Saturday , June 6 2020
Home / महत्वाच्या बातम्या / कोरोनाचे रायगडात वाढते रुग्ण

कोरोनाचे रायगडात वाढते रुग्ण

पोलादपूरात तीन जण पॉझिटिव्ह

पोलादपूर : प्रतिनिधी – पहिल्या लॉकडाऊनवेळी पोलादपूर शहरांमध्ये तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून त्यापैकी एक महिला मृत झाली होती. तिसर्‍या लॉकडाऊन अखेरीस पोलादपूर तालुक्यात आलेले कापडे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील निवाची वाडी येथील दोन रुग्ण आणि उमरठ फौजदारवाडी येथील एक रुग्ण, असे तिघेजण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गुलाबराव सोनावणे यांनी दिली.

1 मे 2020 पासून पोलादपूर तालुक्यात सुमारे पाच हजारांहून अधिक चाकरमानी व त्यांच्या कुटुंबियांना होम क्वारंटाइन करण्यात आले होते. 15 मेनंतर पोलादपूर तालुक्यात आलेले कापडे बुद्रुक ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील निवाची वाडी येथील दोघेजण गेल्या तीन दिवसांपासून माणगाव उपजिल्हा रुग्णालय येथे खोकला सर्दी आजारामुळे उपचारासाठी पाठवण्यात आले असता त्यांची कोविड 19 टेस्ट करण्यासाठी स्वाब घेऊन एमजीएम येथे पाठविण्यात आले होते. त्याचप्रमाणे उमरठ ग्रामपंचायत हद्दीतील फौजदार वाडी येथे गेल्या 10 दिवसापूर्वी आलेल्या एका व्यक्तिला श्वास घेण्यास अडथळा होत असल्याने त्यालाही माणगाव येथे पाठवण्यात आले होते. त्याचे स्वॅब घेऊन कोविड 19 टेस्ट करण्यासाठी पाठविण्यात आले होते.

गेले तीन दिवस पोलादपूर तालुक्यातील महसूल, आरोग्य, पोलीस आणि पंचायत समिती प्रशासनाला या तीनही रुग्णांच्या कोविड 19 टेस्ट रिपोर्टसची प्रतिक्षा होती. मात्र तिघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाने त्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य लोकांची यादी बनवली कापडे बुद्रुक निवाचीवाडी येथे सील करुन प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्याचे प्रस्ताव रायगड जिल्हाधिकारी कार्यालयास महाड उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार यांच्यामार्फत पाठविण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

कर्जत तालुक्यात आढळला सातवा रुग्ण

कर्जत : प्रतिनिधी – कर्जत तालुक्यातून मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलात सेवा बजावणार्‍या 34 वर्षीय युवकाला कोरोना झाला. 16 मे पासून हा तरुण मुंबईतच राहून असून त्याच्या सहकार्‍यांची टेस्ट सुद्धा करण्यात आली आहे. दरम्यान, कर्जत तालुक्यातील हा सातवा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असून आरोग्य विभागाने त्या तरुणाच्या संपर्कात आलेल्या 38 जणांना क्वारंटाइन केले आहे.

नेरळ-कळंब रस्त्यावरील कोल्हारे ग्रामपंचायत मधील साईमंदिर नाका येथे राहणारा तरुण लॉकडाऊन सुरू होण्याआधी साईमंदिर नाक्यावरील इमारतीमधील घराला टाळे लावून आपल्या गावी गेला होता. पत्नी आणि मुलासह राहणारा हा 34 वर्षीय तरुण ओलमण गावाच्या खाली असलेल्या पाड्यावर आपल्या घरी राहून मुंबई येथे अग्निशमन दलाची नोकरी करीत होता. हा आदिवासी तरुण ओलमण पाडा येथून दुचाकी वरून बदलापूर येथे जायचा आणि नंतर तेथून बस पकडून मुंबई येथे जायचा. मुंबई महापालिका अग्निशमन दलात त्या तरुणाचे दोन सहकारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने ओलमण पाडा येथील तरुणाची टेस्ट घेण्यात आली. त्या टेस्टचे अहवाल शनिवारी प्राप्त झाले असून त्यात तो पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.

त्यातील दोन मयत झाले असून तीन कोरोनावर मात करून बरे झाले आहेत, तर एक पनवेल येथे उपचार घेत आहे. मात्र कोरोनाचे कर्जत तालुक्यात सात रुग्ण आढळून आल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहेत.

मुरूडमध्ये दोन दिवसांत तीन नवे बाधित

मुरुड : प्रतिनिधी – मुरूडमध्येदोन दिवसात तीन रुग्ण मिळाल्याने या ठिकाणी भविष्यात रुग्णांची वृद्धी झाल्यास मोठा पेच निर्माण होणार आहे सावली ग्रामपंचायत हद्दीमधील मिठागर येथील रुग्ण आढळून आल्यानंतर काही तासातच दोन रुग्ण आढळून आले आहेत.

एकदरा ग्रामपंचायत हद्दीत महिला तर दुसरा कोरोना रूग्ण वावडुगी ग्रामपंचायत हद्दीतील म्हालोर गावातील एका व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह मिळाल्याने काही अंतरावर असणार्‍या मुरूड शहरही धोक्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे आहे की, मुरूड तालुक्यतील वावडुंगी ग्रामपंचायत हद्दीतील महालोर येथील वीस वर्षीय व्यक्ती ही मुंबई अंधेरी येथून 12 मे रोजी आली होती. त्याला ताप आणि इतर आजार असल्याने त्यास पाच ते सहा दिवस मुरूड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याचा ताप कमी झाला होता. त्याची सुद्धा स्वॅब चाचणी घेण्यात आली होती. त्याची चाचणी अहवाल सुद्धा कोरोना बाधित असल्याचे आले आहे.

मुरूड शहरापासून हाकेच्या अंतरावर असणार्‍या एकदरा ग्राम पंचायत हद्दीतील एक महिला ही मुंबई परेळ येथून 18मे2020 रोजी आली होती. तिचीही स्वॅब चाचणी घेण्यात आली होती. त्या चाचणीचा परीक्षण अहवाल सुद्धा कोरोना बाधित असल्याचे आले आहे. या दोन्ही कोरोना बाधित नागरिकांना अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पंचायत समिती मुरूड गटविकासाधिकारी संजय चव्हाण यांनी दिली.

उरण येथे आणखी एक कोरोनाग्रस्त

उरण : उरण तालुक्यात कोरोनाचा एक नवीन रुग्ण (बोरी, उरण) आढळला आहे. त्यामुळे उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 137 झाली. त्यातील 87 रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 50 रुग्ण उपचार घेत आहेत.

एकट्या करंजातील कोरोना रुग्णांची संख्या 121 झाली आहे. त्यातील 79 बरे झाले आहेत. त्यांना घरी सोडण्यात आला आहे. त्यामुळे करंजाचे 42 रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान शनिवार (दि. 23) एक कोरोना पॉझिटिव्ह मिळाल्याने त्याला उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे उपचार सुरु आहेत.

Check Also

जागरूक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जनहित याचिकेला नागरिकांचा पाठिंबा

पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना वैश्विक महामारीच्या अनुषंगाने पनवेल व आजूबाजूच्या परिसरातून मुंबई, नवी मुंबई येथे …

Leave a Reply

Whatsapp