Wednesday , April 1 2020
Home / महत्वाच्या बातम्या / विरोधी पक्षनेत्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

विरोधी पक्षनेत्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याची मागणी

मुंबई : प्रतिनिधी
कोरोनामुळे राज्यातील असंघटित क्षेत्रातील कामगारांसमोर तसेच रोजंदारीवर अवलंबून असलेल्या कामगारांच्या अडचणीच्या काळात सरकारने त्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे. यासाठी सूचविलेल्या उपाययोजनांची शासनाने त्वरित दखल घ्यायला हवी, अशा मागणीचे संयुक्त पत्र विधानसभा आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.
कोरोना प्रतिबंधासाठी राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांचे स्वागत, पण काही बाबतीत आणखी तपशिलात जाऊन उपाययोजना करण्याची गरज आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवायचा असेल, तर बाजार समित्यांमध्ये आरोग्य सुविधा पुरविण्याची नितांत गरज आहे. माथाडी कामगारांकडे ओळखपत्र आहेत, पण व्यापारी, वाहतूकदार आणि खरेदीदार बाजार समित्यांमध्ये येऊ शकतील, हे सुनिश्चित करावे लागेल. त्यासाठी त्यांना बाजार समितींच्या माध्यमातून ओळखपत्र द्यावे लागेल. बाजार समित्यांमध्ये थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर, स्वच्छता यांची व्यवस्था केली तरच त्यांना हिंमत येईल, असा सल्ला पत्रातून देण्यात आला आहे.
वाहनचालक-वाहक यांना ओळखपत्र देतानाच त्या भागातील पोलिसांनासुद्धा तशा सूचना द्याव्या लागतील. सद्या बाजार समित्यांकडे येणारी वाहने अडवली जात आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसारख्या महानगरांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे, असे पत्रात नमूद केले गेले आहे.
संकटकाळी एकी महत्त्वाची!
आज संपूर्ण देश कोरोना संकटाशी दोन हात करीत आहे. या परिस्थितीत आपण सर्व जण एकजुटीने उभे आहोत. राज्यातील जनताही आपल्या परीने या परिस्थितीचा भक्कमपणे मुकाबला करीत आहे. आज अनेक शहरे आपल्याला स्थितीचा मुकाबला करण्यासाठी बंद करावी लागत आहे. परिणामी अनेक समस्या उद्भवत आहेत. कोरोनाशी युद्ध करताना आपल्याला या समस्यांकडेही लक्ष द्यावे लागणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Check Also

कानसा वारणा फाऊंडेशनचे मोलाचे कार्य

मोहोपाडा : प्रतिनिधी कानसा वारना फाऊंडेशनच्या वतीने राज्यभर वृक्ष लागवड, कला, क्रीडा, सांस्कृतिक आदीं विविध …

Leave a Reply

Whatsapp