Friday , May 29 2020
Home / महत्वाच्या बातम्या / धरणांच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा नको

धरणांच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा नको

रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून 24 जणांचा बळी गेला. त्यानंतर सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली आणि धरणांची पाहणी करून अहवाल मागविण्यात आले. संपूर्ण कोकणातील धरणांचा सर्व्हे करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील धरणांचादेखील सर्व्हे करण्यात आला. जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार सर्व धरणे सुरक्षित आहेत. जिल्ह्यातील काही धरणांना गळती लागली आहे. काही धरणांची पडझड झाली आहे, असे हा अहवाल म्हणतोय. तरीदेखील या धरणांना धोका नाही, असेही म्हणतोय. त्यामुळे  या अहवालावर किती विश्वास ठेवावा हा प्रश्नच आहे.

 रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरणफुटीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील धरणांची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जलसंपदा विभाग आणि जिल्हा परिषद प्रशासनाला दिले होते.  यासंदर्भात  पाटबंधारे विभाग,  ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद,  जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृदा व जलसंधारण विभाग या सर्व यंत्रणांनी जिल्ह्यातील धरणांची पाहणी केली. जिल्ह्यात काळ प्रकल्प व हेटवणे प्रकल्प हे दोन मध्यम प्रकल्प असून 49 लघू पाटबंधारे योजना व 36 पाझर तलाव आहेत. हे सर्व सुरक्षित असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. सरकार कागदावर चालते. सरकारी यंत्रणांनी पाहणी करून अहवाल सादर केला म्हणजे त्यावर सरकारला विश्वास ठेवावाच लागेल, परंतु त्या परिसरात राहणारी जनता त्यावर विश्वास ठेवायला तयार नही. उदाहरणच द्यायचे झाले तर अलिबाग तालुक्यातील उमटे धरणाचे देता येईल. या धरणाच्या सांडव्याची भिंत फुटण्याच्या स्थितीत आहे. आज जरी ही भिंत सुरक्षित वाटत असली तरी ती फुटण्याचीच शक्यता आहे. सध्या या तलावात 50 टक्के पाणीसाठा झाला आहे. जर हे धरण पूर्ण क्षमतेने भरले तर या भिंतीला धोका निर्माण होऊ शकतो, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.  तरीदेखील  या धरणाच्या सांडवा भिंतीचे व खालील बाजूस असलेल्या वाफा भिंतीत किरकोळ दगड निघाले असले तरी धरणास कोणताही धोका नाही, असे अहवालात म्हटले आहे. उमटे धरणाच्या सांडव्याच्या भिंतीची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी येथील ग्रामस्थ गेली चार वर्षे करीत आहेत, परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

रायगड जिल्ह्यात मृदा व जलसंधारण विभागाची  साई , तळा तळेगाव,  पहूर, देवळे, खरसई,  मांडला, पाषाणे ता. कर्जत, विन्हेरे,  रातवड, मेंढाण अशी 10 धरणे आहेत. ही सर्व धरणे सुस्थितीत असल्याचे अहवालात नमूद आहे.  पोलादपूर तालुक्यातील देवळे धरणातून गळती  सुरू असल्याचे अहवालात म्हटले आहे. तरीही धरण निर्धोक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. हे धरण बांधून बरीच वर्षे झाली आहेत, परंतु त्यातून पाण्याची गळती होत असल्यामुळे या धरणात पाण्याचा साठा होत नाही. या धरणापासून गावाला धोका आहे. त्यामुळे त्याची दुरूस्ती करावी, अशी देवळे ग्रामस्थांची मागणी आहे, पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. हेटवणे मध्यम प्रकल्पांतर्गत पन्हळघर लघू पाटबंधारे  योजना येथेही  निचरा चर्‍यातून गळती

होत असल्याचे अहवालात नमूद केले आहे, पण तरीही दोन्ही धरणे सुरक्षित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. धरणेगळताहेत तरी ती सुरक्षित आहेत असे कसे म्हणता येईल.

शासकीय यंत्रणांनी जिल्ह्यातील सर्व धरणे  सुरक्षित असल्याचे म्हटले असले तरी काही धरणांच्या बाबतीत हे शंभर टक्के खरे नाही. देवळे व उमटे धरणांबाबत ग्रामस्थ जे सांगत आहेत त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरणाबाबत तेथील ग्रामस्थ तक्रारी करीत होते. धरणाला भेगा पडल्या आहेत. भिंतीतून पाणी झिरपते, असे तेथील ग्रामस्थ सांगत होते. लेखी तक्रारी केल्या होत्या, परंतु आम्ही शहाणे असे समजून अधिकार्‍यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि 24 जणांचा बळी गेला. गाव उद्ध्वस्त झाले. आम्हालाच समजते आणि ग्रामस्थांना समजत नाही असे समजून चालणार नाही. ग्रामस्थांचेदेखील सरकारी यंत्रणांनी ऐकले पाहिजे. नाहीतर काय परिणाम होतो हे तिवरे धरणाने दाखवून दिले आहे.

जलसंपदा विभाग आणि जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने रायगडमधील सर्व धरणे सुरक्षित असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे, परंतु काही धरणांना गळती लागली आहे, असेही या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे धरणे सुरक्षित आहेत असे असले तरी गळती होतेय, असे म्हटल्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. भविष्यात  यातून धोका निर्माण होऊ शकतो. या अहवालात धरणांमधून गळती  होतेय, असे म्हटलेय, पण ही गळती का होत आहे याची कारणे दिली नाहीत. त्यामुळे ज्या धरणांना गळती लागली, ती कशामुळे लागली  हे शोधून त्यावर वेळीच योग्य ती उपाययोजना करणे आवश्यक आहे. धरणे सुरक्षित आहेत, असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. धरणांच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा नको. धरणांच्या सुरक्षेबाबतच्या प्रश्नावर उदासीन राहून चालणार नाही.

-प्रकाश सोनवडेकर

Check Also

मुरूडमध्ये पर्स चोरांना अटक

मुरूड : प्रतिनिधी – मोबाइल असलेली पर्स चोरल्याप्रकरणी दोन जणांना मुरूड पोलिसांनी अटक केली असून, …

Leave a Reply

Whatsapp