Friday , June 5 2020
Home / महत्वाच्या बातम्या / ऐन गणेशोत्सवात पावसाचे धूमशान

ऐन गणेशोत्सवात पावसाचे धूमशान

रायगड जिल्ह्यात पाणीच पाणी; जनजीवन विस्कळीत

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने बुधवारी (दि. 4) सलग दुसर्‍या दिवशी झोडपून काढले. या पावसामुळे सावित्री, अंबा, कुंडलिका, पाताळगंगा या नद्यांनी धोका पातळी ओलांडली असून, महाड आणि नागोठणे शहरात पुराचे पाणी शिरले होते, तर अलिबाग, रोहा शहरांतील सखल भागात घरांमध्ये पाणी घुसले. काही ठिकाणी दरडी कोसळल्याने रस्ते व रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली होती. सुदैवाने कुठेही जीवितहानी झालेली नाही, मात्र ऐन गणेशोत्सवात बरसत असलेल्या या वरुणराजाने गणेशभक्तांची तारांबळ उडवली आहे.

बुधवारी सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासांत जिल्ह्यामध्ये सरासरी 177.69 मिलीमीटर पाऊस पडला असून, खालापूर  268 मिमी, माणगाव 260 मिमी, रोहा 257 मिमी, माथेरान 254 मिमी व उरण 230 मिमी या पाच ठिकाणी 200 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय मुरूड येथे 185 मिमी, म्हसळा येथे 180 मिमी, तळा येथे 175 मिमी, कर्जत येथे 155, सुधागड 142, श्रीवर्धन 140, पनवेल 140, पेण 135, अलिबाग 117, पोलादपूर येथे 114, तर महाड येथे 91 मिमी पाऊस पडला.

मुसळधार पावसाने मंगळवारपासून रायगडला झोडपून काढले. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे नदीकिनार्‍यांवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. अंबा, सावित्री नद्यांनी बुधवारी सकाळी धोका पातळी ओलांडली. त्यामुळे नागोठणे आणि महाड शहरात पाणी घुसले. पाताळगंगा नदीने धोकापातळी ओलांडल्याने सावरोली येथील पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे खालापूरकडे जाणारी वाहतूक काही काळ थांबविण्यात आली होती. अंबा नदीने धोकापातळी ओलांडल्याने वाकण-पाली मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. जांभूळपाडा पूल पाण्याखाली गेल्याने तेथील वाहतूक थांबविण्यात आली. मोर्बा पुलावरून पुराचे पाणी गेल्याने माणगाव-श्रीवर्धन वाहतूक थांबविण्यात आली.

जोरदार पावसामुळे अलिबाग शहरातील तळकरनगरच्या घरांमध्ये पाणी घुसले होते. पेण, पनवेल व उरण तालुक्यातील काही घरांमध्येदेखील पाणी शिरले होते. या पावसाने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाली आहे. दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा ओसरला, पण अधूनमधून पावसाच्या सरी बरसत होत्या.

Check Also

वादळग्रस्त कोकणाला विशेष पॅकेज द्या!

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मागणी अलिबाग ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड तसेच रत्नागिरी जिल्ह्यात …

Leave a Reply

Whatsapp