Saturday , October 16 2021
Breaking News

घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास

पिंपरी : दरवाजाला लावलेले कुलूप तोडून घरातील 50 तोळे सोने व चांदीचे दागिने तसेच रोकड लंपास करण्यात आली. चोरट्यांनी 15 लाख 87 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. चिंचवड येथील लिंक रोड येथे सोमवारी दुपारी दीड ते मंगळवारी सकाळी सव्वादहादरम्यान ही घरफोडी झाली. या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मीनाक्षी किसनराव बागडे (52, रा. लिंक रोड, चिंचवड) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी बागडे यांच्या फ्लॅटचा दरवाजा कुलूप लावून बंद असताना अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. 50 तोळे सोने व चांदीचे दागिने तसेच रोकड असा एकूण 15 लाख 87 हजारांचा ऐवज चोरट्यांनी घरातून लंपास केला. या प्रकरणाचा चिंचवड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

आझम खान यांच्या पुत्रास अटक?

लखनऊ ः समाजवादी पार्टीचे नेते आणि खासदार आझम खान यांचा पुत्र अब्दुल्लाला रामपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अब्दुल्लाला जोहर युनिव्हर्सिटीमधल्या तपासणीदरम्यान ताब्यात घेण्यात आले. पोलीस जोहर युनिव्हर्सिटीत चोरी झालेल्या पुस्तकांची चौकशी करीत आहेत. अब्दुल्ला याने पोलिसांच्या कारवाईत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. अब्दुल्लावर मंगळवारी बोगस जन्म प्रमाणपत्र सादर करून पासपोर्ट मिळवल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी जोहर युनिव्हर्सिटीतील पुस्तकांच्या चोरी प्रकरणात छापेमारी केली होती. युनिव्हर्सिटीविरोधात स्थानिक मदरशाने तक्रार दाखल केली होती.  हस्तलिखित आणि जुनी पुस्तके या युनिव्हर्सिटीने मदरशातून चोरली होती. या प्रकरणात 16 जून रोजी एफआयआर दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी छापा टाकल्यानंतर येथून 100हून अधिक पुस्तके जप्त करण्यात आली होती. त्यानंतर या छापा प्रक्रियेत अब्दुल्लाने हस्तक्षेप केला. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले, परंतु त्यांना अटक करण्यात आली की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला

मंगळुरू (कर्नाटक) : गेल्या 36 तासांपासून बेपत्ता असलेले प्रसिद्ध ’कॅफे कॉफी डे’चे (सीसीडी) मालक व्ही. जी. सिद्धार्थ (60) यांचा मृतदेह बुधवारी पहाटे मंगळुरूमधील नेत्रावती नदीत सापडला आहे. सोमवार संध्याकाळपासून सिद्धार्थ बेपत्ता झाल्यानंतर त्यांचा शोध सुरू होता. सिद्धार्थ यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. सिद्धार्थ यांचा मृतजदेह जवळच्या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

रोइंगपटू दत्तूला हायकोर्टाचा दिलासा

मुंबई : भारताचा आंतरराष्ट्रीय रोइंगपटू दत्तू भोकनळला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. नाशिक ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिलेने भोकनळविरोधात तक्रार दिल्याने त्याच्याविरोधात 498(अ) कलमाखाली कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, परंतु तक्रारदाराच्या आरोपात तथ्य दिसत नाही, असे नमूद करीत हायकोर्टाने हा गुन्हा रद्द केला आहे.

Check Also

सात नव्या संरक्षण उत्पादन कंपन्या पंतप्रधान मोदींकडून राष्ट्राला समर्पित

दसर्‍याच्या मुहूर्तावर व्यापक सुधारणांना प्रारंभ नवी दिल्ली : वृत्तसंस्था दसर्‍याच्या निमित्ताने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Whatsapp