Wednesday , April 1 2020
Home / महत्वाच्या बातम्या / दिल्लीच्या कौलाचा अन्वयार्थ

दिल्लीच्या कौलाचा अन्वयार्थ

काँग्रेसचे माजी पक्षाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी काही मतदारसंघांमध्ये तुरळक सभा घेतल्या खर्‍या, परंतु नेहमीप्रमाणे मतदारांवर त्याचा उलटाच परिणाम झाला असावा. परिणामी वर्षानुवर्षे दिल्लीत तळ ठोकून असलेल्या काँग्रेस हाय कमांडच्या नाकाखाली त्यांच्या पक्षाला खाते देखील उघडता आले नाही. त्या तुलनेत भारतीय जनता पक्षाची मतांची टक्केवारी लक्षणीयरित्या वाढलेली दिसते.

अपेक्षेप्रमाणेच दिल्ली राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीचा कौल आम आदमी पक्षाच्या बाजूने लागला आहे. ‘आप’चा हा विजय तसा अपेक्षितच नव्हे तर निश्चित देखील मानला जात होता. दोनच दिवसांपूर्वी झालेल्या विविध टीव्ही वाहिन्यांच्या एक्झिट पोलमध्ये ‘आप’च्याच सरशीचे भाकित वर्तवण्यात आले होते. थोड्याफार फरकाने प्रत्यक्ष निकाल देखील एक्झिट पोलच्या अंदाजानुसार लागले. दिल्लीकर जनतेने ‘आप’च्या पारड्यात भरभरून मतदान केले. जनता जनार्दनाचा हा कौल मान्य केलाच पाहिजे. यंदाच्या निवडणुकीत सुरूवातीपासूनच ‘आप’ने भरभक्कम मोर्चेबांधणी व महागड्या प्रचारावर भर दिला होता. गेले जवळपास वर्षभर विविध टीव्ही वाहिन्यांवर दिल्लीतील ‘आप’ सरकारच्या जाहिराती सातत्याने झळकत होत्या. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची छबी सातत्याने मतदारांवर ठसवली जाईल तसेच विकासकामांचा उदो उदो देखील केला जाईल याची काळजी घेण्यात आली होती. सत्तेत असलेल्या ‘आप’ने आपल्या ताकदीचा पुरेपूर वापर केला आणि गेली दीड-दोन वर्षे निवडणुकीसाठीच सारी यंत्रणा राबवली. त्या तुलनेत भारतीय जनता पक्ष फारच उशीराने निवडणुकीच्या कामाला लागला असेच म्हणावे लागेल. काँग्रेसने तर पुरती हाय खाऊन रणांगण सोडून दिल्यासारखेच होते. 2015 सालच्या निवडणुकांमध्ये भाजपला फक्त तीन जागा मिळवता आल्या होत्या. यंदा हा आकडा दुपटीपेक्षा जास्त आहे. जागांचा हिशेब पाहता भाजपला फारसे यश मिळालेले दिसत नसले तरी बहुसंख्य ठिकाणी भाजपच्या उमेदवारांनी आम आदमी पक्षाच्या तालेवार उमेदवारांची हबेलहंडी उडवल्याचे चित्र दिसले. दिवसभर भाजप आणि ‘आप’ यांच्या मध्येच दुरंगी लढत चालू असल्याचे दिसले. या लढाईत काँग्रेसचा मागमूस देखील नव्हता याकडे लक्ष वेधणे आवश्यक आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अपेक्षित यश न मिळण्याचे आणखी एक कारण म्हणजे मुख्यमंत्री पदाचा कुठलाही प्रभावी चेहरा भाजपकडे नव्हता. उलटपक्षी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी आपल्याच प्रतिमेच्या जोरावर ही निवडणूक लढवली आणि बाजी जिंकली सुद्धा. दिल्लीच्या मुस्लिमबहुल भागांमध्ये अनेक ठिकाणी भाजपच्या उमेदवारांना चांगली मते मिळाल्याचे दिसून आले आहे. याचा योग्य तो बोध घेतला जाईलच. शाहीनबागेत सुरू असलेल्या सीएए आणि एनआरसीविरुद्धच्या तथाकथित आंदोलनाचा जबरदस्त फटका काँग्रेसला मिळाला हे या निवडणुकीचे फलितच म्हणावे लागेल. सीएए आणि एनआरसी यांच्या विरोधात भ्रामक समजुती पसरवून जनतेचा बुद्धिभेद करण्याचे राजकारण काँग्रेस आणि काही डाव्या पक्षांनी सुरू केले होते. शाहीनबागेत त्याचेच प्रतिबिंब दिसून येत आहे. गेला दीड महिना तेथील रस्त्यावर सुरू असलेल्या या आंदोलनामुळे दिल्लीच्या मतदारांवर परिणाम होईल असा अंदाज होता. परंतु मतदार नेहमीच सुजाण असतो. ज्या मतदारांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या सरकारला पुन्हा एकदा सत्तेवर आणले, त्याच मतदारांनी गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झोळीत मतांचे भरभरून दान टाकले होते हे विसरून चालणार नाही.

Check Also

कानसा वारणा फाऊंडेशनचे मोलाचे कार्य

मोहोपाडा : प्रतिनिधी कानसा वारना फाऊंडेशनच्या वतीने राज्यभर वृक्ष लागवड, कला, क्रीडा, सांस्कृतिक आदीं विविध …

Leave a Reply

Whatsapp