Saturday , June 6 2020
Home / महत्वाच्या बातम्या / कोरोना नियंत्रणात सपशेल अपयशी ठरलेल्या ठाकरे सरकारचा तीव्र निषेध

कोरोना नियंत्रणात सपशेल अपयशी ठरलेल्या ठाकरे सरकारचा तीव्र निषेध

जनता व्हेंटिलेटवर, तर मुख्यमंत्री होम क्वारंटाइन : आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त
उद्धव ठाकरे यांचे कुचकामी नेतृत्व आणि महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजी कारभारामुळे राज्यातील जनता व्हेंटिलेटवर, तर स्वत: मुख्यमंत्री होम क्वारंटाइन झाले आहेत, अशी जोरदार टीका भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 22) येथे केली.  
कोरोना विषाणू प्रादुर्भाव नियंत्रणामध्ये सपशेल अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारला जाब विचारण्यासाठी उत्तर रायगड भाजप आणि पनवेल तालुका व शहर भाजपच्या वतीने शहरातील मध्यवर्ती पक्ष कार्यालय येथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून ’महाराष्ट्र बचाव’ आंदोलन करण्यात आले. त्या वेळी आमदार प्रशांत ठाकूर बोलत होते.
या आंदोलनात महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजपचे तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर मंडल अध्यक्ष जयंत पगडे, महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, युवा नेते दशरथ म्हात्रे, शहर सरचिटणीस अमरिश मोकल, युवा मोर्चाचे उत्तर जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर आदी नेते, पदाधिकारीही सहभागी झाले होते.  
‘महाराष्ट्र वाचवा, महाराष्ट्र वाचवा’, ‘कोरोना रोखण्यात निष्फळ ठरलेल्या उद्धव ठाकरे सरकारचा धिक्कार असो‘, ‘महाविकास आघाडी सरकार हाय हाय’, ‘महाविकास आघाडी सरकार जागे व्हा’, ‘भोंगळ कारभार बंद करा’ अशा घोषणा या वेळी देऊन गोरगरीब जनतेला पॅकेज द्यावे, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली.
कोविड योद्ध्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याऐवजी राज्य सरकार कोविड योद्धे आणि त्यांच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आमदार प्रशांत ठाकूर यांनी केला. लॉकडॉऊनमध्ये राज्यात पोलिसांवर जीवघेणे हल्ले होत आहेत. पोलीस, डॉक्टर, नर्स आदी कोविड योद्धे जीवानिशी जात आहेत, मात्र ठाकरे सरकार अद्यापही निद्रीस्त आहे. सरकार म्हणून काम करण्याची गरज असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरात बसून आदेश देत आहेत. तेच मुख्यमंत्री विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज कुटुंबासह गर्दीने कसे दाखल करतात, असा सवालही आमदार ठाकूर यांनी उपस्थित करीत महाविकास आघाडी सरकारचा निषेध व्यक्त केला.
आमदार प्रशांत ठाकूर पुढे म्हणाले की, अगोदरच ताळमेळ नसलेल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रिय कारभारामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय आणि शासकीय यंत्रणेतही कुठलाच ताळमेळ दिसत नाही. एक मंत्री निर्णय घेतो, तर दुसरा असे काही नाही म्हणून सांगतो. त्याचबरोबर अधिकारी परस्पर निर्णय घेतात आणि बदलतात. यावर सरकारचा अंकुश नाही. राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 41 हजारांच्या वर गेलेली आहे. 1500हून अधिक लोक मृत्युमुखी पडले. मे महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रातील रुग्णांचा आकडा 60 हजारांवर जाण्याची शक्यता आहे. तरीही ठाकरे सरकारला याचे गांभीर्य दिसत नाही.
मुंबईत रुग्णालयांमध्ये बेड, रुग्णवाहिका उपलब्ध नाहीत, दोन-दोन दिवस रुग्ण उपचारासाठी तडफडत आहेत. हा गलथान कारभार ठाकरे सरकार मुकाटपणे बघत आहे. देशातील अनेक राज्ये हळूहळू पूर्वपदावर येत असताना महाराष्ट्रावर मात्र कोरोनाचे संकट वाढत आहे. लॉकडाऊन फक्त नावाला दिसत आहे. देशात कोरोनाच्या एकूण संख्येपैकी 30 टक्के रुग्ण महाराष्ट्रातील आहेत, तर 24 टक्के रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत. तरीही ठाकरे सरकार हातावर हात धरून बसलेले आहे, याबद्दल आमदार ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केली.
पनवेलमधील 80 टक्के रुग्ण मुंबईमध्ये सेवा देणारे आहेत. हे सेवाकर्मी व त्यांच्या कुटुंबाचे रक्षण व्हावे म्हणून पनवेलमधून मुंबईत सेवा देणार्‍यांची व्यवस्था मुंबईमध्येच करावी, अशी मागणी आम्ही केली. त्या अनुषंगाने मुंबई महापालिकेने आदेशही दिले, मात्र राज्य सरकारच्या भोंगळ कारभारामुळे त्याची अंमलबजावणी झाली नाही, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त गणेश देशमुख यांची तडकाफडकी बदली करून पनवेलकरांवर अन्याय केला असल्याची भावनाही या वेळी व्यक्त केली.
केंद्र सरकारने देशातील विविध क्षेत्रांसाठी व घटकांसाठी 20 लाख कोटी रुपयांचे मोठे पॅकेज जाहीर केले. महाराष्ट्र सरकारने मात्र एक दमडीसुद्धा सर्वसामान्यांच्या हितासाठी जाहीर केली नाही, असा घणाघाती हल्ला आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य सरकारवर चढवला. पुरोगामी महाराष्ट्राने देशाला आणि जगाला आदर्श दिला, मात्र दिशाहीन महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्राला संकटातच अडकून ठेवू पाहात आहे, अशी खरमरीत टीका करून राज्य सरकारने आता तरी जागे व्हावे, असेही त्यांनी सखेद सूचित केले.

Check Also

जागरूक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जनहित याचिकेला नागरिकांचा पाठिंबा

पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना वैश्विक महामारीच्या अनुषंगाने पनवेल व आजूबाजूच्या परिसरातून मुंबई, नवी मुंबई येथे …

Leave a Reply

Whatsapp