Wednesday , February 26 2020
Home / महत्वाच्या बातम्या / पोलादपूरचा बुरूड व्यवसाय लोप पावतोय!

पोलादपूरचा बुरूड व्यवसाय लोप पावतोय!

पोलादपूर तालुक्यामध्ये गेल्या चार दशकांपासून तांब्या-पितळेच्या भांड्यांना कल्हई लावणारा व्यवसाय अस्तंगत झाल्यानंतर आता बांबूपासून विविध वस्तू बनविणारा बुरूड व्यवसायदेखील लोप होण्याच्या मार्गावर आहे. कोकणात बांबूचे पीक मुबलक आहे, मात्र बांबूच्या वस्तू बनविणारे पारंपरिक बुरूड व्यावसायिक आणि खरेदीसाठी ग्राहक नसल्याने याबाबत आता उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान, भातकापणीनंतर बांबूच्या वस्तूंची मागणी वाढण्याची लक्षणे असूनही मागणीनुसार पुरवठा होण्याची शक्यता दिसून येत नाही.

पोलादपूर तालुक्यातील चोळई येथील गायकवाड कुटुंबातील महिलांनी जातीचा पारंपरिक व्यवसाय सामाजिक ओळख म्हणून अद्याप सुरू ठेवला आहे. दरवर्षी गौरी-गणपतीच्या सणाला सुहासिनींचे माहेरवाशिणींचे गौरीचे वसे घेऊन जाण्यासाठी लागणारी बांबूची सुपे, सुपल्या तसेच परड्या, करंड्या, पाट्या, कणगे, डालगे, टोपल्या, चटई, सुपे, रवळ्या तसेच शोपीस बनवून पोलादपूर शहरात विक्रीसाठी उपलब्ध करण्याचा व्यवसाय कुटुंबाची आर्थिक स्थिती भक्कम असूनही या कुटुंबाने परंपरा म्हणून जोपासलेला दिसून येत आहे. पोलादपूर तहसील कार्यालयाच्या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कम्पाऊंडलगत या व्यवसायातील परजिल्ह्यातील कारागिरांनी बांबूपासून शेतीसाठी उपयुक्त वस्तू तयार करून विक्रीचा व्यवसाय दरवर्षी थाटण्यास सुरुवात केली आहे. याकामी स्थानिक शेतकर्‍यांकडूनच कच्चा माल म्हणून बांधावरचे बांबू अत्यंत कमी किमतीत विकत घेत त्याच्या वस्तू हे परजिल्ह्यातील कारागीर तयार करीत असतात, मात्र कोकणचा पर्यटन विकास झपाट्याने होत असताना अनेक पारंपरिक कोकणी व्यवसायांना चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. या पारंपरिक बुरूड व्यवसायाला उर्जितावस्था आणण्यासाठी कोणतेच प्रयत्न होताना दिसून येत नाहीत.

एकेकाळी मनीऑर्डरचा तालुका म्हणून ओळख असलेल्या पोलादपूर तालुक्यातील मुंबई, पुणेकर चाकरमान्यांनी पाठविलेल्या मनीऑर्डरच्या पैशांतून अथवा तांदळाच्या बदल्यात स्थानिक शेतकरी बांबूपासून तयार करण्यात आलेल्या शेतातील पिके साठवून अथवा वाहून नेण्यासाठीच्या वस्तू खरेदी केल्या जात असत. पूर्वी पोलादपूरप्रमाणेच ग्रामीण भागात दारोदारी फिरून बांबूच्या वस्तूंची विक्री केली जात असे. अल्प गुंतवणुकीच्या या व्यवसायातून त्याकाळीदेखील दुप्पट नफा मिळत असे. सध्या तालुक्यातील बुरूड व्यावसायिक अन्य व्यवसायात कर्तृत्व गाजवत आहेत. त्यामुळे  ग्रामीण भागातही स्थानिक बुरूड दुर्मीळ झाले आहेत. त्यामुळेच आता पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा येथून पोटाची खळगी भरण्यासाठी कुटुंबासह आलेल्या कारागिरांनी आपल्या हस्तकौशल्यातून सुबक व आकर्षक वस्तू बनवून लोकांचा विश्वास संपादन केला. या व्यवसायातून त्यांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाल्याने त्यांच्याकडे पैसा खेळू लागला. शहरातील मोक्याच्या जागेत या परजिल्ह्यातील कारागिरांनी आपला तळ ठोकला. दरवर्षी परजिल्ह्यातून आलेल्या या लोकांनी स्थानिक बुरूड व्यावसायिकांसमोर उत्पादनाच्या सातत्याने या व्यवसायात आपली मक्तेदारी निर्माण केली.

