Friday , June 5 2020
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / कामोठे येथील होम क्वारंटाईन केलेल्या तिघांवर गुन्हा दाखल

कामोठे येथील होम क्वारंटाईन केलेल्या तिघांवर गुन्हा दाखल

बाहेर फिरताना आढळल्याने कारवाई

पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिका हद्दीतील कामोठे येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या घरातील ज्या सदस्यांना होम क्वारंटाईन केले होते ते शनिवारी (दि. 21) सकाळी महापालिका आयुक्त आणि पोलिसांनी संयुक्तरीत्या केलेल्या तपासणीवेळी बाहेर फिरताना आढळले. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना खारघर येथील ग्राम विकास भवनात 14 दिवसांसाठी पुन्हा पाठवण्यात आले आहे. त्यांच्या राहत्या घराचे स्टरीलायझेशन करण्यात येत असल्याची माहिती महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कामोठे येथे पनवेल तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला असून, या रुग्णाच्या घरातील तीन व्यक्तींना सध्या होम क्वारंटाईन करण्यात आले होते. पनवेल महापालिका हद्दीत होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्ती घराबाहेर फिरत असल्याच्या तक्रारी येत असल्याने शनिवारी सकाळी महापालिका आयुक्त आणि पोलिसांनी संयुक्तरीत्या अशा व्यक्तींच्या घरी जाऊन पाहणी केली असता कामोठे येथील कोरोनाबाधित व्यक्तीच्या घरातील सदस्य घरात नसल्याचे आढळून आले. याशिवाय ते आपल्या दुकानातही जाऊन आल्याचे समजले. त्यामुळे त्यांच्यावर शासनाच्या आदेशाप्रमाणे भा. दं. वि. 188 आणि 269 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता त्या सगळ्यांची रवानगी पुन्हा खारघर येथील ग्राम विकास भवनात करण्यात आली आहे.
पनवेल महापालिकेत आयुक्त गणेश देशमुख, उपविभागीय अधिकारी दत्तात्रेय नवले, तहसीलदार सानप, पोलीस उपायुक्त अशोक दुधे, सहाय्यक आयुक्त रवींद्र गिड्डे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत आपल्या विभागातर्फे यासाठी काय केले जाणार आहे याची माहिती दिली. महापालिका, जिल्हा आरोग्य खाते, महसूल आणि पोलीस हे यापुढे एकत्र काम करणार आहेत. त्यासाठी तहसील कार्यालयात कंट्रोल रूम तयार करण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यातील कोणत्याही संशयित रुग्णाची माहिती ताबडतोब उपलब्ध होईल, तर संयुक्त पथक होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्तीच्या घरी जाऊन अचानक तपासणी करून ते घरी नसल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागात तलाठी, ग्रामसेवक आणि सरपंच यांचे पथक गावात परदेशातून आलेल्या व्यक्तींची माहिती घेऊन ती कंट्रोल रूमला देणार आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचे कामही ते करणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी दिली.
लग्न, हळदीचे कार्यक्रम करू नयेत, क्रिकेट स्पर्धा किंवा राजकीय नेत्यांनी कोणतीही शिबिरे वा गर्दी जमणारे कार्यक्रम घेऊ नयेत; अन्यथा गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा उपायुक्त अशोक दुधे यांनी दिला. या वेळी त्यांनी इशारा दिला की, मेडिकल, दुग्धजन्य पदार्थ, किराणा, बेकरी, भाजीपाला, फळवाले, रेस्टारंट, गॅस, पेट्रोलपंप याव्यतिरिक्त कोणतीही दुकाने उघडी ठेवू नयेत. तळोजा औद्योगिक वसाहतीतील औषधे वा उपचारासाठी लागणारी उपकरणे उत्पादन करणार्‍यांव्यतिरिक्त कोणतीही कंपनी सुरू ठेवू नये. अशा कंपन्या सुरू असल्यास कारवाई केली जाईल. नाकाबंदी करण्यात येणार असून रस्त्यावर कोणी रेंगाळताना आढळल्यास प्रसंगी बळाचा वापर करून गुन्हा दाखल केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Check Also

वादळग्रस्त कोकणाला विशेष पॅकेज द्या!

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मागणी अलिबाग ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड तसेच रत्नागिरी जिल्ह्यात …

Leave a Reply

Whatsapp