Saturday , July 4 2020
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / पळस्पे गावाजवळ भरधाव टेम्पोच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार; दोघी जखमी

पळस्पे गावाजवळ भरधाव टेम्पोच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार; दोघी जखमी

पनवेल : वार्ताहर

भरधाव टेम्पोने पळस्पे गावाजवळ शाळा सुटल्यावर घरी परतणार्‍या दहावीतील तीन विद्यार्थीनींना धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन विद्यार्थींपैकी एकीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघी जणींना नजिकच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 17)दुपारी एकच्या सुमारास घडली आहे.

पनवेल जवळील पळस्पे गावाजवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात दहावी इयत्तेत शिकणार्‍या काजल गायकवाड, मिनल चौधरी व स्वप्नाली ठोंबरे (तिघेही रा. कुडावे गाव) या शुक्रवारी दुपारी शाळा सुटल्यावर घरी परतत असताना अचानकपणे भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोवरील चालकाने या तीन मुलींना जोरदारपणे धडक दिली. या अपघातात काजल गायकवाड ही गंभीररित्या जखमी झाली व त्यात तीचा मृत्यू झाला आहे. तर इतर दोघी जणी जखमी झाल्या असून त्यांना नजिकच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांना मिळताच त्यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेवून टेम्पो चालकाला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक माहितीमध्ये टेम्पो चालकाने मद्यपान केल्याचे समजते. याबाबत पुढील तपास पनवेल शहर पोलीस करीत आहेत.

अपघाताची माहिती मिळताच मुलींना पाहण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा सर्जेराव वेट्टम या उपजिल्हा रुग्णालयात आल्या असता काजल गायकवाड हिचे निधन झाल्याचे समजताच त्यांना त्या ठिकाणी चक्कर येवून पडल्याने त्यांना सुद्धा तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

काजल गायकवाड ही अत्यंत हुशार मुलगी म्हणून शाळेत प्रसिद्ध होती. तीच्या निधनाने शाळेतील शिक्षक वर्गासह तिच्या वर्ग मैत्रिणींनी हळहळ व्यक्त केली आहे.

Check Also

विस्तारवादाचे युग संपले

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चीनला इशारा लडाख : वृत्तसंस्थाभारताने कायम मानवतेच्या सुरक्षेसाठी काम केले आहे. गेल्या …

Leave a Reply

Whatsapp