राज्याच्या मंत्रिमंडळाने बांबूची शास्त्रोक्त लागवड आणि औद्योगिक वापरासाठी प्रशिक्षण देण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला. नवीन बांबू धोरण जाहीर करण्यात येत असून त्याअंतर्गत या केंद्रातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याच धर्तीवर कोकणातही असे केंद्र कार्यान्वित होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची गरज आहे. या ठिकाणी बांबूवर आधारित डायरेक्टर जनरल ऑफ एम्प्लॉयमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग या भारत सरकारच्या विभागातर्फे मान्यताप्राप्त अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल. या केंद्रांतून मॉड्युलर एम्प्लॉएबल स्कील्सअंतर्गत बांबू प्रोसेसिंग, सेकंडरी बांबू प्रोसेसिंग, बांधकामासाठी बांबूचा उपयोग, बांबूपासून फर्निचर तयार करणे, त्याचप्रमाणे बांबू टर्निंग प्रॉडक्ट आणि फाइन बांबू प्रॉडक्ट हे उच्च प्रकारचे प्रशिक्षणही देण्यात येणार असून राज्य मंत्रिमंडळाने या प्रशिक्षण केंद्राकरिता संचालक व अन्य 22 पदनिर्मिती तसेच इतर खर्चापोटी सुमारे 11 कोटी 12 लाख इतक्या खर्चास मान्यता दिली आहे, मात्र चंद्रपूरच्या धर्तीवर कोकणातही या बांबू उद्योगाला प्रोत्साहन मिळाल्यास या बुरूड व्यवसायाचे पुनरूज्जीवन होऊ शकेल. सध्या राज्यात 7900 नोंदणीकृत बुरूड असून 30 ऑॅगस्ट 1997नंतर नवीन बुरूडांची नोंदणी करण्यात आली नाही. राज्यातील नवीन बुरूडांची नोंदणी करणे तसेच बुरूड कारागिरांना स्वयंरोजगाराला प्रोत्साहन मिळावे म्हणून स्वामित्व शुल्क न आकारता बांबूचा पुरवठा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेताना स्वामित्व शुल्कातील सवलत प्रतिकुटुंब प्रतिवर्षी 1500 बांबू इतक्या मर्यादेत देण्याचाही निर्णय घेतला आहे. पोलादपूर तालुक्यातील त्वष्टा कासार व्यावसायिक व जात अस्तंगत झाल्यापासून तांबे आणि पितळेच्या धातूच्या भांड्यांना कल्हई लावणार कोण, या समस्येपोटी स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांनी पोलादपूरकरांच्या संसारातून तांबे अन् पितळेच्या भांड्यांना हद्दपार केले आहे. अनेकांनी भंगार व मोडीमध्ये तांबे, पितळेच्या भांड्यांसह बिडाच्या तव्यांनादेखील अल्प मोबदल्यात विकून घरातील नको असलेली अडगळ कमी केली आहे. त्यामुळे तालुक्यातील बुरूड व्यवसायातील कारागिरांची घटणारी संख्या चिंताजनक असून कोकणात पर्यटनाचे वारे वाहताना पारंपरिक व्यवसायांना चालना देण्याच्या सरकारी प्रयत्नांचा लाभ घेत तालुक्यातील युवकांनी या व्यवसायाकडे वळणे आवश्यक आहे. पर्यटकांना आकर्षित करणार्‍या नवनवीन शोभिवंत वस्तूंची निर्मिती बांबूपासून केल्यास आर्थिक उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण होईल. वाढती बेकारी, कर्ज घेऊन उद्योग सुरू करताना निर्माण होणार्‍या अडचणी यामुळे अनेक बेरोजगार वैफल्यग्रस्त असताना त्यांना अत्यंत कमी भांडवलात उत्पन्न मिळवून देणारा हा व्यवसाय फायदेशीर आहे, मात्र आता कोकणातील लोकप्रतिनिधींनी चंद्रपूरच्या धर्तीवर कोकणातही या व्यवसाय प्रशिक्षणासाठी मागणी लावून धरण्याची गरज आहे.

-शैलेश पालकर, खबरबात

Check Also

ललिता इनकर यांचा वाढदिवस

पनवेल : भाजपच्या रायगड जिल्हा अनुसूचित जाती मोर्चा चिटणीस ललिता इनकर यांच्या वाढदिवसानिमित्त माजी खासदार …

Leave a Reply

Whatsapp