Friday , June 5 2020
Home / महत्वाच्या बातम्या / मंत्रिमंडळ बैठकीत खुर्चीवरून वाद

मंत्रिमंडळ बैठकीत खुर्चीवरून वाद

मुंबई : प्रतिनिधी
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचे खातेवाटप झाल्यापासून रोजच धूसफूस कानावर येत आहे. असाच एक वाद मंगळवारी (दि. 7) समोर आला. सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण आणि अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ या दोघांमध्ये खुर्चीवर बसण्यावरून वाद झाल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे सरकारमधील वाद नव्याने चव्हाट्यावर आला आहे.
महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार सुमारे महिनाभर लांबला होता. त्यानंतर खातेवाटपाच्या प्रक्रियेलाही सुमारे आठ दिवस लागले. खातेवाटपानंतर नाराजी आणि धूसफूस सुरूच आहे.
सुरुवातीला संजय राऊत हे बंधू सुनील यांना मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असल्याची चर्चा होती. यानंतर अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची चर्चा रंगली. अब्दुल सत्तार आणि चंद्रकांत खैरे यांच्यातील वाद तर संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. हा वाद एवढा वाढला होता की मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मध्यस्थी करून तो मिटवावा लागला. आता सगळे वाद शांत झाले असे वाटत असतानाच वडेट्टीवार नाराज असल्याची बातमी आली. त्यानंतर छगन भुजबळ आणि अशोक चव्हाण यांच्यात खुर्चीवरून वाद रंगल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचे काही खरे नसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
नाराज मंत्री वटेट्टीवारांची मंत्रिमंडळ बैठकीला दांडी
चांगले खाते मिळाले नाही म्हणून नाराज असलेले कॅबिनेट मंत्री व काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहिले. मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्यानंतर अपेक्षित खाते न मिळाल्याने वडेट्टीवार नाराज असल्याचे वृत्त होते. मंत्रिमंडळाच्या मंगळवारी (दि. 7) झालेल्या बैठकीला गैरहजर राहून वडेट्टीवारांनी आपली नाराजी व्यक्त केली.
विस्तारानंतर इतर मागास प्रवर्ग, शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमीन विकास आणि भूकंप व पुनर्वसन खाते मिळालेले वडेट्टीवार नाराज होते. खातेवाटपानंतर ते प्रतिक्रिया देण्यासही तयार नव्हते. ’आपणास कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नाही. जे लिहायचे ते लिहा,’ अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यावरून त्यांच्या नाराजीची तीव्रता स्पष्ट झाली होती. आता त्यांनी थेट सरकारलाच आव्हान दिल्याची चर्चा आहे.

Check Also

वादळग्रस्त कोकणाला विशेष पॅकेज द्या!

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मागणी अलिबाग ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड तसेच रत्नागिरी जिल्ह्यात …

Leave a Reply

Whatsapp