Saturday , June 6 2020
Home / महत्वाच्या बातम्या / जीवन गाणे… नव्या चालीत

जीवन गाणे… नव्या चालीत

कोरोना विषाणूने आपल्या भयावह अस्तित्वाची जाणीव मानवजमातीला करून दिली त्याला आता जवळपास सहा महिने होत आले आहेत. युरोप-अमेरिकेत हजारोंचे बळी घेणार्‍या कोरोनाला आतापावेतो विकसनशील भारताने तुलनेने बरा अटकाव केला आहे. आता एकीकडे कोविड-19ची साथ रोखून धरतानाच जगणे पूर्ववत करण्याचे आपले प्रयत्न सुरू झाले आहेत.

जोवर कोरोना विषाणूवरची लस वा त्याच्या प्रभावाला निष्प्रभ करणारे एखादे परिणामकारक औषध मानवाच्या हातात येत नाही तोवर कोरोनाचे अस्तित्व स्वीकारून त्याच्यासोबत जगायला शिकणे आपल्याला भाग आहे. जगभरातील जवळपास सगळ्या देशांमध्ये एव्हाना हाच सूर लागू लागला आहे. साधारण डिसेंबरच्या सुमारास चीनमध्ये कोरोनाची भीषणता जाणवू लागली. चीनच्या आसपासच्या देशांमध्ये त्याचा फैलाव आधी झाला आणि मग अल्प काळातच थेट युरोप-अमेरिकेमध्ये त्याचे थैमान सुरू झाले. तुलनेने युरोप-अमेरिकेमध्ये कोरोनाचा फैलाव अधिक वेगाने व भयावहरित्या झाला. तरीही लाखोंना झालेली लागण आणि हजारोंचे बळी हा विदारक अनुभव मागे टाकून युरोप-अमेरिकेत आता जनजीवन पूर्ववत करण्याचे प्रयत्न जोमाने सुरू झाले आहेत. जवळपास दोनएक महिन्यांचा लॉकडाऊनचा काळ अनेक देशांनी अनुभवला आहे. आधीच आर्थिक मंदीच्या सावटाखाली असलेल्या जगाला कोरोनाच्या आर्थिक परिणामांची चिंता त्यामुळेच अधिक भेडसावते आहे आणि त्या चिंतेपोटीच जवळपास प्रत्येक देश कोरोनाला स्वीकारून जगायला शिका असे आपापल्या नागरिकांना बजावतो आहे. आपल्याकडेही काही मान्यवर उद्योजक, राजकीय नेते, अर्थतज्ज्ञ हाच सूर आळवत आहेत. कोरोना विषाणू आणि त्यातून उद्भवणारा कोविड-19चा आजार हा काही लगेचच भूतलावरुन नाहिसा होणारा नाही. त्यामुळेच त्याच्याबद्दल आवश्यक ती सावधानता बाळगून, जनतेमध्ये त्याविषयी पुरेशी जागरुकता निर्माण करून, आपण देशातील जनजीवनाची विस्कटलेली घडी पूर्ववत करण्याकडे वळले पाहिजे हेच धोरण केंद्र सरकारने स्वीकारले आहे. त्यामुळेच चौथा लॉकडाऊन हा आधीच्या लॉकडाऊनपेक्षा वेगळा असेल, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक वर्गातील नागरिकांच्या जगण्याला हात देणारे अभूतपूर्व आर्थिक पॅकेज जाहीर केले. चौथ्या लॉकडाऊनचा हा पहिला आठवडा असून जवळपास रोजच जनजीवन पूर्ववत करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून काही ना काही नवी घोषणा केली जाते आहे. पुढील आठवड्यापासून प्रवाशांसाठी विमान आणि रेल्वे सेवा उपलब्ध करून देणे हा त्याच प्रयत्नांचा भाग आहे. विमानप्रवास करून येणार्‍या प्रवाशांना 14 दिवसांचे विलगीकरण पाळावे लागणार नाही, अशी घोषणाही शुक्रवारी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी केली. तसे करणे व्यवहार्य ठरणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे. कोरोना टेस्टमध्ये पॉझिटिव्ह ठरणार्‍या प्रवाशांना विमानप्रवास तर दूरच, विमानतळावर फिरकूही दिले जाणार नाही. दोन महिने बंद राहिल्यानंतर देशांतर्गत विमानसेवा सुरू करताना सरकारला खबरदारी घेतानाच संबंधित नियम व्यवहार्य आहेत वा नाही हेही पहावे लागणारच आहे. लॉकडाऊनमुळे तब्बल 37 ते 78 हजार लोकांचे प्राण वाचले आहेत तर 14 ते 29 लाख लोकांना कोरोनाची लागण होण्यापासून वाचवले गेले आहे, असे आता अनेक शास्त्रीय अहवालांतून समोर आले आहे. लॉकडाऊनमुळे आपल्याला वैद्यकीय सुविधा अधिक सज्ज करण्यासाठी बहुमोल वेळ मिळाला आहे. आता मात्र सावधपणे जगण्याचे गाणे नव्या चालीत गाण्याकडे वळावेच लागणार आहे.

Check Also

जागरूक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जनहित याचिकेला नागरिकांचा पाठिंबा

पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना वैश्विक महामारीच्या अनुषंगाने पनवेल व आजूबाजूच्या परिसरातून मुंबई, नवी मुंबई येथे …

Leave a Reply

Whatsapp