Friday , February 28 2020
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / ‘सीकेटी’चा सलग नवव्यांदा ‘आविष्कार’

‘सीकेटी’चा सलग नवव्यांदा ‘आविष्कार’

मुंबई विद्यापीठाच्या संशोधन स्पर्धेचे विजेतेपद

पनवेल : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाने संशोधन क्षेत्रातील मुंबई विद्यापीठातील आपले वर्चस्व नवव्या वर्षीही कायम राखले आहे. महाविद्यालयाने मुंबई विद्यापीठातर्फे आयोजित आविष्कार संशोधन स्पर्धेचे सलग नवव्यांदा विजेतेपद पटकाविले.

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागातर्फे नुकत्याच झालेल्या शानदार समारंभामध्ये आविष्कार संशोधन महोत्सवाचे विजेतेपद सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बर्‍हाटे व आविष्कार संशोधन विभागाच्या विभागप्रमुख डॉ. सीमा कोकीटकर यांनी मुंबई आयसीटीचे डॉ. सुनील भागवत व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते स्वीकारले.

राज्यातील पदवी, पदव्युत्तर आणि संशोधन स्तरांतील विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रांतील मुलभूत बाबी आणि त्यामधील महत्त्वाचे टप्पे यांचे सुयोग्य आकलन व्हावे, तसेच विविध ज्ञात-अज्ञात क्षेत्रांची माहिती या विद्यार्थ्यांना व्हावी आणि संशोधन क्षेत्रामध्ये या विद्यार्थ्यांचा गुणवत्तापूर्ण विकास व्हावा, यासाठी या महोत्सवाचे सर्व विद्यापीठ आणि राज्य स्तरावर आयोजन होत असते.

आविष्कार संशोधन स्पर्धा दरवर्षी मुंबई विद्यापीठातर्फे आयोजित केली जाते. ही स्पर्धा प्रथम जिल्हा आणि नंतर विद्यापीठ स्तरावर होते. पनवेल येथील महात्मा फुले कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धेत सीकेटी महाविद्यालयाने मानसशास्त्र, भाषा आणि कला; वाणिज्य, व्यवस्थापन व विधी; मूलभूत शास्त्रे; शेती व पशुसंवर्धन; अभियांत्रिकी व तंत्रज्ञान आणि औषधशास्त्र या सर्व गटांमध्ये विविध प्रकारचे 48 संशोधन प्रकल्प सादर केले होते. यात महाविद्यालयाचे 16 प्रकल्प अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. या 16पैकी 3 प्रकल्प आर. डी. नॅशनल महाविद्यालय (वांद्रे) येथे आयोजित विद्यापीठस्तरीय स्पर्धेत सीकेटी महाविद्यालयाचे अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. यानंतर गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठात झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सीकेटी महाविद्यालयाने तीन संशोधन प्रकल्प सादर केले.

आविष्कार संशोधन स्पर्धा जिल्हास्तरावर सहा विभागांमध्ये होते आणि यातील उत्कृष्ट प्रकल्प अंतिम फेरीसाठी निवडले जातात. जिल्हास्तरीय आणि अंतिम फेरीत विद्यार्थी आपले संशोधन प्रकल्प पोस्टर व मौखिक सादरीकरणाद्वारे प्रस्तुत करतात. अंतिम फेरीत पदवी स्तरातील वाणिज्य, व्यवस्थापन व विधी शास्त्र गटात संतोष राणे याने सुवर्ण, तर शेती व पशुसंवर्धन गटात प्रीथी सुब्रमण्यम हिने रौप्यपदक पटकाविले. संशोधन स्तरातील वाणिज्य, व्यवस्थापन व विधी शास्त्र गटात सोनाली साठे हिने सुवर्ण, शेती व पशुसंवर्धन गटात श्वेता भगत हिने रौप्यपदक व वाणिज्य, व्यवस्थापन व विधी शास्त्र गटात दीपेश शहा यांनी कांस्यपदक प्राप्त केले. त्याचप्रमाणे शिक्षक स्तरांतील वाणिज्य, व्यवस्थापन व विधी शास्त्र गटात वैभव बंजन यांनी सुवर्णपदक जिंकले.

मुंबई विद्यापीठात 3 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्यपदके पटकावून सीकेटी महाविद्यालयाने चार गटांमध्ये सर्वाधिक 14 गुण प्राप्त करून मुंबई विद्यापीठाच्या आविष्कार संशोधन स्पर्धेत उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालयाने जिल्हास्तरीय आणि वाणिज्य, व्यवस्थापन व विधी शास्त्र गटात विजेतेपद प्राप्त केले.

सन 2009-10मध्ये मुंबई विद्यापीठाने या स्पर्धेचे विजेतेपद घोषित करून सर्वात जास्त पारितोषिके पटकाविणार्‍या महाविद्यालयास सन्मानित करायला सुरुवात केली. सीकेटी महाविद्यालयाने ही स्पर्धा सुरू झाल्यापासून सलग नऊ वर्षे विजेतेपद प्राप्त करून संशोधन क्षेत्रात आपले वर्चस्व निर्माण केले आहे.

या स्पृहणीय यशाबद्दल संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपकार्याध्यक्ष वाय. टी. देशमुख, सिडकोचे अध्यक्ष व संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका सभागृह नेते व संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य परेश ठाकूर, अनिल भगत, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, स्थानिक व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर सेवकवर्ग यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, त्यांना मार्गदर्शन करणारे प्राध्यापक आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बर्‍हाटे, उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील व आविष्कार संशोधन विभागाच्या प्रमुख डॉ. सीमा कोकीटकर यांचे अभिनंदन केले.

Check Also

रायगडमध्ये मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाबाबत सरकारची अनास्था

अ‍ॅड. निरंजन डावखरे यांना मंत्र्यांचे संदिग्ध उत्तर अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतील रासायनिक व …

Leave a Reply

Whatsapp