Wednesday , February 26 2020
Home / महत्वाच्या बातम्या / क्रीडा / अमेरिकेचा संघ 35 धावांत गारद

अमेरिकेचा संघ 35 धावांत गारद

वन डे क्रिकेटमध्ये नेपाळने रचला इतिहास

किर्तीपूर (नेपाळ) : वृत्तसंस्था
आयसीसीच्या क्रिकेट वर्ल्डकप लीग-2मध्ये बुधवारी (दि. 12) नेपाळ विरुद्ध अमेरिका या वन डे सामन्यात सर्वांत नीचांकी खेळीची नोंद झाली. नेपाळने अवघ्या 35 धावांत अमेरिकेचा डाव गुंडाळून वन डे क्रिकेटमध्ये इतिहास रचला.
अमेरिकेचा सलामीवीर झेव्हीयर मार्शल (16) वगळता अन्य फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तीन फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत. 2004मध्ये श्रीलंकेने झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ 35 धावांत माघारी पाठवला होता. त्यांनी 2003 साली स्वतःच्याच नावावर (36 वि. कॅनडा) असलेला विक्रम मोडला होता.
नेपाळने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. दुसर्‍याच षटकात संदीपने अमेरिकेला पहिला धक्का दिला. त्याने सलामीवीर इयान हॉलंडला (0) माघारी पाठवले. मार्शल सातव्या षटकात बाद झाला आणि त्यानंतर अमेरिकेच्या डावाची पडझड सुरूच झाली. 2 बाद 23 वरून अमेरिकेचा संपूर्ण संघ 35 धावांत तंबूत परतला. संदीपने 6 षटकांत एक निर्धाव टाकून 16 धावा देत 6 विकेट्स घेतल्या. त्याला सुशान भारीने 4 विकेट्स घेत चांगली साथ दिली.
माफक लक्ष्याचा पाठलाग करताना नेपाळची सुरुवातही खराब झाली. कर्णधार ग्यानेंद्र मल्ला आणि सुबाश खाकुरेल हे दुसर्‍याच षटकात माघारी परतले. यानंतर पासर खडका (20*) आणि दीपेंद्र एईरी (15*) यांनी नेपाळला 5.2 षटकांत विजय मिळवून दिला.

Check Also

ललिता इनकर यांचा वाढदिवस

पनवेल : भाजपच्या रायगड जिल्हा अनुसूचित जाती मोर्चा चिटणीस ललिता इनकर यांच्या वाढदिवसानिमित्त माजी खासदार …

Leave a Reply

Whatsapp