Wednesday , February 26 2020
Home / महत्वाच्या बातम्या / भारताचे व्हॅलेंटाइन

भारताचे व्हॅलेंटाइन

पुलवामा आणि शहिदांचा स्मृतिदिन याचे राजकारण करु नये एवढा साधा विवेक देखील काँग्रेसच्या नेत्यांना दाखवता आला नाही याचे मनस्वी दु:ख होते. बेजबाबदार विरोधक असणे हे लोकशाही व्यवस्थेसाठी नेहमीच बाधक असते. राहुल गांधी यांचे ताजे वक्तव्य त्याचेच निदर्शक आहे. अवघी तरुणाई संयमाने व्हॅलेंटाइन डे साजरा करीत असताना शहिदांची आठवण ठेवते. परंतु काँग्रेसचे नेते शहिदांना देखील राजकारणात ओढल्याशिवाय राहात नाहीत ही दुर्दैवी बाब म्हणावी लागेल.

अवघे जग दरवर्षी 14 फेब्रुवारी ही तारीख ‘व्हॅलेंटाइन डे’ म्हणून साजरे करते. भारतातील तरुणाई देखील त्याला अपवाद नाही. जगभरातील तरुण-तरुणी या प्रेमदिनी प्रीतीच्या आणाभाका घेत असतात. भारतासाठी मात्र गेल्या वर्षीपासून 14 फेब्रुवारी या दिवसाचा जणू अर्थच बदलून गेला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी काश्मीर खोर्‍यातील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी घडवलेल्या घातपातामध्ये केंद्रीय सुरक्षा बलाचे 40 जवान शहीद झाले होते. भारतीय समाजमनावरील ती जखम अजूनही भळभळते आहे. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशीच काश्मीरातील दहशतवाद्यांनी डाव साधून सीआरपीएफच्या वाहनांच्या ताफ्यावर स्फोटकांनी भरलेली मोटार आदळून भयानक उत्पात घडवला होता. तोच हा दिवस. म्हणूनच नेमेचि येणारा व्हॅलेंटाइन डे यंदा वेगळा भासतो आहे. वास्तविक गेले आठवडाभर रोझ डे, चॉकलेट डे अशा अनेक दिवसांचे कवतिक मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये चालू आहे. दुकाने आणि उपाहारगृहे आपापल्या परीने यासाठी सजली-धजली आहेत. परंतु तरुणाईच्या या सेलिब्रेशनमध्ये व्हॅलेंटाइन डेचा उत्साह किंचितसा कमी झालेला दिसला तो पुलवामातील शहिदांच्या आठवणीमुळेच. पुलवामातील पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी घातपाताचा पुरेपूर वचपा काढत भारतीय लष्कराने किंवा सैन्यदलाने धडाक्यात एअर स्ट्राइक घडवून आणले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत कणखर भूमिका घेत पाकिस्तानचे नाक ठेचले आणि शेजारधर्माला कलंक असलेल्या या शत्रूराष्ट्राची जगभर नाचक्की झाली. या पाठोपाठ झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये दणदणीत बहुमतानिशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर भारतीय मतदारांनी पुन्हा एकवार शिक्का उमटवला. ही बाब काँग्रेससारख्या पक्षाला सहन होण्यासारखी नव्हतीच. पंतप्रधान मोदी यांच्या द्वेषाचा एककलमी कार्यक्रम राबवणार्‍या काँग्रेसची अवस्था ही अपयशी प्रादेशिक पक्षाहून अधिक केविलवाणी झालेली आहे. काँग्रेसच्या या द्वेषमूलक राजकारणाचे धुरिण नेतृत्व अर्थात खासदार राहुल गांधी यांच्याकडे जाते. सारा देश शुक्रवारी पुलवामातील शहिदांना श्रद्धांजली वाहात असताना सन्माननीय राहुल गांधी यांनी शहिदांबाबत कृतज्ञतेचे दोन शब्द सोडा, साधा हुंकार देखील काढला नाही. उलटपक्षी, पुलवामातील घटनेचा फायदा कुणाला झाला? या घातपाताचे उत्तरदायित्व कोणाचे? लष्कराच्या सुरक्षाव्यवस्थेत झालेली गफलत कोणाची? आणि पुलवामा दुर्घटनेच्या चौकशी अहवालाचे काय झाले? असे प्रश्न अकारण उपस्थित करून निकृष्ट दर्जाच्या राजकारणाचे दर्शन घडवले. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर साहजिकच देशभर टीकेची झोड उठली. आणि समाजमाध्यमांनी तर त्यांच्यावर यथास्थित तोंडसुख घेतले. समाजमाध्यमांवर सर्वाधिक वावर तरुणाईचाच असतो हे उघड आहे. एका अर्थाने राहुल गांधी आणि त्यांच्या काँग्रेसचे राजकारण भारतीय तरुण-तरुणींनी धिक्कारले हे बरेच झाले. काही विषय हे राजकारणाच्या पलीकडले असतात व तसे ते असायलाच हवेत. पुलवामा ही भारतीयांची भळभळती जखम आहे. त्याचे हलक्या स्वरुपाचे राजकारण कदापि होता कामा नये.

Check Also

ललिता इनकर यांचा वाढदिवस

पनवेल : भाजपच्या रायगड जिल्हा अनुसूचित जाती मोर्चा चिटणीस ललिता इनकर यांच्या वाढदिवसानिमित्त माजी खासदार …

Leave a Reply

Whatsapp