Saturday , November 28 2020
Home / महत्वाच्या बातम्या / मैदानातील बाजारात पोलिसांचा खडा पहारा

मैदानातील बाजारात पोलिसांचा खडा पहारा

काळाबाजार रोखण्यासाठी दक्षता

कर्जत ः बातमीदार – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेरळ बाजारपेठ बंद करून पोलिसांनी नेरळ ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात बाजार सुरू केला आहे. तेथे सोशल डिस्टन्स ठेवून भरवण्यात येत असलेल्या भाजीपाला, फळे, दूध, कांदा-बटाटा बाजारात कोणीही जादा दर आकारून लूटमार करू नये यासाठी पोलीस तैनात आहेत. दरम्यान, नेरळमध्ये आता मटण आणि चिकनचे दरही स्थिर ठेवण्यात आले असून चढ्या भावाने मटणविक्री करणार्‍या व्यापार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची सूचना पोलीस दलाकडून देण्यात आली आहे.

नेरळमध्ये भाजीपाला, फळे आणि दूध यांचा बाजार बंद करण्यात आला आहे. त्यानंतर चढ्या भावाने वस्तूंची विक्री सुरू झाली होती आणि त्यानंतर सुरू झालेली लूट लक्षात घेऊन नेरळ पोलिसांकडून ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात बाजार भरवला जात आहे. तेथे चौकोन आखून दिले असून त्यात भाजीपाला, दूध, फळांचे दुकानदार बसत आहेत, तर खरेदीसाठी येणारे हे आखून दिलेल्या चौकोनात उभे राहून माल खरेदी करीत आहेत, मात्र त्याही स्थितीत व्यापारी जादा दर आकारून वस्तूंची विक्री करीत असल्याच्या तक्रारी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अविनाश पाटील यांनी दिवसातून दोन वेळा बाजारात पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. त्यामुळे नेरळकरांना नेहमीच्या बाजारभावाने भाजीपाला मिळत आहे. याबद्दल नेरळ ग्रामपंचायत आणि पोलिसांनी केलेल्या नियोजनाचे कौतुक होत आहे.

नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणताही व्यापारी मटण-चिकनची विक्री शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक दराने करीत असेल तर तत्काळ पोलीस ठाण्यात माहिती द्यावी. त्याचवेळी त्या ठिकाणी आपल्या मोबाइलमध्ये व्हिडीओदेखील बनवावा, जेणेकरून पोलिसांना कारवाई करणे अधिक सोपे जाईल.

-अविनाश पाटील,  सहाय्यक पोलीस निरीक्षक

Check Also

गतिमान वाटचाल कोकणाची

कोकण महसूल विभागात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्याचे स्वतंत्र …

Leave a Reply

Whatsapp