Saturday , June 6 2020
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, सुविधा देण्याचे काम संघटितपणे करू !

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, सुविधा देण्याचे काम संघटितपणे करू !

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे प्रतिपादन

पनवेल ः प्रतिनिधी
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिक्षण क्षेत्रावरही मोठे संकट आले आहे, पण या संकटाला न घाबरता विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि त्या अनुषंगाने सुविधा देण्याचे काम संघटितपणे आपण करीत राहू या, असे प्रतिपादन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 21) येथे केले.
नॅक मान्यता प्रक्रियेसंदर्भात तयारी करीत असलेल्या सर्व शासकीय, अशासकीय, अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालयांतील प्राचार्यांसाठी तसेच आयक्यूएसी समन्वयकांची चांगू काना ठाकूर (स्वायत्त) महाविद्यालय, रुसा महाराष्ट्र, उच्च शिक्षण कोकण विभाग विभागीय सहसंचालक यांच्या संयुक्त विद्यमाने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ऑनलाइन एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे प्रमुख मान्यवर म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर बोलत होते.
या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून उच्च शिक्षण कोकण विभाग विभागीय सहसंचालक डॉ. संजय जगताप, रुसाचे महाराष्ट्र प्रमुख सल्लागार डॉ. विजय जोशी, वरिष्ठ सल्लागार डॉ. पी. एन. पाब्रेकर, रुसाचे सहसंचालक प्रमोद पाटील, आयक्यूएसी क्लस्टर इंडियाचे भालचंद्र भोळे, एसआरटीएम विद्यापीठाच्या प्रोफेसर डॉ. वाणी लातूरकर आदी शिक्षणतज्ज्ञ तसेच रायगड जिल्ह्यातील जवळपास 70 महाविद्यालयांचे प्राचार्य तसेच प्रतिनिधी सहभागी झाले होते. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या शिक्षणतज्ज्ञांनी नॅकसंदर्भात महाविद्यालयांच्या प्राचार्यांना सखोल मार्गदर्शन केले. कार्यशाळेची सुरुवात राष्ट्रगीताने झाल्यानंतर चांगू काना ठाकूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बर्‍हाटे यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर सीकेटी महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या ज्ञानदानाचे आणि त्यांना पुरविल्या जाणार्‍या सुविधांची माहिती दिली.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या वेळी सर्व शिक्षणतज्ज्ञ आणि प्राचार्यांशी संवाद साधताना सांगितले की, सध्याच्या परिस्थितीत कोरोना संकटामुळे शिक्षण देणारा आणि घेणारा या दोघांची खूप मोठी अडचण झाली आहे. कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रातही यापुढे आर्थिक अडचणी येतील, पण एकत्रितपणे तळमळीने काम केले तर हे संकट दूर करण्यास मदत होईल, मात्र परिस्थिती कशीही असो शिक्षणाकडे कदापि दुर्लक्ष होता कामा नाही ही आपली तळमळ आहे. त्यासाठी नेहमीप्रमाणे विद्यार्थी, पालक, शिक्षक, हितचिंतकांचे सहकार्य मोलाचे ठरत असून सर्वांची एकत्रित मेहनत महत्त्वाची आहे, असेही माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या वेळी नमूद केले. पुढे बोलताना त्यांनी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या पनवेल येथील चांगू काना ठाकूर (स्वायत्त) महाविद्यालयास देशात 69वा, तर राज्यात 21वा क्रमांक मिळाल्याचे सांगतानाच कार्यशाळेत सहभागी झालेल्यांचे अभिनंदन केले.
या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले की, सीकेटी महाविद्यालयाने पहिल्या वेळेस 2008 आणि दुसर्‍या वेळी 2011ला ए ( A ), तर तिसर्‍या वेळी 2017 साली ए प्लस ( A +) दर्जा मिळविला आहे. सीकेटी महाविद्यालयाने केलेल्या प्रगतीत विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञांचे मोलाचे सहकार्य असल्याचे सांगत त्याप्रति आभारही व्यक्त केले. नॅक मूल्यांकनासंदर्भात बोलताना त्यांनी उच्च व दर्जेदार शिक्षणाच्या दृष्टिकोनातून नॅक अत्यंत महत्त्वाचे असल्याचा आवर्जून उल्लेख केला. नॅकला प्रथम सामोरे जाणारे आणि अपग्रेडेशनला सामोरे जाणार्‍या महाविद्यालयांनी सर्व नियमावलीच्या अनुषंगाने तयारी करून नॅक मानांकनात चांगले यश मिळवावे, अशा शुभेच्छाही त्यांनी सर्व महाविद्यालयांना दिल्या.
या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचे सूत्रसंचालन सीकेटी महाविद्यालयाचे नॅक व रुसाचे जिल्हा समन्वयक प्राध्यापक शैलेश वाजेकर यांनी केले. महात्मा फुले पनवेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर आणि जेएसएम अलिबाग महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल पाटील यांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. बी. डी. आघाव यांनी या कार्यशाळेचा सारांश मांडला, तर आभार प्रदर्शन सीकेटी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांनी केले.

Check Also

जागरूक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जनहित याचिकेला नागरिकांचा पाठिंबा

पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना वैश्विक महामारीच्या अनुषंगाने पनवेल व आजूबाजूच्या परिसरातून मुंबई, नवी मुंबई येथे …

Leave a Reply

Whatsapp