Friday , February 28 2020
Home / महत्वाच्या बातम्या / महाराष्ट्रात स्थिर सरकार द्या

महाराष्ट्रात स्थिर सरकार द्या

महाजनादेश यात्रेच्या समारोपप्रसंगी पंतप्रधानांचे आवाहन

नाशिक ः प्रतिनिधी

गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात चांगली गुंतवणूक, शेतकरी, महिलांचा विकास झाला. भटक्या विमुक्त जाती, मागासवर्गीय जनतेला आवाज मिळाला. पूर्ण बहुमत नसतानाही महाराष्ट्रात प्रगतशील सरकार भाजपच्या रूपात मिळाले. गेल्या 60 वर्षांत पहिल्यांदा देशात स्थिर सरकार आले. हे केवळ फडणवीस सरकारचे रिपोर्ट कार्ड नाही. जनतेने स्थिर सरकारचे फायदे लक्षात घ्यायला हवेत. राजकीय अस्थिरतेमुळे गेल्या 60 वर्षांत महाराष्ट्राच्या प्रगतीला खीळ बसली होती, पण गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्र विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात स्थिर सरकार द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले.

एक महिना 4,250 किमीचा प्रवास करीत मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रेचा गुरुवारी (दि. 19) नाशिकमध्ये समारोप केला. मोदी म्हणाले, ज्योतिबा फुलेंपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत कित्येक महापुरुष ज्या महाराष्ट्राने दिले, अशा महाराष्ट्रात कोणते सरकार, कोणता मुख्यमंत्री सलग पाच वर्षे चालू नये? केवळ दोनच उदाहरणे आहेत, एक वसंतदादा आणि दुसरे देवेंद्र फडणवीस. फडणवीसांनी पाच वर्षे राज्याचे सक्षम नेतृत्व केले आणि महाराष्ट्राला स्थिर सरकार दिले.

शरद पवार हे अनुभवी नेते आहेत. विरोधक म्हणून त्यांनी आमच्यावर टीका करावी, पण राष्ट्रहिताविरोधात वक्तव्य करणे दुर्दैवी आहे. शरद पवारांना शेजारी देश चांगला वाटतो, ही त्यांची मर्जी. तेथील नेते त्यांना कल्याणकारी वाटतात, पण हे संपूर्ण देशाला माहीत आहे की दहशतवाद्यांची फॅक्टरी कुठे आहे, अशी टीकाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

भाजपत नुकतेच दाखल झालेले माजी खा. उदयनराजे भोसले सभेला व्यासपीठावर उपस्थित होते. केंद्रीय मंत्री रामदास आठवले, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे-पाटील, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री चंद्रकांत पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, जयकुमार रावल, आशिष शेलार, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे-पाटील, विनोद तावडे, गिरीश महाजन या वेळी उपस्थित होते.

Check Also

कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरण ; ठेवीदारांच्या ठेवी तत्काळ परत करा

सहकार आयुक्तांचे बँकेला आदेश आमदार प्रशांत ठाकूर व महेश बालदी यांच्या तारांकित प्रश्नाला सहकार मंत्र्यांचे …

Leave a Reply

Whatsapp