Saturday , June 6 2020

समतोल धोरण बनवा!

लॉकडाऊनसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मुख्यमंत्र्यांना निर्देश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कोरोना दीर्घकाळासाठी आपल्यात राहणार आहे. त्यामुळे लॉकडाऊन कुठे कडक आणि कुठे शिथिल करायचे ते राज्यांनी विचार करून ठरवायचे आहे. लॉकडाऊनही राहील आणि जीवनही सुरळीत सुरू असेल अशा प्रकारचे समतोल ठेवणारे धोरण बनवा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि. 27) विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सूचित केले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत जाहीर करण्यात आलेला लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे, मात्र लॉकडाऊनचा दुसरा टप्पा संपत आला असला तरी परिस्थिती अद्यापही नियंत्रणात नसल्याने लॉकडाऊनसंबधी केंद्र सरकार नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत भाष्य केले. लॉकडाऊनबाबत एक धोरण निश्चित करावे लागेल असे सांगून, हॉटस्पॉट असलेल्या भागांमध्ये मात्र लॉकडाऊन कायम ठेवण्याचा विचार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
देशात लॉकडाऊन लागू केल्यामुळे कोरोना संकटाचा परिणाम जेवढा बाहेरील देशांवर झाला तेवढा भारतावर झाला नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले, मात्र असे असले तरी 3 मेनंतर सतर्कतेच्या दृष्टीने प्रभावी धोरण आखण्याची आवश्यकता आहे. लोकांचे रोजचे जगणे सोपे व्हावे आणि साथीच्या आजाराला नियंत्रणात ठेवणेही शक्य व्हावे असे हे धोरण असेल. कोरोनाविरोधातील ही एक दीर्घकालीन लढाई असून, आपल्याला मोठ्या धैर्याने याचा सामना कराला लागेल,
असेही पंतप्रधान म्हणाले.
येणार्‍या दिवसांत ग्रीन झोन मॉडेल्स बनवा. जीवन पद्धती, आपले कामकाज त्यानुरूप बनवण्याची गरज आहे. असे झोन्स फुल प्रुफ करा. ज्या राज्यांत कोरोनाचा आकडा वाढतोय म्हणजे काही ती राज्ये गुन्हेगार आहेत असे नाही. आकड्यांचा दबाव घेऊ नका. भयभीत होऊ नका. अशा राज्यांनी खाली मान घालण्याची गरज नाही, तर ज्या राज्यांमध्ये आकडे कमी आहेत म्हणजे काही ती महान आहेत असा अर्थ होत नाही. आपण सगळे एकाच संकटातून जात आहोत. काहीही लपवू नका, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले.
लॉकडाऊन वाढवायचा की नाही यावर आज निर्णय झाला नाही, मात्र 3 मेनंतर सूट द्यावी अशी स्थिती देशात नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मुख्यमंत्र्यांनी बैठकीत म्हटले. परिस्थिती सामान्य होण्याच्या दृष्टीने हॉटस्पॉट, रेड झोनवर विशेष लक्ष केंद्रित करून त्या दिशेने काम करण्याची आवश्यकता असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. 3 मेनंतरही रेड झोनमध्ये लॉकडाऊन सुरू राहण्याची शक्यता आहे. यलो झोनमध्ये काही सूट मिळू शकते, तर ग्रीन झोनमधील बंदी हटवली जाऊ शकते. तरीही नियमांचे पालन करावे लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
संकटाला संधीत बदला
रेड झोनमधून ऑरेंज आणि ऑरेंजमधून ग्रीन झोनमध्ये कसे जायचे याचा नियोजन आवश्यक आहे. हीच सुसंधी आहे सुधारणा घडविण्याची. अनेक जुने आणि किचकट नियम आणि प्रक्रिया बदलण्याची संधी सोडू नका. आपद्धर्माचे पालन करा. नीती आणि नियम जुने असतील तर आलेली संधी जाईल. प्रत्येक राज्याने रिफॉर्म्सवर लक्ष द्या. संकटाला संधीत बदला. तंत्रज्ञानाचा खूप उपयोग होऊ शकतो. गर्दी आणि गडबड टाळू शकता, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करताना सांगितले.

Check Also

जागरूक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जनहित याचिकेला नागरिकांचा पाठिंबा

पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना वैश्विक महामारीच्या अनुषंगाने पनवेल व आजूबाजूच्या परिसरातून मुंबई, नवी मुंबई येथे …

Leave a Reply

Whatsapp