Wednesday , April 1 2020
Home / महत्वाच्या बातम्या / मांडूळ सापाची तस्करी

मांडूळ सापाची तस्करी

खालापुरात तीन आरोपी जेरबंद; पोलीस कोठडी

खालापूर : प्रतिनिधी
अंधश्रद्धेतून मांडूळ सापाच्या तस्करीचे प्रकार अलिकडे वाढू लागले असून, खालापूर तालुक्यातील वावोशी परिसरात विक्रीसाठी घेऊन आलेल्या मांडूळ सापासह तिघांना वनविभागाच्या पथकाने जेरबंद केले आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
खालापूर तालुक्यातील वावोशी परिक्षेत्रात मांडूळ जातीचा साप घेऊन काही व्यक्ती येणार असल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने मंगळवारी (दि. 11) सापळा रचला. त्या वेळी सिदेश्वर मंदिराजवळ सागर रामदास कातकरी व नथुराम हिरामण पवार हे जिवंत साप विक्री साठी घेऊन आले असता, त्यांना ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीअंती हा साप बळीराम मर्‍या वाघमारे या व्यक्तीचा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या आरोपीला डोणवत खरवली रोड येथून ताब्यात घेण्यात आले. या तिघांविरोधात वन्यजीव संरक्षण कायदा 1972चे कलम  9, 39 (1)(ए), 50(1)(सी)(4), 51(1) अंतर्गत कारवाई करण्यात आली. आरोपींना खालापूर न्यायालयात हजर केले असता, दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.
उपवनसंरक्षक मनीष कुमार, सहाय्यक वनसंरक्षक किरण जगताप, श्री. कुप्ते यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर परीक्षेत्र वन अधिकारी आशिष पाटील, सोनाली कडनोर, वनपाल अंभेरे, ढाकोल, गायकवाड, वनरक्षक कटवटे, खटावकर, साळुंके, खांदारे, भदाने, रायबन, घुटे, खोत यांनी ही कारवाई केली.

Check Also

कानसा वारणा फाऊंडेशनचे मोलाचे कार्य

मोहोपाडा : प्रतिनिधी कानसा वारना फाऊंडेशनच्या वतीने राज्यभर वृक्ष लागवड, कला, क्रीडा, सांस्कृतिक आदीं विविध …

Leave a Reply

Whatsapp