Wednesday , February 26 2020
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / विवेक पाटलांच्या अटकेची जोरदार मागणी

विवेक पाटलांच्या अटकेची जोरदार मागणी

कर्नाळा बँकेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात चीड आणि संताप

पनवेल ः रामप्रहर वृत्त
कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या कारभारात 63 बोगस कर्ज प्रकरणे करून त्यातील 512.50 कोटी रुपये लंपास करणारे व सर्वसामान्यांच्या पैशांवर डल्ला मारणारे शेकाप नेते,  कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार विवेक पाटील यांना अटक करा, अटक करा, अशी जोरदार मागणी गुरुवारी (दि. 13) पनवेलमध्ये हजारो ठेवीदारांच्या साक्षीने झालेल्या मोर्चात करण्यात आली. कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून पनवेल परिसरातून निघालेल्या विराट मोर्चात हजारोंच्या संख्येने कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे ठेवीदार, खातेदारांसह सर्वसामान्य नागरिक तसेच तरुणांसह वृद्धही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पूर्वनियोजनाप्रमाणे विराट मोर्चा कर्नाळा नागरी सहकारी बँकेवर धडकणार होता, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव व पोलिसांच्या विनंतीनुसार मोर्चा कर्नाळा बँकेपासून काही अंतरावर थांबवण्यात आला. तिथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.
कर्नाळा बँक घोटाळ्यामुळे हजारो ठेवीदार व खातेदार आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांना वारंवार आश्वासने देण्याचे काम शेकाप नेते विवेक पाटील करीत आहेत, मात्र ठेवीदारांना पैसे दिले जात नाहीत, तर दुसरीकडे सरकारही याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे ठेवीदारांना त्यांच्या हक्काचे पैसे परत मिळावेत यासाठी कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून गुरुवारी पनवेलमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला होता. कर्नाळा बँकेत कोट्यवधींचा घोटाळा उघडकीस येऊनही बँकेचे अध्यक्ष, माजी आमदार विवेक पाटील ठेवीदारांना टोलवाटोलवीची उत्तरे देत ठेवीदार, खातेदार व त्यांच्यावर विसंबून असलेल्या हजारो कुटुंबीयांच्या आयुष्याशी खेळत आहेत. त्यामुळे अनेकांचे जीवन उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. या सर्व प्रकरणामुळे ठेवीदार संकटात सापडले असून त्यांना दिलासा व न्याय देण्याच्या भूमिकेतून माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून कार्यरत आहेत.  
63 बोगस कर्जखाते तयार करून तब्बल 512.50 कोटी घेतल्याचे विवेक पाटील यांनी लिहून दिले आहे. घोटाळा उघड झाल्याने अटक टाळण्यासाठी विवेक पाटील यांनी पत्रके प्रसिद्ध करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. सर्वसामान्यांचे पैसे गिळंकृत करण्याचे काम विवेक पाटलांनी केले असतानाही पैसे देण्याऐवजी ठेवीदारांना उलट उत्तर देण्याचा सपाटा त्यांनी लावला आहे. गरज लागली तर संपत्ती विकेन, अशी शेखी विवेक पाटील यांनी मिरवली होती. आपल्या संपत्तीवर टाच येणार असल्याने विवेक पाटील यांनी आपला ’आस्वाद’ बंगला सोयर्‍यांना विकला, पण ही मालमत्ता विकली तर त्याचा पैसा ठेवीदारांना का दिला नाही, असा सवाल ठेवीदार करीत आहेत. सहा महिन्यांपासून ठेवीदारांना पैसे मिळत नसल्याने ते हवालदिल झाले आहेत, मात्र विवेक पाटलांना त्यांची दया येत नाही. त्यामुळे कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून आयोजित मोर्चात ’अटक करा, अटक करा पैसे खाणार्‍या विवेक पाटलांना अटक करा’ अशा घोषणांनी पनवेल दणाणून गेले होते. या वेळी विवेक पाटील यांच्यावरील ठेवीदारांची चीड आणि संताप प्रकर्षाने जाणवत होता.
कर्नाळा बँकेच्या एकूण 633 कोटींच्या कर्जापैकी 512 कोटी 55 लाख रुपयांची कर्जे बोगस असल्याचे सहकार खात्याच्या अहवालाने स्पष्ट केले असून ही सर्व कर्जे प्रत्यक्ष कर्जदारांनी न घेता विवेक पाटील यांच्या कर्नाळा स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी, कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट या दोन संस्थांत वापरल्याचे जगजाहीर झाले आहे. सहकारातील नियमांची पायमल्ली करून विवेक पाटलांनी बोगस कर्ज प्रकरणे उभी करून बनावट कागदपत्रांच्या आधारे स्वतःच पैसे हडप केलेत. असे स्पष्ट असतानाही विवेक पाटील यांनी मात्र आपल्या नेहमीच्या तोर्‍यात बनावटी उत्तरांची मालिका सुरूच ठेवली आहे, मात्र पैसे कधी देणार याचे ठोस उत्तर ते देत नाहीत. त्यामुळे कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील व संचालकांवर कडक कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
