Wednesday , April 1 2020
Home / महत्वाच्या बातम्या / देश-विदेश / …म्हणून अजित पवारांवर विश्वास ठेवला : अमित शहा

…म्हणून अजित पवारांवर विश्वास ठेवला : अमित शहा

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्रातील राजकीय लढाईनंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी या घडामोडींवर मत व्यक्त केले आहे. ’अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते असल्याने भाजपने त्यांच्यावर विश्वास ठेवला होता,’ असे शहा यांनी सांगितले.

निवडणूक निकालानंतर राज्यात तब्बल महिनाभर रंगलेल्या राजकीय नाट्याचा मंगळवारी शेवट झाला. भाजपला साथ देऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार्‍या अजित पवार यांनी माघार घेतल्याने देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत आहे.

अचानक फिरलेल्या राजकारणावर पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी तूर्त काही बोलण्यास नकार दिला. ’योग्य वेळी योग्य ते बोलेन,’ असे ते म्हणाले, तर अमित शहा यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना यावर भाष्य केले. ’अजित पवार राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाचे नेते होते. सरकार स्थापण्यासाठी कोणत्याही पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना होता. भाजपला पाठिंबा देताना राज्यपालांनी स्वत: त्यांच्याशी चर्चा केली होती. राष्ट्रवादीने सुरुवातीला जेव्हा सरकार बनविण्यास असमर्थता व्यक्त केली होती, तेव्हा राज्यपालांना दिलेल्या पत्रावर अजित पवार यांचीच सही होती. आमच्या समर्थनासाठी त्यांनी दिलेल्या पाठिंबा पत्रावरदेखील त्यांची सही होती. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला,’ असे शहा म्हणाले.

अजित पवारांवर आरोप असलेल्या कुठल्याही प्रकरणाची फाइल बंद करण्यात आलेली नाही, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

Check Also

कानसा वारणा फाऊंडेशनचे मोलाचे कार्य

मोहोपाडा : प्रतिनिधी कानसा वारना फाऊंडेशनच्या वतीने राज्यभर वृक्ष लागवड, कला, क्रीडा, सांस्कृतिक आदीं विविध …

Leave a Reply

Whatsapp