Wednesday , February 26 2020
Home / महत्वाच्या बातम्या / देश-विदेश / कॉलेज मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ

कॉलेज मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ

अमरावती : प्रतिनिधी

प्रेम व्यक्त करण्यासाठीचा खास दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे. मात्र याच दिवसाचे औचित्य साधून एका महाविद्यालयाने त्या महाविद्यालयातील मुलींना एक शपथ दिली आहे. ‘ना प्रेम करणार ना प्रेमविवाह’ तसेच हुंडा न देता लग्न करण्याचा निश्चयही या वेळी मुलींनी केला. हल्ली तरुण वयातच मुलांमध्ये आणि मुलींमध्ये प्रेम प्रकरणांंचे प्रमाण वाढले आहे. तसेच हुंडा घेण्याची पद्धतही वाढली आहे. या सगळ्या बाबी लक्षात घेऊन ही शपथ देण्यात आली.

अमरावती जिल्ह्यातील चांदूर या ठिकाणी असलेल्या महिला आणि कला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी हा निर्धार केला आहे. व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्ताने या विद्यार्थिनींनी प्रेम आणि प्रेमविवाह न करण्याची शपथ घेतली.

काय म्हणाल्या विद्यार्थिनी?

‘मी अशी शपथ घेते की, माझा माझ्या आई वडिलांवर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे समोर घडणार्‍या घटना लक्षात घेता, मी प्रेम व प्रेमविवाह करणार नाही. त्याशिवाय मी माझे लग्न हुंडा घेणार्‍या मुलाशी करणार नाही. समजा सामाजिक परिस्थितीमुळे आज माझे लग्न माझ्या कुटुंबाने हुंडा देऊन केले, तर भावी पिढीतील एक माता म्हणून मी माझ्या होणार्‍या सुनेकडून हुंडा घेणार नाही. तसेच मुलीसाठी हुंडा देणार नाही. एक सामाजिक कर्तव्य म्हणून मी शपथ घेते’

ही शपथ मुलींनाच का? -पंकजा ’कॉलेजात मुलींना प्रेम आणि प्रेम विवाह न करण्याची शपथ देणे हा कमालीचा विचित्र प्रकार आहे. ही शपथ मुलींनाच का? आणि ती ही प्रेम न करण्याची… त्यापेक्षा मुलांनी शपथ घ्यायला हवी की, एकतर्फी प्रेमातून मुलींना त्रास देणार नाही. कोणावर अ‍ॅसिड फेकणार नाही, कुणाला जिवंत जाळणार नाही. कुणाकडे वाकड्या नजरेने बघणार नाही आणि जर कोणी बघितलं तर त्याला चोख प्रत्युत्तर देईन’ अशा तीव्र भावना पंकजा यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.

Check Also

ललिता इनकर यांचा वाढदिवस

पनवेल : भाजपच्या रायगड जिल्हा अनुसूचित जाती मोर्चा चिटणीस ललिता इनकर यांच्या वाढदिवसानिमित्त माजी खासदार …

Leave a Reply

Whatsapp