Sunday , April 11 2021

विद्यार्थी मित्रांनो, दोन शब्द तुमच्यासाठी

आज आपण आयुष्याच्या एका विशिष्ट वळणावर आहोत. म्हणून आज आपण आपली ध्येय आणि त्यासाठीचे नियोजन करणे आवश्यक आहे. आपण जर नियोजन न करता जर काम करू लागलो, तर त्यात यश मिळेल कदाचित, परंतु ते यश जीवन सुधारण्यासाठी काही कामास येणार नाही. म्हणून येथे आपण जसे वळण घ्याल तसे आपले जीवन वळणार आहे आणि आपण वळण घ्यायचे नाही असे ठरविले, तर आपण यश मिळवू शकणार नाही. शिक्षण हे असे एक माध्यम आहे ज्यामुळे आपल्या आयुष्याला अनेक वळणे घेता येऊ शकतात.

महात्मा फुले असो वा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव प्रत्येक जण का घेतात? याचा आपण कधी विचार केला आहे काय? महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असे नुसते म्हटले नाही, तर त्यांनी पुण्यातील भिडेच्या वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली. सर्वांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण मिळावे असे हंटर कमिशनसमोर आपले मत मांडले. लोकांच्या शिक्षणासाठी अनेक हालअपेष्टा सहन केल्या. त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनीसुध्दा मुलींच्या शिक्षणासाठी अनेक त्रास सहन केले. म्हणून आज शिक्षणाच्या बाबतीत सोनियाचा दिवस आपण पाहत आहोत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा संघर्ष करा असा मोलाचा संदेश जनतेला दिला. महात्मा गांधीजी हे जीवन शिक्षणावर भर देत असत. भारतात सर्वांनीच शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी आयुष्यभर कष्ट घेतले. कारण भारत देशाला प्रगतिपथावर न्यायचे असेल, तर देशातील सर्व लोकांनी शिकलेच पाहिजे. म्हणून आज प्रत्येक जण त्यांचे स्मरण करतात. कारण त्यांनी शिक्षणाच्या प्रसारासाठी दिवसरात्र वाचन, चिंतन, मनन आणि लेखन करून लोकांच्या हृदयात स्थान मिळविले. रात्रंदिवस पुस्तकाचे वाचन करणे, त्यावर चिंतन करणे आणि लोकांचा, समाजाचा पर्यायाने देशाचा विकास व्हावा यासाठी लेखन करणे असे फार मोठे कार्य त्यांनी केले.

आपणाला देखील जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर वाचन, चिंतन आणि लेखन या तीन गोष्टीवर जास्त भर दिला पाहिजे. वरील तीन गोष्टी जीवनात मिळवायाच्या असतील, तर त्यासाठी आपल्या जवळ हवी कठोर मेहनत करण्याची तयारी आणि अविरत काम करण्याची इच्छा. याशिवाय आपण काहीच मिळवू शकत नाही. यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र डोळ्यासमोर ठेवणे आवश्यक आहे. म्युनिसिपाल्टीच्या दिव्याच्या उजेडात त्यांनी आपला अभ्यास केला. ग्रंथालयातील जेवणासाठीचा वेळ वाचविण्यासाठी आणि जास्तीचा वेळ वाचन करता यावे म्हणून ग्रंथपालाचे डोळे चुकवून ग्रंथालयामध्ये पाव खायचे, पण पुस्तक वाचायचे. वाचाल तर वाचाल या उक्तीची ओळख त्यांच्या जीवन चरित्रातून दिसून येते. 18 तास अभ्यास करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती. म्हणूनच ते भारताची राज्यघटना रात्रंदिवस कष्ट करून लिहू शकले. त्याच गोष्टीचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी कष्ट घेतले पाहिजेत.

दहावी आणि बारावीच्या वर्गात प्रवेश केला की, प्रत्येक जण जागा होतो आणि मन लावून अभ्यास करण्याचा संकल्प करतो, परंतु दहावी आणि बारावी वर्गाचे वर्ष अत्यंत महत्त्वाचे आहे म्हणून रात्रंदिवस अभ्यास केल्याने खरोखर यश मिळते काय? तर याचे उत्तर नाही असे मिळेल. त्यासाठी आपल्या अभ्यासात सातत्यपणा असणे आवश्यक आणि अत्यंत महत्त्वाचे आहे. समर्थ रामदास स्वामी यांनी म्हटल्याप्रमाणे-

आधी कष्ट मग फळ।

कष्टेविना सर्व निष्फळ॥

सर्वात पहिल्यांदा मेहनत म्हणजे अभ्यास करावा. त्यानंतर नक्कीच फळ मिळेल. दे रे हरी पलंगावरीची वृत्ती आपण सोडून द्यायला हवी. कष्ट केल्यावर यश मिळणारच. जर यदा कदाचित तेथे यश मिळाले नाही, तर नाउमेद न होता पुन्हा जोमाने काम करावे. सचिन तेंडुलकर जेव्हा शून्यावर बाद होत असे, तेही पहिल्याच चेंडूवर; तेव्हा ते स्वतः आत्मपरीक्षण करून सरावावर भर देत असत आणि त्यापुढील सामन्यात शतक ठोकत असत. असेच काही काम आपणासही करायचे आहे. नाउमेद व्हायचे नाही, खचून जायचे नाही, भविष्यात अनेक संकटांना तोंड द्यायचे आहे, त्याची ही पूर्वतयारी समजून कार्य करावे. आपल्या कार्यात नेहमी सातत्य ठेवावे. आज नाही, तर उद्या नक्कीच यश आपल्याला शोधत येईल.

-नागोराव सा. येवतीकर

Check Also

राज्यात पुनश्च लॉकडाऊन?

दोन दिवसांत निर्णय घेणार : मुख्यमंत्री मुंबई ः प्रतिनिधीमहाराष्ट्रात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर …

Leave a Reply

Whatsapp