Saturday , August 15 2020
Home / महत्वाच्या बातम्या / कशेडी घाटात पुन्हा केमिकल सोडले पोलादपूर पोलिसांकडून दोघांना अटक

कशेडी घाटात पुन्हा केमिकल सोडले पोलादपूर पोलिसांकडून दोघांना अटक

पोलादपूर : प्रतिनिधी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत टँकरमधील केमिकल सोडण्याची तिसरी घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली, मात्र या वेळी गस्त घालणार्‍या पोलादपूर पोलिसांनी टँकरमधील दोघांना घटनास्थळी पकडले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांचा आधीच्या दोन घटनांशी संबंध आहे का याची चौकशी पोलादपूर पोलीस करीत आहेत.
महामार्गावरील पार्ले आणि पार्लेवाडी गावानजीक 28 डिसेंबर 2019 रोजी पहाटेच्या सुमारास एका अज्ञात टँकरमधून द्रवरूप केमिकल ओतले होते. ते केमिकल सावित्री नदीत वाहत जाऊन अनेक जलचर मृत झाले होते. त्यानंतर 22 जानेवारी रोजी कशेडी घाटातील या महामार्गालगतच्या पार्टेवाडी येथील प्रतापगड दर्शन फलकाजवळही टँकरमधील केमिकल ओतल्याची घटना घडली होती.
पोलादपूर पोलीस ठाण्याची जीप घेऊन पोलीस नाईक गणेश किर्वे आणि चालक हे कशेडी घाटात सोमवारी रात्री गस्त घालत होते. त्यांना भोगाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील पार्टेवाडी येथील प्रतापगड दर्शन फलकाजवळ एक टँकर (एमपी 33 एच 0827) उभा असलेला दिसला. या टँकरमधील पीएसी नावाचे केमिकल दरीमध्ये सोडताना मनोहर नागूसिंग सिसोदिया (वय 33, रा. नागदा, मध्यप्रदेश) आणि भैरूलाल चुन्नीलाल बराला (वय 42, रा. अमलावदिया, मध्यप्रदेश) या दोघांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्यांच्या विरोधात भा.दं.वि. 278,284,34 कलमान्वये गुन्हा दाखल करून पोलादपूर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे, तसेच टँकर व पीएसी केमिकलसह एकूण 4.23 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Check Also

‘महावितरण’ने कारभार सुधारावा

मागण्या मान्य न झाल्यास करणार आंदोलन कर्जत : बातमीदार कर्जत शहरात मागील काही दिवसांपासून विजेचा …

Leave a Reply

Whatsapp