Friday , June 5 2020
Home / महत्वाच्या बातम्या / महाराष्ट्रात महायुतीला स्पष्ट कौल, रायगडात भाजप-शिवसेनेची मुसंडी, शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडी फेल

महाराष्ट्रात महायुतीला स्पष्ट कौल, रायगडात भाजप-शिवसेनेची मुसंडी, शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडी फेल

अलिबाग : प्रतिनिधी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांच्या महायुतीने पुन्हा एकदा विजय मिळवत सत्ता राखली आहे. भाजप 288 पैकी सर्वाधिक 105 जागा जिंकून मोठा पक्ष ठरला आहे. त्याखालोखाल शिवसेनेला 56 जागा मिळाल्या आहेत. दुसरीकडे महाआघाडीतील राष्ट्रवादीला 54 आणि काँग्रेसला 44 जागांवर समाधान मानावे लागले, तर इतरांच्या पारड्यात 29 जागा गेल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप, शिवसेनेने रायगड जिल्ह्यात मुसंडी मारत प्रस्थापित पक्षांना जोरदार धक्का दिला आहे. भाजपने दोन, शिवसेनेने तीन, राष्ट्रवादी काँग्रेसने एक आणि अपक्ष (भाजप बंडखोर) उमेदवाराने एका जागी विजय संपादन केला.

जिल्ह्यात अलिबाग, पनवेल, उरण, कर्जत, महाड, पेण, श्रीवर्धन असे सात मतदारसंघ आहेत. यात उरण वगळता महायुती विरुद्ध महाआघाडी यांच्यात सरळ लढत होती. यापैकी महायुतीने पाच जागा जिंकल्या. आघाडीने एका जागेवर यश मिळविले, तर एका ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.

पनवेलमध्ये भाजपचे प्रशांत ठाकूर, अलिबागमध्ये शिवसेनेचे महेंद्र दळवी, कर्जतमध्ये शिवसेनेचे महेंद्र थोरवे, पेणमध्ये भाजपचे रविशेठ पाटील, महाडमध्ये शिवसेनेचे भरत गोगावले, श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे, तर उरणमध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढविणारे भाजपचे बंडखोर महेश बालदी विजयी झाले आहेत. पनवेलमधून आमदार प्रशांत ठाकूर आणि महाडमधून आमदार भरत गोगावले यांनी विजयी हॅट्ट्रिक साधली.

-जिल्ह्यातून शेकापचा सुपडा साफ

शेतकरी कामगार पक्षाचे बडे मोहरे पराभूत झाले आहेत. शेकापकडून आमदार सुभाष उर्फ पंडित पाटील (अलिबाग), आमदार धैर्यशील पाटील (पेण), माजी आमदार विवेक पाटील (उरण), हरेश केणी (पनवेल) आणि ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू अ‍ॅड. अनिकेत (सांगोला) निवडणूक रिंगणात होते, मात्र या उमेदवारांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. एकेकाळी विरोधी पक्ष म्हणून मिरविणार्‍या शेकापला रायगडात यंदा एकही जागा जिंकता आली नाही.

-चार आमदारांचा पराभव

जिल्ह्यात चार विद्यमान आमदारांचा धक्कादायक पराभव झाला आहे. यात अलिबागचे आमदार सुभाष उर्फ पंडित पाटील, पेणचे आमदार धैर्यशील पाटील, कर्जतचे आमदार सुरेश लाड आणि उरणचे आमदार मनोहर भोईर यांचा समावेश आहे.

-जिल्ह्यातील पक्षीय बलाबल

भाजप – 2

शिवसेना – 3

राष्ट्रवादी काँग्रेस – 1

अपक्ष (भाजप बंडखोर) – 1

-आमदार प्रशांत ठाकूर आणखी जोमाने

काम करतील : लोकनेते रामशेठ ठाकूर

भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर अपेक्षेप्रमाणे चांगल्या मतांच्या आघाडीने निवडून आले आहेत. राज्यातील 288 मतदारसंघांपैकी मोठ्या आघाडीने निवडून आलेल्या उमेदवारांत प्रशांत ठाकूर यांचा नंबर लागतो. ते 2009मध्ये 11 हजार मतांनी, 2014मध्ये 12 हजार मतांनी आणि आता 2019मध्ये 92 हजार मतांनी विजयी झाले. यामुळे आम्ही आनंदी आहोत. मोठी आघाडी देणार्‍या सगळ्यांचे मी आभार मानतो. आता प्रशांत ठाकूर यांना आणखी चांगले काम करायचा हुरूप येईल. जनतेची सेवा करण्याकरिता ते अहोरात्र काम करतील, अशी मला खात्री असल्याची प्रतिक्रिया माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिली.

-जनतेने टाकलेला विश्वास सार्थ

ठरविणार : आमदार प्रशांत ठाकूर

विजयानंतर प्रतिक्रिया देताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, लोकांनी विकासाच्या बाजूने कौल दिला आहे. विकासाचे अनेक पैलू आहेत. शहरी आणि ग्रामीण विभागातील विकासाच्या मागण्या आणि पायाभूत सुविधा पूर्ण करण्यासाठी जो प्रयत्न केला जात आहे त्यावर लोकांनी विश्वास ठेवलेला दिसतो. लोकांनी सकारात्मक मतदान केले. पाण्याची समस्या सोडवण्यासाठी नवीन जलस्रोेत निर्माण करणे आणि त्याचे वाटप पद्धती या अनुषंगाने सुरू असलेली कामे व साठवणूक टाक्या या दोन्ही पातळ्यांवर काम सुरू आहे. याबाबत जनतेने माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थ ठरविणार आहे.

महाराष्ट्राच्या जनतेने जो स्पष्ट कौल दिला आहे त्याबद्दल जनतेचे मी आभार मानतो. त्याचसोबत आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे, तसेच महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांचे आभार व्यक्त करतो. राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार याबाबत कुणाच्याही मनात शंका नाही.

-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र

Check Also

वादळग्रस्त कोकणाला विशेष पॅकेज द्या!

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मागणी अलिबाग ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड तसेच रत्नागिरी जिल्ह्यात …

Leave a Reply

Whatsapp