Breaking News

वादळी पावसामुळे नागरिक भयभीत; शेकडो रहिवासी स्थलांतरित

मुरूड ः प्रतिनिधी

मुरूडमध्ये बुधवारी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली व सकाळी 11 वाजेपासून जोरदार वारेही वाहू लागले. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे तहसीलदारांनी जनता कर्फ्यू जाहीर केला होता. त्यातच जोरदार पावसामुळे नागरिक रस्त्यावर बाहेर पडले नाहीत.

रिमझिम बरसणारा पाऊस व त्यातच जोरदार वारे यामुळे नागरिक भयभीत झाले होते. असंख्य लोक वार्‍याचा वेग कमी व्हावा म्हणून देवाजवळ प्रार्थना करू लागले. असा वेग आजपर्यंत अनेकांनी पाहिला नव्हता. बुधवारी सकाळपासूनच वादळाच्या पार्श्वभूमीवर वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता.

हळूहळू वार्‍याचा व पावसाचा वेग वाढल्याने समस्त जनता भयभीत झाली. प्रशासनाने तातडीची

उपाययोजना म्हणून समुद्रकिनारी असणार्‍या लोकांना मराठी शाळा क्रमांक 1 अंजुमन हायस्कूल शिंपी समाज मंदिर माळी समाज हॉल व कालभैरव मंदिर आदी ठिकाणी शेकडो लोकांना ठेवण्यात आले.

कोरोनाशी लढा देत असतानाच लोकांना अचानक वादळी वारे व पावसाचा सामना करावा लागला. वार्‍याचा वेग एवढा जबरदस्त होता की सिमेंट-काँक्रीटचे तसेच लोखंडी पत्रे रस्त्यावर येऊन पडले. रस्त्यावर सर्वत्र सिमेंटचे पत्रे दिसत होते.

समुद्राच्या ठिकाणी वार्‍याचा वेग जास्त असल्याने लाटा किनार्‍यावर मोठ्या वेगाने धडकत होत्या. नारळाची उंच उंच झाडे प्रचंड वाहणार्‍या वार्‍यामुळे जोरदारपणे हलत होती. वारा जास्त असल्याने  समुद्रकिनारी भागात जाणेही कठीण झाले होते. या वेळी कोणतेही वाहन रस्त्यावर फिरकले नाही. प्रत्येकाच्या घरावरील पत्रे, कौले रस्त्यावर पडत होती. वार्‍याच्या वेगामुळे मोबाइलमधील

संभाषणसुद्धा नीट ऐकता येत नव्हते. जिथे तिथे वार्‍याच्या वेगाचाच कहर होता.  जोरदार वार्‍यामुळे प्रशासनाससुद्धा मदतकार्य करण्यास मोठी अडचण येत होती. वार्‍याचा वेग शांत व्हावा व मदतकार्य सुरळीत व्हावे याची प्रशासन वाट पाहत होते, परंतु वार्‍याचा वेग कमी होत नव्हता. मुरूड शहरात ठिकठिकाणी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply