Wednesday , February 26 2020
Home / महत्वाच्या बातम्या / आजपासून भाजपचे प्रदेश अधिवेशन

आजपासून भाजपचे प्रदेश अधिवेशन

आगामी वाटचालीची दिशा होणार स्पष्ट; नवी मुंबई सज्ज

नवी मुंबई : बातमीदार
भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अधिवेशन 15 व 16 फेब्रुवारी रोजी नेरूळमधील स्व. राम कापसेनगर येथे होत असून, या माध्यमातून महाराष्ट्रातील पुढच्या राजकीय वाटचालीची दिशा कार्यकर्त्यांना देण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून फेरनिवड झालेले चंद्रकांत पाटील या अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. भाजपच्या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी नवी मुंबई सज्ज झाली आहे.
या अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत, तर भाजप राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश, केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे-पाटील, माजी अर्थमंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक यांसह पक्षाचे विविध नेते उपस्थित राहणार आहेत.
दोन दिवस चालणार्‍या राज्यस्तरीय अधिवेशनात पहिल्या दिवशी सकाळी 10 ते दु. 1 वाजेपर्यंत लोकसभा व विधानसभा निवडणुकांदरम्यान पक्षकार्याला वाहून घेतलेल्या भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विस्तारकांची बैठक होणार आहे. दुपारी 2 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रदेश कार्यकारिणीची बैठक होणार असून यात सर्व सदस्य, राज्यातील भाजपचे सर्व आमदार, खासदार उपस्थित राहणार आहेत, तर सायंकाळी 6 ते रात्री 8 वाजेदरम्यान नवी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे सर्व नगरसेवक, मंडळ पदाधिकार्‍यांची बैठक वाशी एनएमएसएला होणार आहे.  
दुसर्‍या दिवशी सकाळी 8 वा. वाशी सेक्टर 15 येथील पक्षाच्या कार्यालयाचे भूमिपूजन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत रहेजा ग्राऊंडवर राज्याच्या सर्व जिल्ह्यांतील भाजप आमदार, खासदारांसह पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला आघाडी यांची बैठक होणार आहे. बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा मार्गदर्शन करणार आहेत.
या अधिवेशनाला महाराष्ट्रातील भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी, नगरपालिकांपासून ते खासदारांपर्यंत, मंडल अध्यक्षांपासून जिल्हा अध्यक्ष, सरचिटणीस, आघाड्यांचे संयोजक असे सुमारे 10 हजार प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील नगरसेवकांची वेगळी बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, नवी मुंबई प्रभारी संजय उपाध्याय, आमदार सर्वश्री गणेश नाईक, मंदा म्हात्रे, रमेश पाटील, जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत मार्गदर्शन करणार आहेत. या वेळी कृषी उत्पन्न बाजार समिती, सिडको इमारतींचा पुनर्विकास, नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमितीकरण व प्रॉपर्टी कार्ड, झोपडपट्टीधारकांसाठी एसआरए योजना अशा अनेक मुद्द्यांना हात घातला जाणार आहे.
राज्य अधिवेशनामध्ये दोन प्रस्ताव पारित होतील. त्यामध्ये जनादेशाचा अपमान करून शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने संधीसाधू महाविकास आघाडी सरकार बनविले. त्यांच्या 80 दिवसांच्या कारभाराचा पंचनामा प्रस्तावाद्वारे करण्यात येईल, तसेच सत्तेवर आल्यावर जनतेची फसवणूक कशी चालू आहे याची झाडाझडतीही प्रस्तावाद्वारे होईल. राज्यस्तरीय अधिवेशनाचा समारोप माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करणार आहेत.
‘सीएए’च्या पाठिंब्याचा ठराव मांडणार
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने जनहिताचे अनेक निर्णय व योजना राबविल्या. राम मंदिराच्या निर्माणासाठी ट्रस्टच्या स्थापनेबरोबरच नागरिकता सुधारणा कायदा (सीएए) करून महत्त्वाचे व ऐतिहासिक कार्य केले. त्याबद्दल पाठिंबा दर्शविणारा ठराव प्रदेश अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीत बदललेल्या राजकीय समीकरणात येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारीबाबतही या वेळी चर्चा केली जाणार आहे.

Check Also

ललिता इनकर यांचा वाढदिवस

पनवेल : भाजपच्या रायगड जिल्हा अनुसूचित जाती मोर्चा चिटणीस ललिता इनकर यांच्या वाढदिवसानिमित्त माजी खासदार …

Leave a Reply

Whatsapp