Thursday , April 2 2020
Home / महत्वाच्या बातम्या / दिल्लीच्या दोन बाजू

दिल्लीच्या दोन बाजू

राजधानी दिल्लीच्या दोन बाजू गेल्या दोन दिवसांत बघाव्या लागल्या आहेत. ज्या राजधानीत मैत्रीचा हात पुढे करत सौहार्द भावनेने दोन देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू पाहत होते, त्याच राजधानीत सीएए (नागरिकत्व सुधारणा कायदा) विरोधकांनी धुडगूस घालून कायदा-सुव्यवस्थेला वेठीस धरले, हे निंदनीय आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सहकुटुंब भारत दौर्‍यावर आलेले असताना सारा देश उत्साहाने त्यांच्या स्वागतासाठी सिद्ध होत होता. त्याचवेळी राजधानी दिल्लीच्या ईशान्य भागात दंगल आणि जाळपोळीने थैमान घातले. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आग्र्याच्या ताजमहालसमोर आपल्या पत्नी, मुलगी व जावयासमवेत सेल्फी घेण्याचा आनंद लुटत होते, तेव्हा दिल्लीलगतच्या जाफराबाद भागामध्ये तुफान दगडफेक आणि जाळपोळ होत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिल्लीतल्याच हैदराबाद हाऊस येथे द्विपक्षीय करारावर अंतिम चर्चा स्वाक्षर्या केल्या. तेव्हादेखील ईशान्य दिल्ली धुमसतच होती. गेली काही दिवस सीएएच्या विरोधकांनी दिल्लीकरांना अक्षरश: वेठीस धरले आहे. शाहीन बागेतील रस्त्यावर सुरू असलेले आंदोलन 70 दिवसांनंतर अजूनही सुरू आहे. काही दिवसांपूर्वी सीएएवरून अशीच जाळपोळ आणि दंगलीचे प्रकार दिल्लीत घडले होते. त्याला जेएनयू आणि जामिया-मिलिया येथे घडलेल्या विद्यार्थ्यांच्या हाणामारीची पार्श्वभूमी होती. सीएएच्या एका समर्थकाने भररस्त्यात पिस्तूल दाखवून हाहाकार उडवला होता. हे काय चालले आहे, असा उद्विग्न सवाल टीव्ही वाहिन्यांवरील चर्चापंडित तेव्हा वारंवार करीत होते. वृत्तपत्रांनीदेखील रकानेच्या रकाने भरून उजव्या विचारसरणीच्या समर्थक आंदोलकांवर भरपूर आगपाखड केली होती. सोमवारी ईशान्य दिल्लीत सीएएच्या एका विरोधकाने थेट पोलिसांवरच पिस्तूल रोखले. त्याला तत्काळ अटक झाली असली तरी या प्रकाराची फारशी वाच्यता माध्यमांनी केली नाही. पिस्तूल उगारणारा तरुण अन्य धर्मीय असल्याचे लक्षात येताच या संपूर्ण प्रकाराकडे दुर्लक्ष करणे माध्यमांनी सोयीचे मानले असावे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या दौर्‍याच्या तारखा लक्षात ठेवून दिल्लीच्या रस्त्यांवर हेतुपुरस्सर ही आंदोलने पेटवली जात आहेत का, असा संशय व्यक्त केला जात असून त्या दिशेने पोलीस तपास सुरू आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी सविस्तर चर्चा करून ईशान्य दिल्ली शांत करण्याच्या दृष्टीने काही पावले उचलल्याचे सांगण्यात येते. गृहमंत्र्यांशी झालेली चर्चा अतिशय सकारात्मक होती. दिल्लीतील शांततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले. केजरीवाल यांच्यासह काँग्रेस व अन्य पक्षांनीही सोमवारी घडलेल्या हिंसाचाराचा निषेध केला आहे. मुस्लिम नेते असदुद्दीन ओवेसी यांनीसुद्धा हिंसाचाराचा जाहीर निषेध केला हे बरेच झाले. गांधीजींचा भारत हिंसाचाराचा सरसकट धिक्कार करतो, हा संदेश तरी निदान ट्रम्प कुटुंबीयांमार्फत अमेरिकेपर्यंत पोहचेल. दिल्लीचा कोपरा जळत असताना अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचा दौरा निर्विघ्नपणे पार पडला याचे श्रेयदेखील दिल्ली पोलिसांना द्यावे लागेल. अर्थात परदेशी पाहुणे आलेले असताना त्यांच्या डोळ्यांदेखत अशा निरर्थक दंगली घडाव्यात ही दुर्दैवाची बाब आहे. मतांच्या धु्रवीकरणासाठी कुठल्याही थराला जाऊन राजकारण करणार्‍या पक्षांनी याचे भान ठेवण्याची गरज आहे. दिल्लीच्या दोन बाजूंची ही दोन दिवसांतील कहाणी सर्वांनाच अंतर्मुख करणारी ठरावी.

Check Also

अझिम प्रेमजींकडून 1125 कोटींचा निधी

मुंबई : प्रतिनिधीकोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी देशातीले उद्योगपती पुढे येत आहेत. टाटा, अंबानी …

Leave a Reply

Whatsapp