Tuesday , May 11 2021
Breaking News

विधिमंडळात आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून गट नोंदणीसाठी तारांकित प्रश्न

31 मार्चपर्यंत भूमी अभिलेखात नोंदी करू : ना. अब्दुल सत्तार

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्त
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील डिस्कळ येथील गटांच्या नोंदी 31 मार्चपर्यंत भूमी अभिलेखात करून देऊ, असे आश्वासन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहे. यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला होता.
डिस्कळ येथील गट क्र.1355च्या पुढील सर्व गटांच्या नोंदी भूमी अभिलेखात नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे जानेवारी 2020मध्ये निदर्शनास आले असून, उपअधीक्षक भूमी अभिलेख, खटाव, मु. वडूज व उपसंचालक, भूमी अभिलेख यांच्या कार्यालयात या गटांच्या नोंदी घेण्याबाबत आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधित नागरिकांनी मागणी केली आहे. वारंवार मागणी करूनही संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे मोठा कालावधी होऊनसुद्धा नोंदणी न झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून येथील गटांच्या नोंदी तातडीने करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली, असा तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी दाखल केला होता.  
या प्रश्नावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले की, मौजे डिस्कळ, ता. खटाव, जि. सातारा या गावी 16 मार्च 1972 रोजी जमीन एकत्रीकरण योजना मंजूर करण्यात येऊन मंजूर जमीन एकत्रीकरण योजनेचा अंमल घेण्यात आला. त्या वेळी मौजे डिस्कळ गावास एकूण 1 ते 3425 गट नंबर देण्यात आले होते. 15 मे 1976 रोजी मौजे डिस्कळ गावाचे वाडी विभाजन होऊन मौजे गारवाडी, मौजे अनपटवाडी व मौजे चिंचणी ही नवीन महसुली गावे मौजे डिस्कळ या मूळ गावातून वेगळी करण्यात आली. त्यानंतर 14 ऑक्टोबर 1985 रोजी मौजे डिस्कळ या गावातून मौजे काळेवाडी व मौजे पांढरवाडी ही दोन नवीन महसुली गावे वेगळी करण्यात आली. त्यामुळे ही वाडी विभाजनानंतर मूळ डिस्कळ या गावामध्ये आज रोजी आकारबंधानुसार 1355पर्यंत गट नंबर अस्तित्वात आहेत, तथापि गट नंबर 1355च्या पुढील गट नंबरांचा वाडी विभाजनापूर्वीचे गट नकाशात व आकारबंधास अंमल घेतला गेला नसल्यामुळे हे गट, वाडी विभाजनाच्या आकारबंधामध्ये घेण्यात आले नाहीत. यासंदर्भात कुंडलिक विठ्ठल काटकर या व्यक्तीचा अर्ज उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे प्रदेश, पुणे यांना प्राप्त झाला आहे. याबाबत कार्यवाही पूर्ण करून अहवाल सादर करण्याबाबत जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, सातारा यांना उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे प्रदेश, पुणे यांनी पत्रान्वये सूचना दिल्या आहेत, असे उत्तर ना. थोरात यांनी दिले होते, मात्र या प्रश्नाचे उत्तर मोघम असल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहात बोलताना 2017 साली हा आदेश देण्यात आला होता, तेव्हापासून यावर पुढील योग्य कार्यवाही झाली नाही, असे नमूद करून यासंदर्भात तातडीने पाऊल उचलून गटांच्या नोंदी कराव्यात, अशी आग्रही मागणी केली. यावर बोलताना महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित विभागाला आदेश देऊन 31 मार्चपर्यंत गटांच्या नोंदी करण्याचे आश्वासन दिले.

Check Also

स्कूलबस मालक आणि चालकांवर उपासमारीची वेळ; शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी

रोहे : प्रतिनिधी कोरोनामुळे गेली दोन वर्षे शाळा बंद असल्यामुळे रोह्यातील स्कूल बस मालक व …

Leave a Reply

Whatsapp