या वेळी ठेवीदारांना समर्थन देण्यासाठी महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, उपाध्यक्ष वासुदेव घरत, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, शहराध्यक्ष कौशिक शहा, पनवेल उपाध्यक्ष संजय पाटील, पंढरीनाथ फडके, के. ए. म्हात्रे, राज्य परिषद सदस्य विनोद साबळे यांसह नगरसेवक-नगरसेविका, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.  
ग्रामपंचायतींसह गावांचा विकासही खुंटला
कर्नाळा नागरी सहकारी बँक विशेषतः विवेक पाटील यांनी केलेल्या घोटाळ्यामुळे शेतकरी, नोकरदार, माजी सैनिक, छोटेमोठे व्यावसायिक, दुकानदार अशा जिल्ह्यातील लाखो सर्वसामान्य नागरिकांवर याचा परिणाम झाला आहे. अनेक ग्रामपंचायतींचे व गावांचे कोट्यवधी रुपये बँकेत अडकल्याने ग्रामपंचायतींचा व गावांचा विकासही खुंटला. बँकेच्या 17 शाखा आणि त्यात जवळपास 40 हजार खातेदार आहेत. अनेकदा ठेवीदारांनी बँक आणि अध्यक्ष विवेक पाटील यांच्याकडे फेर्‍या मारल्या, मात्र ठेवीदारांना त्यांचे पैसे विवेक पाटील यांनी आजपर्यंत दिले नाहीत. याला निर्लज्जपणाचा कळसच म्हणावा लागेल. सहा महिन्यांपासून बँकेचा कारभार ठप्प असताना अध्यक्ष व संचालक मंडळ मात्र ठेवीदारांना टोलवाटोलवीची उत्तरे देत आहेत.
विवेक पाटील, लोकांची हाय घेऊ नका : किरीट सोमय्या  
निवडणुकीपूर्वीचा प्रश्न निवडणूक झाल्यावर संपतो, अशी सर्वांची धारणा आहे व तसेच बघायला मिळते, पण आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी लोकांच्या हक्कासाठी परिश्रम घेत न्याय मिळवून देण्याचे प्रामाणिक प्रयत्न सुरूच ठेवले. ठेवीदार कुठल्या पक्षाचा हे त्यांनी बघितले नाही, तर ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत, ही सामाजिक भावना ठेवली. आम्हाला कुणालाही जेलमध्ये टाकायचा शौक नाही, पण गोरगरिबांचे पैसे गिळंकृत करणार्‍यांना धडा मिळालाच पाहिजे. ठेवीदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अनेकांचे संसार उद्ध्वस्त करण्याचे काम विवेक पाटील यांनी केले असून लोकांची हाय घेऊ नका. लोकांना त्यांच्या हक्काचे पैसे परत करा.
कार्यकर्त्यांना अडकवणारा असा कसा हा नेता?
सर्वसामान्यांचे पैसे हडप करून विवेक पाटील यांनी अनेकांना देशोधडीला लावले. व्हॉट्सअ‍ॅपवरून भावनिक संदेश प्रसारित करण्याऐवजी पैसे देण्याची निश्चित तारीख विवेक पाटील का जाहीर करीत नाहीत? विवेक पाटलांची पैसे परत करण्याची नियत व दानत नाही. त्यांनी आपलेच पदाधिकारी, कार्यकर्त्यांना घोटाळ्यात अडकवले. असा कसा हा नेता? विवेक पाटील यांनी बोगस कर्ज प्रकरणांद्वारे 512.50 कोटी स्वतःच्या कर्नाळा स्पोर्ट्स, कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टमध्ये वळते केले. या घोटाळ्यास विवेक पाटीलच जबाबदार आहेत. विवेक पाटलांची तयारी असेल तर आम्ही एकाच व्यासपीठावर येऊन चर्चेस तयार आहोत. विवेक पाटील यांनी गोरगरीब ठेवीदारांचे पैसे कधी देणार ते जाहीर करावे, अन्यथा आमचा संघर्ष अधिक तीव्र करू. पेण अर्बन बँकेतील ठेवीदारांच्या हक्कासाठीही आम्ही प्रयत्न केले. कर्नाळा बँकेत पनवेल, उरणमधील अनेकांचे पैसे अडकलेत. या विभागाचे लोकप्रतिनिधी म्हणून ठेवीदारांच्या न्यायासाठी आम्ही कार्यरत आहोत. ठेवीदारांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळालेच पाहिजेत, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी ठणकावले.
80 टक्के आजारी बँक  कोण स्वीकारणार?
कर्नाळा बँकेतील 512 कोटी 55 लाखांची कर्जे बोगस असल्याचे सहकार खात्याच्या अहवालात उघड झाले. 512 कोटी 52 लाख रुपये विवेक पाटील यांनी स्वतः हडप केलेत. पैसे मागायला गेल्यावर विवेक पाटील जाळून घेण्याची भाषा करतात. लोकांना कर्ज देऊन त्यावर स्वतःचा पक्ष चालवणार्‍या विवेक पाटलांनी मुजोरपणा कमी करावा. कर्नाळा बँकेच्या विलीनीकरणात विरोधक खोडा घालत असल्याच्या गमजा विवेक पाटील मारताहेत, पण आपण कुत्रा विकत घेतानाही गुबगुबीत निवडतो. कर्नाळा बँक तर 80 टक्के एनपीएने आजारी झाली आहे. तिला कोणती बँक विलीन करून घेईल? शेकाप कधीच एकटा लढू शकत नाही. सध्या पक्ष महाविकास आघाडीच्या दावणीला बांधला आहे. सरकारही महाआघाडीचे आहे. हे सरकार जाणूनबुजून घोटाळ्याकडे दुर्लक्ष करतेय. विवेक पाटलांनी कितीही डावपेच रचले तरी ठेवीदारांचे पैसे परत मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. पैसे न दिल्यास विवेक पाटील व या घोटाळ्यातील इतर दोषींना लवकरच अटक होईल, असे आमदार महेश बालदी यांनी स्पष्ट केले.

Check Also

ललिता इनकर यांचा वाढदिवस

पनवेल : भाजपच्या रायगड जिल्हा अनुसूचित जाती मोर्चा चिटणीस ललिता इनकर यांच्या वाढदिवसानिमित्त माजी खासदार …

Leave a Reply

Whatsapp