Saturday , June 6 2020
Home / महत्वाच्या बातम्या / बहुआयामी व्यक्तिमत्त्व रत्नाकर मतकरी यांचे कोरोनामुळे निधन

बहुआयामी व्यक्तिमत्त्व रत्नाकर मतकरी यांचे कोरोनामुळे निधन

मुंबई ः प्रतिनिधी
ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचे रविवारी रात्री निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने साहित्यविश्वावर शोककळा पसरली आहे. मतकरी यांना गेले काही दिवस थकवा जाणवत असल्याने मुंबईतील गोदरेज रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले होते. तेथे त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर त्यांना सेव्हेन हिल्स
रुग्णालयात हलविण्यात आले. त्या ठिकाणी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
रत्नाकर मतकरी यांनी 1955मध्ये ‘वेडी माणसं’ या एकांकिकेपासून लेखनाचा श्रीगणेशा केला. त्या वेळी ते अवघे 16 वर्षांचे होते. ती एकांकिका मुंबई आकाशवाणीवरून ध्वनिक्षेपित झाली होती. ‘लोककथा 78’, ‘दुभंग’, ‘अश्वमेध’, ‘माझं काय चुकलं?’, ‘जावई माझा भला’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘घर तिघांचं हवं’, ‘खोल खोल पाणी’, ‘इंदिरा’ आदी मतकरी यांची नाटके प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. त्याचप्रमाणे ‘अलबत्या गलबत्या’ आणि ‘निम्मा, शिम्मा राक्षस’ या लहान मुलांच्या तसेच ‘आरण्यक’ या नाटकांनी रंगभूमीवर आपली छाप सोडली. गूढकथा हा कथाप्रकारही त्यांनी वाचकांपर्यंत पोहोचवला. त्यांनी मोठ्यांसाठी 70, तर लहान मुलांसाठी 22 नाटकांचे लेखन केले आहे. ‘गहीरे पाणी’, ‘अश्वमेध’, ‘बेरीज वजाबाकी’ या मालिकाही प्रेक्षकांना भावल्या. त्यांच्या ‘इन्वेस्टमेन्ट’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
रत्नाकर मतकरींच्या पश्चात निर्मिती आणि अभिनयाच्या क्षेत्रात काम करणार्‍या त्यांच्या पत्नी प्रतिभा मतकरी, कन्या अभिनेत्री सुप्रिया विनोद, पुत्र लेखक, समीक्षक गणेश मतकरी, जावई डॉ. मिलिंद विनोद, स्नुशा आर्किटेक्ट पल्लवी मतकरी आणि नातवंडे असा परिवार आहे.

Check Also

जागरूक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जनहित याचिकेला नागरिकांचा पाठिंबा

पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना वैश्विक महामारीच्या अनुषंगाने पनवेल व आजूबाजूच्या परिसरातून मुंबई, नवी मुंबई येथे …

Leave a Reply

Whatsapp