Wednesday , February 26 2020
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / …तर निष्ठावानांचे देवच रक्षण करो!

…तर निष्ठावानांचे देवच रक्षण करो!

शेतकरी कामगार पक्षाचे नेते व माजी आमदार विवेक पाटील अध्यक्ष असलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेत तब्बल 512 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले असून, या घोटाळ्याची व्याप्ती आणखी मोठी आहे. असंख्य ठेवीदार व खातेदारांनी कष्ट करून कर्नाळा बँकेत जमा केलेली त्यांची आयुष्यभराची पुंजी या घोटाळ्यामुळे संकटात सापडली आहे. हक्काचे पैसे मिळत नसल्याने त्यांची प्रचंड आर्थिक परवड होत आहे. यात वृद्ध, महिला, मुलाबाळांसह ग्रामपंचायती, सोसायट्या, छोटे-मोठे उद्योजक, स्वयंसेवी संस्था, सरकारी व निमसरकारी विभागांचेही पैसे अडकले आहेत. असे असताना बँक आणि बँकेशी संबंधित मंडळी मात्र चालढकल करीत आहेत. या महाघोटाळ्याचा पर्दाफाश करणारी मालिका…
कर्नाळा बँकेच्या अनागोंदी कारभारामुळे अनेक ठेवीदार, खातेदारांसह कर्जदार आणि ज्यांचा कर्जाशी संबंध नाही अशा व्यक्तींनाही या घोटाळ्याचा मानसिक आणि आर्थिक फटका बसणार हे निश्चित झाले आहे. या सर्व प्रकारात शेकापचे नेते आणि बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांनी जुन्या, निष्ठावंत शेकाप कार्यकर्त्यांना आणि संचालकांना गोवल्यामुळे त्यांनाही याचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर विवेक पाटील आणि शेकापशी निष्ठावान असलेल्या कार्यकर्त्यांनीदेखील या बाबीचा विचार करण्याची गरज असल्याचे स्पष्ट होते.
रायगड जिल्हा विशेष लेखा परीक्षण विभागाने केलेल्या सखोल चौकशीत 63 बनावट कर्जखाती आढळून आली होती. या कर्जखात्यांपैकी 52 कर्जखाती ही वेगवेगळ्या फर्म्सच्या नावाने, तर 11 कर्जखाती ही व्यक्तिगत नावाने काढण्यात आली होती. संबंधितांना लेखा परीक्षण विभागाने नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलाविले होते, मात्र नोटीस पाठवण्यात आलेल्या कर्ज खातेदारांपैकी केवळ 40 जणांनी आपले जबाब लेखा परीक्षण विभागाकडे नोंदविले आहेत, तथापि 23 खातेदारांनी मात्र आपले जबाब नोंदविले नाहीत.
यासंदर्भात ‘रामप्रहर’च्या वाचकांसाठी कर्ज यादीतील एक प्रकरण उदाहरणादाखल देत आहोत. संदीप भरत पाटील हे बँकेचे सभासद होते. त्यांची मे. एस. एस. कन्स्ट्रक्शन नावाची भागीदारी फर्म होती. या फर्मसाठी कर्जखाते क्रमांक 158नुसार घेतलेले कर्ज त्यांनी आठ ते 10 वर्षांपूर्वी पूर्णपणे फेडले होते. त्यानंतर त्यांनी या खात्यावर कोणताही व्यवहार केला नाही. तरीही रायगड जिल्हा विशेष लेखा परीक्षकांनी 21 जानेवारी 2020 रोजी पूर्वीचे बंद केलेले ओडी कर्जखाते 158नुसार संदीप पाटील यांच्याकडे नऊ कोटी 77 लाख 74 हजार 408 एवढी रक्कम 30 सप्टेंबर 2019अखेर बाकी असल्याचे म्हटले होते.
हा धक्कादायक प्रकार पाहून संदीप पाटील यांनी थेट कर्नाळा बँकेकडे धाव घेतली. तेव्हा त्यांना कर्नाळा बँकेमार्फत त्यांचे ओडी खाते क्र. 158 हे निरंक असल्याचे प्रमाणपत्र 21 जानेवारी 2020 रोजी देण्यात आले. अकारण गुंतलेल्या या प्रकरणातून संदीप पाटील यांची सुटका होत असतानाच कर्नाळा बँकेने त्यांना आणखी एक नवा धक्का दिला. कर्जखाते क्र. 111ला संदीप पाटील हे जामीन असल्याचे नमूद करण्यात आले. त्यामुळे संतापलेल्या संदीप पाटील यांनी रायगड जिल्हा विशेष लेखा परीक्षक यांना पत्र लिहून कर्नाळा बँकेचे कर्जखाते 111चे कर्जदार मे. आदित्य कन्स्ट्रक्शनचे मालक राजेंद्र कृष्णा पाटील यांना जामीनदार म्हणून मी कधीही सही केलेली नाही, तसेच जामिनासाठी मी कोणतेही कागदपत्र त्यांना दिलेले नाही, असे स्पष्ट केले.  
या सर्व प्रकारामुळे मानसिक त्रास झालेले संदीप पाटील यांनी कर्जखाते 158 मी पूर्णपणे निरंक केल्यानंतर त्यात झालेल्या कोणत्याही व्यवहाराशी माझा काहीही संबंध येत नाही, तसेच कर्जखाते 111प्रकरणी मी कोणत्याही प्रकारे जामीन नाही, असे जिल्हा लेखा परीक्षण कार्यालयाला पत्र लिहून स्पष्ट केले आहे. या पत्राची प्रत माहिती व योग्य कार्यवाहीसाठी कर्नाळा बँकेच्या सरव्यवस्थापकांनाही दिली आहे. त्याचप्रमाणे या पत्रासोबत आवश्यक कागदपत्रेही संदीप पाटील यांनी सादर केली आहेत.
कर्नाळा बँकेच्या अशा प्रकारच्या अनागोंदी व्यवहारापासून वेळीच सावध झाल्यामुळे संदीप पाटील योग्य पावले उचलू शकले, मात्र एवढा प्रकार होऊनही जे सावध होऊ शकले नाहीत आणि ज्यांचा आंधळा विश्वास शेकाप आणि विवेक पाटील यांच्यावर आहे, त्यांचे देवच रक्षण करो! (समाप्त)

Check Also

ललिता इनकर यांचा वाढदिवस

पनवेल : भाजपच्या रायगड जिल्हा अनुसूचित जाती मोर्चा चिटणीस ललिता इनकर यांच्या वाढदिवसानिमित्त माजी खासदार …

Leave a Reply

Whatsapp