहे. कचर्‍याचे ढीगही वाढत चालले आहेत. एवढ्या प्रचंड लोकसंख्येकडून निर्माण केल्या जाणार्‍या घनकचर्‍याचे करायचे काय, हा प्रश्न पालिकेतील प्रशासनाला भेडसावतो आहे. कचर्‍याचा, त्यातील काही विशिष्ट घटकांचा पुनर्वापर, कचर्‍यातून खतनिर्मिती, वीजनिर्मिती आदी पर्यायांतून या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रशासन झगडते आहे. एकीकडे मुंबईची उभी वाढही सुरूच असल्याचे या महानगरीत दिवसागणिक डोके वर काढणार्‍या बहुमजली टॉवर्समधून दिसून येते. या सार्‍यांमधून निवास करणार्‍यांना भविष्यात पाणीपुरवठा कसा केला जाणार आहे, वाढत्या वाहनसंख्येसाठी पार्किंगच्या जागा कशा उपलब्ध होणार आहेत, असे अनेक प्रश्न आज संबंधितांना भेडसावत आहेत.

Check Also

जखमी गोविंदांसाठी मोफत रुग्णवाहिका

नवी मुंबई ः प्रतिनिधी दहीहंडी साजरी करताना दुखापतीचा व अपंगत्वाचा सामना करावा लागतो. अशा वेळी …

Leave a Reply

Whatsapp